Category Archives: इसापनीती कथा

इसापनीती कथा | Isapniti Katha | Isapniti Stories

उंदीर खेडयातला व शहरातला

एक साधा भोळा खेडयातला उंदीर होता, त्याचे घरी एक धष्टपुष्ट आणि गोजिरवाणा असा शहरातला उंदीर आला. खेडयातल्या उंदराने आपल्या पाहुण्याचा चांगला आदरसत्कार केला. आपल्या घरात असलेले पदार्थ, जवळच्या शेतातील काही कोवळ्या कोवळ्या गव्हाच्या लोंब्या, वाटाण्याच्या शेंगा व काही भाकरीचे तुकडे त्याने त्याजपुढे ठेविले. पण हे खेडयातले अन्न त्या शहरातल्या उंदरास आवडले नाही. मग तो त्या खेडवळ उंदरास म्हणतो, ‘काका, तुम्हास राग येणार नाही तर मी अंमळ मन मोकळे करून बोलणार आहे. अहो, असल्या ह्या कंटाळवाण्या जागेत तुम्ही राहता तरी कसे ? हे अरण्य, तेथे आसपास गवत, झाडे, डोंगर, पाण्याचे ओहोळ याशिवाय दुसरे काही दृष्टीस पडत नाही. येथील पक्ष्यांच्या किलबिलाटापेक्षा मनुष्यांचा शब्द बरा नव्हे काय ? या ओसाड रानापेक्षा राजधानी बरी नव्हे काय ? तर याचा विचार करा आणि ही जागा सोडून मजबरोबर नगरात चला. तेथे तुम्हास फार सुख होईल. ’ ह्या त्याच्या बढाईच्या गोष्टी ऐकून त्या म्हातार्‍या उंदरास मोह पडला, मग ते उभयंता तेथून निघाले. ते रात्रौ शहरात जाऊन पोचले.

पुढे जात आहेत, तो त्यांनी एक मोठा वाडा पाहिला. तेथे अगोदरच्या दिवशीच लग्नाचा समारंभ झाला होता. त्या वाडयाच्या आत जाऊन ते स्वयंपाकघरात शिरले. तेथे नानाप्रकारचे पदार्थ भरले होते, आणि मनुष्य तर कोणी नव्हते. हे पाहून खेडवळ उंदरास मोठा आनंद झाला. मग शहरातला उंदीर त्यास म्हणतो, ‘काका, तुम्ही खोलीच्या मध्यभागी बसा आणि मी एक एक पदार्थ देईन, तो चाखून पाहून त्याची रूचि कशी काय आहे, ते मला सांगा. ’ मग तो एकेक पदार्थ आपल्या पाहुण्यास देऊ लागला, तो चाखून ‘अहाहा ! काय मिष्ट पदार्थ आहे हा !’ असे म्हणून तो खेडवळ उंदीर त्याची तारीफ करू लागला. याप्रमाणे त्यांनी एक घटकाभर आपला काळ मोठया आनंदाने घालविला. इतक्यात तिकडून कोणी स्वयंपाकघराचे दार उघडू लागला, ते पाहून ते दोघेही उंदीर एका कोनाडयात जाऊन लपून बसले. तितक्यातच, दोन मोठे लठ्ठ बोके तेथे आले; त्यांनी मोठा शब्द केला, तो ऐकून खेडवळ उंदराची भयाने छाती धडधडू लागली. मग तो हळूच आपल्या सोबत्यास म्हणतो, ‘मुला, असेच जर तुझे शहरातले सुख असेल, तर ते तुझे तुला लखलाभ असो. मला खेडेच बरे वाटते. तेथील शेतातल्या शेंगा चांगल्या पण रात्रंदिवस जिवास धुगधुग लावणारी ही येथील पक्वान्ने मला नकोत. ’

तात्पर्य: शहरात राहिल्याने पुष्कळ सुखे प्राप्त होतात हे खरे, पण त्या सुखाबरोबर दुःखेही फार भोगावी लागतात. खेडयात मौजा कमी पण त्या मानाने दुःखे व संकटेही कमी असतात.