माझ्या विषयीचं मत हेरलं

रस्त्याने दोन मित्र जात होते. त्यांच्यापैकी एकजण दुसऱ्याला बरोबर घेऊन एका सार्वजनीक दुरध्वनीपाशी गेला. त्याने त्या दुरध्वनीची तबकडी फ़िरवली, आणि आकस्मात आपला आवाज बदलून तो त्या दूरध्वनीवर बोलू लागला, ‘हॅलो ! गब्बर आणि बब्बर कंपणी का? अरे वा: ! कंपणीचे प्रत्यक्ष व्यवस्थापक बोलताहेत वाटतं ? छान ! साहेब, तुमच्या कंपणीत तुम्हाला हिशेब ठेवू शकणाऱ्या एका कारकुनाची आवश्यकता होती ना. गेल्याच आठवड्यात वृत्तपत्रात जाहीरात आली होती, पण त्यावेळी मी बाहेरगावी गेलो होतो, म्हणून मला लगेच आपल्याकडे येता आले नाही. काय म्हणता? त्या जागेवर माणूस नेमलासुध्दा? हॅलो साहेब, पण मी काय म्हणतो आहे, ते तर ऎकून घ्या. ‘नेमलेल्या माणसाला काढून त्याच्या जागी मला नेमा.’ असं मला सांगायचं नाही, पण आपण माझी तात्पुरती नेमणूक करा, आणि आम्हां दोघांपैकी कोण विशेष चांगल काम करतो, ते एक दोन महिन्यांत ठरवून मग आम्हा दोघांपैकी अधिक कार्यक्षम माणसाला आपण त्या जागेवर कायम करा. काय म्हणतो ? नेमलेला माणूस चांगला कार्यक्षम असून, तुम्ही त्याच्या कामावर खुश आहात ? मग काय बोलायचं खूटलं ! अच्छा नमस्ते.

एकाच दुरध्वनीवरील बोलणं संपताच दुसऱ्यानं त्याला विचारल, ‘काय रे अशोक, गेल्याच आठवड्यात तर तुला नोकरी मिळाली असून पगार वगैरे सर्व दृष्टीने ती नोकरी चांगली असल्याच मघाशी मला म्हणालास. मग आता दुसऱ्या नोकरीसाठी आणि तेही असा आवाज बदलून दुसऱ्या कंपणीच्या व्यवस्थापकाशी बोलण्याच काय कारण?’

यावर मिश्कीलपणे हसत अशोक म्हणाला, ‘अरे ! माझी जिथे गेल्या आठवड्यात नेमणूक झाली आहे ना, त्याच कंपणीच्या व्यवस्थापकाला मी मुद्दाम आवाज बदलून दुरध्वनी केला. म्हटलं, व्यवस्थापक आपल्या कामावर खुश आहेत की नाही, ते चाचपून पाहवं, समजा नसलचं, तर आतापासून कुठेतरी दुसरीकडे नोकरीसाठी प्रयत्न चालू ठेवावेत.