Category Archives: हिरवळ

हिरवळ | Green

महिलाही गांडूळ खत निर्मितीत

महिलाही गांडूळ खत निर्मितीत

महिलाही गांडूळ खत निर्मितीत

आजच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात सर्वच क्षेत्रात महिलांचा सहभाग व्यापक प्रमाणात दिसून येऊ लागला आहे. महिला सबलीकरणामुळे महिला आता सर्वत्र क्षेत्रात दिसत आहेत नागरीसेवा, पोलीसदल, सैन्यदल, विमान सेवा, शैक्षणिक क्षेत्र आदि क्षेत्रात महिला आज दिसत आहेत. अशाच प्रकारे बचगटाच्या माध्यमातुनही महिला आर्थिक उत्पन्न मिळवून आपल्या कुटुंबाला हातभार लावत आहेत. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने सुवर्णजयंती ग्राम स्वयंरोजगार योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून ही योजना तळागाळापर्यंत पोहचविण्यात शासन यशस्वी ठरले आहे तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कोणे गावातील महिलांनी गांडूळ खत निर्मिती व हातसडीचा तांदुळ काढून त्याची विक्री करणे हा व्यवसाय यशस्वी करुन दाखविला आहे.

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कोणे येथील दारिद्र्य रेषेखालील १३ महिला एकत्र आल्यात त्यांना त्र्यंबकेश्वर येथील पंचायत समितीचे विस्तार अधिकारी व बायप मित्र या संस्थेने मार्गदर्शन करुन ११ मे २००६ ला जय जगदंबा महिला बचतगटाची स्थापना करावयास सांगितले. या बचगटाने गांडुळ खत निर्मिती व हातसडीचे तांदूळ तयार करून विक्रीचा व्यवसाय सुरु केला. या गटास स्टेट बँक ऑफ त्र्यंबकेश्वर शाखेने प्रथम २५ हजार रुपयाचे कर्ज मंजूर केले. त्यानुसार या बचतगटाने गावात गांडूळ खत निर्मिती सुरु केली. गांडूळ खत ४५ दिवसात तयार होते. एका वेळेस २०० किलो गांडूळ खत तयार होते. या खत विक्रीतून १०-१५ हजार रुपये त्यांना उत्पन्न मिळते. या गटच्या काही महिला या हातसडीचा तांदूळ तयार करुन विक्रीचा व्यवसाय करतात यापासून बचत गटास ५-७ हजार रुपये उत्पन्न मिळते. हा गट वृक्षांची रोपे तयार करून विक्री करते त्यापासून गटास २०-२५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

अशा प्रकारे जय जगदंबा महिला बचतगट कोणे याने उद्योग व्यवसायात यशस्वी घोडदौड सुरु केली आहे. अशी माहिती मीना गांगुर्डे यांनी दिली. या बचतगटातील महिला प्रथम शेतमजुरी करीत होत्या त्यावेळी अल्पशा मजुरीमुळे जीवन जगणे त्रासदायक होत होते. परंतु या बचतगटाच्या माध्यमातून सुरु केलेल्या व्यवसायातुन सदस्यांना चांगले उत्पन्न मिळत असल्याने त्या आर्थिकदृष्ट्या समाधानी आहेत. ह्या महिला सदस्य गावातील ग्रामस्वच्छता अभियानात, व्यसनमुक्ती अभियान आदि सामाजिक कार्यात स्वेच्छेने व उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत.