मोर आणि बगळा

एका मोराने बगळ्यास पाहून आपला सुंदर पिसारा उभारला आणि हा कोणी तुच्छ प्राणी आहे असे मनात आणून, त्यास आपल्या सोनेरी रंगाच्या पिसांची शोभा दाखवू लागला. त्याचा गर्व उतरावा म्हणून बगळा त्यास म्हणतो, ‘अरे, सुंदर पिसे असणे हेच जर थोरपणाचे लक्षण असते, तर तुमची जात श्रेष्ठ आहे, असे मी कबूल केले असते. मला असे वाटते की, मुलांप्रमाणे भुईवर चालून खेळ खेळण्यापेक्षा आकाशात फिरण्याचे सामर्थ्य असणे, हाच खरा थोरपणा आहे.

तात्पर्य:- आपल्या अंगी एखादा गुण आहे, जो दुसऱ्याचे अंगी नसला, म्हणून त्यास तुच्छ लेखावे किंवा दुखवावे, असे जर दुसऱ्याच्या अंगी जो गुण आहे, तो आपल्या अंगी नाही म्हणून त्याने आपणास का तुच्छ मानू नये ? सगळेच गुण एका माणसाच्या अंगी असत नाहीत, म्हणून कोणी कोणास हलके समजू नये.