मांजर आणि उंदीर

एका घरात उंदीर फार झाले होते, तेथे एक मांजर आले. त्याने बरेच उंदीर खाऊन टाकल्यावर, बाकीच्या उंदरांनी एकत्र होऊन निश्चय केला की, ‘वरून खाली कोणी उतरू नये.’ त्या दिवसापासून मांजराच्या हाती एकही उंदीर लागला नाही.

मग ते उपाशी मरू लागले असता, त्याने एका खुंटीस आपले पाय अडकवून व डोके खाली करून मेल्याचे सोंग घेतले. ते पाहून वरून एक म्हातारा उंदीर त्यास म्हणतो, ‘गडया, तू खुशाल टांगून घे अथवा काय वाटेल ते कर; पण तुझे पोट चिरून आत पेंढा भरला आहे, अशा स्थितीत जरी तुला आम्ही पाहिले, तरी याउपर तुझा विश्वास आम्ही धरणार नाही.

तात्पर्य: घातकी, कपटी व ठक यांची भाषणे खरी मानणारे लोक बहुतकरून फसतात; पण ज्यांनी त्यांचे खरे स्वरुप एकदा ओळखले, ते त्यांच्या ताबडीत सहसा सापडत नाहीत.