महाराष्ट्रात पावसाचे आगमन लवकरच

महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन

केरळ मध्ये मान्सून दाखल झाल्यामुळे उकाड्याने व पाणी टंचाईमुळे ग्रासलेल्या नागरिकांच्या चेहेर्‍यावरील चिंतेच्या सुरकुत्या आता मिटल्या आहेत. हवामान विभागाने संकेत केले आहे की, मान्सूनच्या प्रगतीसाठी हवामान अनुकूल असल्यामुळे पुढच्या दोन दिवसांत तो महाराष्ट्र राज्यातही येऊन थडकणार आहे.

गेल्या दोन दिवसांत मान्सूनने अरबी समुद्राचा बराचसा भाग अंदमानातील आठवड्याचा मुक्काम आटोपल्यानंतर व्यापला होता. मंगळवारी हवामान पोषक असल्यामुळे मान्सूनने केरळात प्रवेश केला. मान्सून संपूर्ण केरळसह दक्षिण तमिळनाडूचा काही भाग आणि कर्नाटक किनारपट्टीच्या काही भागांतही दाखल झाला आहे. चिन्हे अशी आहेत की, पुढच्या दोन दिवसांत कर्नाटकचा अंतर्गत भाग, गोवा यासह महाराष्ट्रतही मान्सून दाखल होणार आहे. पुणे वेधशाळेने शक्यता दर्शविली आहे की, कोकणासह दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागांतही मान्सून पोहोचेल.