मेंढया आणि कुत्रे

एके दिवशी मेंढयांनी धनगरापाशी गाऱ्हाणे केले की, ‘आमची लोकर तुम्ही वरचेवर कापून घेता व आमच्या दुधावर आणि मांसावर आपला निर्वाह चालविता, पण आमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था तुम्ही ठेवीत नाही. डोंगरावर चरून आम्ही आपली क्षुधा भागवितो आणि ओढयाचे पाणी पिऊन दिवस घालवितो; उलट पक्षी हा तुमचा गलेलठ्ठ कुत्रा तुम्हांस लोकर देत नाही किंवा त्याचा दुसरा कोणताही उपयोग तुम्हांस होत नाही असे असता त्याचे मात्र फार लाड करता; तरी हा पक्षपात तुम्हांस योग्य नाही.’ हे भाषण ऐकून कुत्रा त्या मेंढयांस म्हणतो, ‘अरे, शांत व्हा, शांत व्हा; असे वर्दळीवर येऊ नका. तुमच्यावर नजर ठेवून तुमचे रक्षण करण्यास जर मी नसतो, तर लांडग्यांनी तुम्हांस कधीच खाऊन टाकले असते किंवा चोरांनी तुम्हांस चोरून नेले असते, हे लक्ष्यात घ्या.’

तात्पर्य:- सर्व माणसे सारख्याच उपयोगाची असतात असे नाही; एकाचा एक प्रकारे उपयोग होतो तर दुसऱ्याचा दुसऱ्या प्रकारे होतो, हे लक्षात घेतले असता कोणी कोणास नावे ठेवण्याचे कारणच रहात नाही.