गुटखाबंदीवर अखेर राज्य सरकारचा निर्णय

गोवा गुटखा

गोवा गुटखा

राज्य मंत्रिमंडळाने गुटखा आणि पानमसाल्यावर संपूर्ण महाराष्ट्रात बंदी आणण्याचा अत्यंत महत्त्वाचा आणि क्रांतिकारी निर्णय बुधवारी घेतला. गुटखा व पानमसाल्याचे उत्पादन, साठवणूक आणि वितरण यांवर या निर्णयामुळे बंदी आली आहे. बंदीच्या निर्णयाच्या घोषणेकडे वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींचे व सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्ये लक्ष ठेवून आहेत.

आरोग्य राज्यमंत्री मनोहर नाईक यांनी २० जून रोजी घोषणा केली होती की, दोन दिवसांत गुटखा व पानमसाला यांवर बंदी घालण्यात येईल. २१ जूनला मंत्रालयात अग्निप्रलय झाल्यामुळे कोणतेच महतावाचे निर्णय घेता आले नाही. तेव्हापासून अन्न व औषधे प्रशासनाने तयार केलेला हा प्रस्ताव पडून होता.

गुटखाबंदीचा प्रस्ताव गेल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडे आला. संबंधित अधिकारी व मंत्री यांची मते त्यांनी जाणून घेतली व त्यावर सही केली. विधानभवनात बुधवारी रात्री झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तो मांडण्यात आला.

शहरी व ग्रामीण भागांत लहान मुले, मुली, तरुण व तरुणी तसेच महिला, पुरुष यांच्यात गुटखा खाण्याचे प्रमाण फार वाढले आहे व त्यामुळे त्यांना विविध आजारांना तोंड द्यावे लागत आहे. अनेकांना तोंड उघडणे अवघड जाते तर बऱ्याच जणांना दातांचे, घशांचे व गालाच्या आतल्या बाजूस आजार होतात. शिवाय गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात कर्करोगाचे प्रमाण फार वाढले आहे. दर वर्षी आठ लाख जण गुटखा व तंबाखूच्या सेवनाने मरण पावतात.

दर वर्षी देशात गुटखा व पानमसालयाची अठरा हजार रुपये कोटींची उलाढाल होते. नुसत्या महाराष्ट्रातच याची पाच हजार कोटींपेक्षा अधिक उलाढाल होते. १०० कोटी रुपये राज्याला महसूल मिळतो. मात्र राज्य सरकारने तरुण व विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या हितासाठी या महसूलावर पाणी सोडण्याचा निर्णय घेतला.