मनुष्य आणि पिसू

एका माणसाच्या पाठीस खाज सुटली, म्हणून त्याने आपल्या हाताने तेथे चाचपून पाहिले, तो त्याच्या हाती एक पिसू सापडली. तिला तो मनुष्य म्हणतो, ‘माझ्या रक्तावर निर्वाह चालविणारा तू कोण दुष्ट प्राणी आहेस रे ?’ पिसू उत्तर करते, ‘मी आपला निर्वाह रक्तावर चालवावा, अशी योजना देवानेच केली आहे. शिवाय माझा दंश, प्राण्याच्या मृत्यूस कारण होण्याइतका भयंकरही नाही.’ माणूस म्हणाला, ‘तुझा दंश जरी भयानक नसला तरी तो फार त्रासदायक आहे, यात संशय नाही, आणि यापुढे तुजपासून त्रास होऊ नये म्हणून मी तुला आता ठार मारून टाकणार.’

तात्पर्य:- हिंसा करू नये, ही गोष्ट खरी, परंतु जे प्राणी दुसऱ्यास निरर्थक त्रास देतात, त्यांस ठार मारण्याचा प्रसंग एखादया वेळी तरी आल्याशिवाय राहात नाही.