मधमाशा आणि त्यांचा धनी

एका चोराने एका बागेत शिरून, तेथे काही मधमाशांची पोळी होती, ती लांबवली. बागेचा मालक काही वेळाने बागेत आला, तेव्हा सगळी पोळी कोणी तरी चोरून नेली आहेत असे त्याच्या दृष्टीस पडले. हा प्रकार कसा झाला असावा, या विचारात तो आहे, तोच बाहेर गेलेल्या मधमाशा मध घेऊन त्या ठिकाणी आल्या व यानेच आपली पोळी नेली असावीत अशा समजुतीने त्या सगळ्या आपल्या मालकावर तुटून पडल्या. त्यावेळी तो मालक त्यास म्हणाला, ‘अरे मूर्ख आणि कृतघ्न प्राण्यांनो ! ज्या मनुष्याने तुमची पोळी चोरून नेली, त्याला तुम्ही मुकाटयाने जाऊ दिले; आणि जो मी तुमचा मालक, पुढे तुमची काय व्यवस्था करावी, अशा काळजीत पडलो आहे, त्या मला तुम्ही नांग्या मारून दुःख देता, तेव्हा तुमचा शहाणपणा काय वर्णावा ?’

तात्पर्य:- केव्हा केव्हा, जो आपला खरा मित्र आहे तो आपला श्त्रु आहे, अशी आपली चुकीची समजूत होऊन आपण त्यास त्रास देऊ लागतो; तरी अशा वेळी, आपण कोठे चुकतो आहो की काय, याचा विचार मनुष्याने अवश्य केला पाहिजे.