लोभी मनुष्य

एका लोभी मनुष्याने आपला सगळा पैसा शेतांत पुरून ठेविला होता. तेथे दिवसांतून दोन वेळा जाऊन व त्या पैसा पुरलेल्या जागेकडे पाहून तो मोठा आनंद मानीत असे. ते त्याचे कृत्य त्याच्या गडयाने पाहिले आणि तर्क केला की आपला धनी या जागेकडे नित्य पाहतो, तस्मात्‌ येथे काही तरी पुरलेले असावे. मग त्याने रात्रौ त्या ठिकाणी जाऊन खणून पाहिले तो आंत बरेचसे द्रव्य त्याच्या दृष्टीस पडले. मग ते घेऊन तो पळून गेला. दुसऱ्या दिवशी तो लोभी मनुष्य नित्याप्रमाणे तेथे येऊन पाहतो तो सगळे द्रव्य चोरीस गेले आहे, असे त्यास दिसून आले. मग त्याने डोईंत धूळ घातली, ऊर बडवूं लागला आणि हाय हाय करून रडत बसला. शेवटी त्याचा शेजारी त्याजपाशी आला आनि त्याने त्यास रडण्याचे कारण विचारले. लोभी मनुष्याने द्रव्य चोरीस गेल्याची हकीकत त्यास सांगितली. ती ऐकून शेजारी म्हणाला, ‘अरे, मला वाटते की तुझे काहीच गेले नाही. आपला पैसा गेला, ही गोष्ट लक्षांत न आणिता, पूर्वीप्रमाणेच या जागेकडे तू पहात जा, म्हणजे झाले. ’

तात्पर्य:- लोभी आहेत, ते पैसा असून दरिद्री; व अशा लोकांचा पैसा शेवटी त्यांच्या उपयोगी न पडता भलताच कोणी तरी तो खाऊन जातो. जवळ असलेल्या द्रव्याचा जर कधी उपयोगी करावयाचा नाही, तर ते चोरीस गेल्याबद्दल शोक तरी का करावा ?