११ जानेवारीपासून मराठी साहित्य संमेलन

उषा तांबे

उषा तांबे

८६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चिपळूण येथे ११ जानेवारीपासून सुरु होणार आहे व ते १३ जानेवारी पर्यंत चालणार आहे. या संमेलनात पर्यावरणपूर्वक व्यवस्था, संमेलनपूर्व उपक्रमांची जंत्री आणि संमेलनाच्या व्यासपीठावर शालेय विद्यार्थ्यांसाठी बालजल्लोष, असे नवीन कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

ग्रंथदिंडी, परिसंवाद, कथाकथन, कविसंमेलन, मुलाखती अशा संमेलनातील पारंपारिक कार्यक्रमांसह त्याला वेगळ्या उपक्रमांची जोड देण्याचा संयोजकांचा प्रयत्न होता. याबाबत पुण्यात साहित्य महामंडळाची बैठक झाली व या मुद्द्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला. याविषयीची माहिती महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे आणि लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी रविवारी दिली.

‘ग्रंथदिंडी, ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन संमेलनाच्या पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात करण्यात येईल. संमेलनाचा उद्घाटन समारंभ दुपारी आणि निमंत्रितांचे पहिले कवी संमेलन सायंकाळी होणार आहे. या वेळी चित्रकार व रेषाकारांनाही संमेलनाच्या व्यासपीठावर ‘आमच्या रेषा बोलतात भाषा’ या परिसंवादातून स्थान देण्यात आले आहे. दहावीपर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांसाठीही एक विशेष कार्यक्रम म्हणून ‘बालजल्लोष’ हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे,’ प्रा. तांबे यांनी ही माहिती दिली.

प्रा. तांबे यांनी सांगितले की, ‘यशवंतराव चव्हाण यांचे विचारविश्व आणि आजचा महाराष्ट्र’, जागतिकिकरण आणि आजची मराठी कादंबरी’, ‘आम्ही काय वाचतो, का वाचतो?’, ‘कार्यकर्त्यांच्या शोधात साहित्यसंस्था’ आणि ‘मराठी साहित्य आणि चित्रपटसृष्टी’ हे परिसंवादाचे इतर विषय असतील.

प्रकाश देशपांडे यांनी माहिती दिली की, संमेलनाच्या अगोदर दोन ऑक्टोबरपासून विविध उपक्रमांना सुरुवात केली जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात्तील सर्व तालुक्यांमधील कॉलेजांत विविध व्याख्याने आयोजित करण्याचा आमचा मानस आहे. स्पर्धा, कार्यशाळा, असे विविध उपक्रमही घेतले जाणार आहेत. या संमेलनासाठी तीन दिवसांच्या निवास-भोजनासह प्रतिनिधी फी अडीच हजार रुपये असेल.