मोदकाची आमटी

साहित्य :

 • १ वाटी डाळीचे पीठ
 • २ चमचे तीळ
 • १ वाटी खोबरे
 • २ चमचे पाण्याचे कूट
 • तिखट
 • मीठ
 • हळद
 • हिंग
 • काळा मसाला
 • १ छोटा कांदा
 • ४-५ लसूण पाकळ्या
 • गूळ
 • तेल

कृती :

प्रथम १ वाटी डाळीचे पीठ घ्यावे. त्यात तिखट, हळद, मीठ, हिंग व १ चमचा तेल घालून ते घट्ट भिजवावे. तीळ भाजून घ्यावे. खोबरे किसून घ्यावे व मिक्सरमधून बारीक करून घ्यावे. खोबाऱ्यात दाण्याचे कूट घालावे. दाण्याचे कूट तयार नसल्यास दाणे भाजून तेही तीळ व खोबऱ्याबरोबर बारीक करावे. नंतर ह्या मिश्रणात तिखट, मीठ, हळद, आवडत असल्यास चवीपुरता गूळ घालून हे मिश्रण चांगले कालवावे. डाळीच्या पिठाच्या छोट्या पुऱ्या लाटून त्यात तयार केलेले सारण भरून पुरीला मोदकाचा आकार द्यावा. सर्व मोदक तयार झाल्यावर गॅसवर पातेले ठेवून त्यात तेल, मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करावी. त्यात लसणाची पेस्ट व बारीक चिरलेला कांदा घालावा. कांद्याला गुलाबी रंग आला की पाणी टाकावे. त्या पाण्याला घट्टपणा येण्यासाठी २ चमचे सारण घालावे. पाणी उकळू लागल्यावर त्यात मोदक टाकावेत. नंतर १० मिनिटे मंद गॅसवर उकळू द्यावे. आवडत असल्यास आमटी उकळताना त्यात कोथिंबीर बारीक चिरून टाकावी. ही आमटी पोळीबरोबर खाण्यास छान लागते.