म्हातारा आणि त्याचा घोडा

एक म्हातारा आणि त्याचा मुलगा, आपला एक घोडा विकण्यासाठी बाजारात चालले असता वाटेत एक मनुष्य त्या म्हाताऱ्यास म्हणाला, ‘ह्या लहान मुलास तू पायी चालवीत आहेस, त्यापेक्षा तू त्यास ह्या घोडयावर का बसवत नाहीस ?’ हे ऐकताच म्हाताऱ्याने मुलास घोडयावर बसविले आणि आपण त्याचा लगाम धरून चालू लागला. पुढे दुसरा एक मनुष्य त्या मुलास म्हणतो, ‘आळशी पोरा, तुझा म्हातारा बाप पायी चालत असता, तुला घोडयावर बसून जाण्यास लाज वाटत नाही काय ?’ हे ऐकताच म्हाताऱ्याने मुलास खाली उतरविले व आपण घोडयावा बसून निघाला.

ते काहीसे पुढे गेले तोच दोन स्त्रिया समोरून येत होत्या. त्यापैकी एक स्त्री त्या म्हाताऱ्याकडे बोट दाखवून म्हणते, ‘हा पहा थेरडा, ते लहान मूल पायी चालत असता, आपण घोडयावर बसून चालला आहे !’ ते ऐकताच म्हाताऱ्याने त्या मुलास आपल्या मागे घोडयावर बसवून घेतले. ते आणखी काहीसे पुढे गेल्यावर एकजण त्यास विचारतो, ‘हा घोडा तुमचाच आहे काय ?’ म्हातारा म्हणाला, ‘हो’ यावर तो मनुष्य म्हणाला, ‘मला काही हे खरे वाटत नाही; कारण हा घोडा जा तुमच्या असता तर तुम्ही त्याचे असे हाल केले नसते. तुम्ही दोघेही ह्याच्या पाठीवर बसून चालला आहात, त्यापेक्षा ह्यालाच तुम्ही का उचलून नेत नाही ?’ हे ऐकताच म्हातारा व त्याचा मुलगा खाली उतरले व त्यांनी त्या घोडयास आडवा पाडून त्याचे पाय बांधले.

मग त्यात एक वेळू घालून तो त्यांनी आपल्या खांदयावर घेतला व पुढे निघाले. तो देखावा पाहून रस्त्यातले लोक टाळ्या पिटून मोठमोठयाने हसू लागले. ती ओरड ऐकून घोडा बिचकला आणि त्याने आपले पाय झाडून, पायास बांधलेले दोर तोडून टाकेल. दोर तुटताच खाली नदी होती तीत तो घोडा पडला व बुडून मेला. बिचारा म्हातारा खट्टू होऊन आपल्या मुलास घेऊन घरी गेला.

तात्पर्य : निरनिराळे लोक निरनिराळ्या प्रकारच्या सूचना करतात, त्या ऐकून घेऊन व त्याप्रमाणे वर्तन करून त्या सर्वांस खूष करणे हे काम फार कठीण आहे.