मरण असे मिळावे

एकदा बिरबलाने अकबर बादशहाची वाजवी पेक्षा अधिक थट्टा केली, म्हणून रागावून बादशहाने त्याला मृत्युची शिक्षा फ़र्मावली.परंतू प्रत्यक्ष शिक्षेची अमंलबजावणी करण्यापूर्वी त्याला बोलावून घेऊन बादशहा त्याला म्हणाला, ‘बिरबल, आजवर मी तुझ्यावर फ़ार प्रेम केले. त्यामुळे तुला ठोठावलेली मृत्युदंडाची शिक्षा जरी मी कायम ठेवलेली असली, तरी तुला मरण कोणत्या तऱ्हेने हवे याबाबत तुला काय सांगायचं असलं, तर सांग. बोल, तुला तोफ़ेच्या तोंडी जाऊन मृत्यू हवा, तलवारीच्या घावानं तुझे शीर उडविले जावे, कडेलोटाच्या मार्गाने मरण हवे, की हत्तीच्या पायी चिरडले जाऊन ? तुला मृत्यू कशा तऱ्हेनं हवा, ते तु मला सांग. पूर्वीचे तुझे माझे जीवाभावाचे संबंध लक्षात घेऊन, मी तुझ्या इच्छेला मान देईन.

‘बिरबलानं विचारलं, ‘पण खाविंद ! दिलेला शब्द आपण नक्की पाळालं ना?’

‘अरे, हे काय विचारणं झालं ? माझा शब्द म्हणजे शब्द.’ बादशहा बोलून गेला.

यावर बिरबल म्हणाला, ‘मला म्हातारपणामुळे मृत्यू यावा, अशी माझी इच्छा आहे.’

शब्दात अडकून गेल्यामुळे बादशहाला बिरबलाच्या इच्छेचा मान राखणे भाग पडले.