मोरोपंताची समयसूचकता

‘आर्या’ वृतातील प्रचंड काव्यरचनेबद्दल प्रसिध्द असलेली मराठी कवी मोरोपंत हे पुराण मोठं छान सांगत.

एकदा ते सरदार घोरपडे यांच्याकडे पुराण सांगायला गेले. कार्यक्रमाला अतिशय रंग चढला. श्रोते अगदी बेभान होऊन पुराण श्रवणात रंगून गेले. पुराण कथनाचा कार्यक्रम संपायच्या बेताला आला असता, ‘या विद्वान बुवांना बिदागी म्हणून द्यायचं तरी काय ?’ हा विचार सरदार घोरपडे यांच्या मनात येऊन ते त्यांच्याजवळ बसलेल्या खाजगी कारभाऱ्यांच्या कानत त्यासंबंधी कुजबुजु लागले.

ही गोष्ट मोरोपंताच्या लक्षात येताच मनातल्यामनात तत्क्षाणी रचलेल्या आर्येत ते घोरपड्यांना उद्देशून म्हणाले, ‘
आर्या –
भोजासम कविताप्रिय, कर्णासम दानशूर घोरपडे /
ऎसे असता माझ्या बिदागीचा का तुम्हास घोर पडे //
ही आर्या कानी पडताच श्रोतृवृंदात हास्याची खसखस पिकली. घोरपड्यांनी मोरोपंताच्या या समयसुचकतेबद्दल त्यांच्यावर प्रसन्न होऊन, त्याच क्षणी आपल्या गळ्यातला कंठा काढून तो त्यांच्या गळ्यात घातला.