मुलांना गोष्टी कथा सांगाव्यात

माणसाला कथेचे, गोष्टीचे आकर्षण फार असते. कथेच्या मागे माणूस असतो की माणसाच्या मागे कथा असते कुणास ठाऊक ! पण माणूस आणि कथा हे दोघेही एकत्र असतात. हे मात्र खरेच ! कथा किंवा गोष्ट तशी सर्वांनाच आवडते. दोन वृद्ध भेटले तर हवापाण्याच्या का होईना, पण गोष्टीच बोलायला लागतात. चार जवान सैनिक एकत्र आले तर आपल्या लढाईच्या नि चढाईच्या गोष्टीच करायला लागतात. तरुण तरुणींना तर गोष्टी प्रिय असतात. म्हणून अगदी काल परवा बघितलेल्या सिनेमाची-पिक्चरची स्टोरी काय होती यावर ती रंगून बोलत असतात. सिनेमा, नाटक यातली स्टोरी-कथा-गोष्ट माणसाला हवी असते. आणि लहान मुले तर गोष्टीसाठी अधीर असतात. ‘गोष्ट सांगा-गोष्ट सांगा’ – म्हणून भंडावून सोडतात. ह्या त्यांच्या भंडावण्यामुळेच आपण मोठी माणसे म्हणत असतो की, ‘मुलांना गोष्टी फार आवडतात !’

गोष्टी म्हणजे मुलांचा सोबती !
कर असे आहे की, मुलांप्रमाणेच गोष्टी सगळ्यांनाच आवडतात. गोष्ट ही माणासाची एक सांस्कृतिक भूक आहे. गरज आहे. माणूस एकटा राहू शकत नाही, वाढू शकत नाही. सुखवैभवाच्या राशीवर जरी त्याला बसवले तरी एकटेपणाचे दुःख त्याला सलत राहाते. दुःखातही तेच घडते. म्हणजे सुखात असो की दुःखात असो, माणसाला सोबत लागते आणि सोबत गोष्ट पुरवते.माणसामाणसातील हार्दिक संबंधाला एक सांस्कृतिक मूल्य आहे; आणि हा सांस्कृतिक संबंध पुरविणाऱ्या, प्रस्थापित करणाऱ्या साधनांपैकी एक प्रभावी साधन आहे गोष्ट, कथा.

माणूस हा प्राणीच गोष्टवेल्हाळ आहे. गोष्टीशिवाय त्याचे चालत नाही. गोष्टीमुळे तो तहानभूकही विसरतो. गोष्टीनेही या माणसाकरिता पुष्कळच केलेले आहे. माणसाच्या सांस्कृतिक विकासात त्याला इतर मनोरंजनाच्या साधनांच्या खूपच आधी गोष्टी भेटलेली आहे.‘कथ’ म्हणजे सांगणे, निवेदन करणे, या ‘कथ’ पासून ‘कथा’ हा शब्द आला. असे मानले जाते की, मानवी संस्कृतीमधला अत्यंत प्राचीनतम माग म्हणजे ‘भाषा’ होय. मानवाने संपादन केलेली पहिली कला म्हणजे ‘वाणी’ ही आहे. मानवेतिहासाची सुरुवातच मुळी भाषेपासून होते.रानटी अवस्थेत राहणारी माणसे शिकारीसारख्या उद्योगात आणि भटक्या जीवनात त्यांना जे रोमांचकारक अनुभव येत असतील त्यांना या प्राप्त झालेल्या वाणीच्या साहाय्यानेच एकमेकांना सांगू लागली असतील. निवेदन करू लागली असतील. अशा प्रकारे अनुभवांच्या कथा आणि कथांचे कथन जन्मास आले असेल.

पुढे या अनुभवांना कल्पकतेची जोड मिळाली. माणसाने आपल्या सभोवती दिसणाऱ्या सृष्टीची गुढे उकलण्याचा प्रयत्न बुद्धीच्या साहाय्याने सुरू केला. अनेकानेक कल्पनारम्य कथांचा जन्म झाला. कथेला भारतात तर फारच मोठी परंपरा लाभलेली आहे. भारत हा कथा कहाण्यांचाच देश म्हणून ओळखला जातो. ऋग्वेदापासूनचे सर्व वेद वैदिक वाङ्मय, पंचतंत्र, हितोपदेश, कथासरिसागर आदी संस्कृत साहित्यातील कथा, बौद्धांच्या जातककथा व जैनांच्या चूणीं हे नीति कथांचे संग्रह आदींनी प्राचीन भारतीय कथासृष्टी समृद्ध विविध तऱ्हेच्या लोकभाषेत लोककथांची निर्मिती करून आणखीनच वाढवलेली आहे.

पहिली गोष्ट बालपणात
माणसाला हवीहवीशी वाटणारी ही गोष्ट किंवा कथा त्याच्या जीवनात फार लवकर येत असते. गोष्टीची आणि माणसाची भेट त्याच्या बालपणात -तो बाळ असतानाच होत असते. चिऊ काऊ किंवा उंदीर माउ यांच्या अथवा चांदोबाच्या तालकथा ऐकतच बाळ वाढत असते, मोठे होत असते. गंमत अशी की बाळाबरोबर त्याची गोष्टीही वाढत असते. मोठी असते. – आकाराने, प्रकाराने आणि आशयाने देखील.बालपणी चिमणा-चिमणी, कावळा, पोपट, ससा, खार, कुत्रा, मांजरी, हरिण, कोल्हा, वाघ, सिंह, माकड, अस्वल – सारेच बाळाचे सवंगडी बनतात. ‘ घोडा कुठं बोलतो का ? ’ किंवा ‘लांडग्याला का गाता येते ?’ असले प्रश्न बाळाला सतावीत नसतात. कारण बाळाची सृष्टी, बाळाचे विश्व हे वेगळेच असते. अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असते ते त्यांचे-बाळाचे स्वतःचे ‘भावविश्व’ असते.

गोष्टी म्हणजे संस्कार
गोष्ट बाळाला हसवते, खेळवते, रिझवते, – ती बाळाबरोबर बाळच होते. म्हणून बाळाला गोष्ट आवडते. बाळ मोठा होतो तशी त्याची गोष्टही मोठी होते. म्हणजेच बाळाचे आणि त्याच्या गोष्टीचेही भावविश्व बदलते. मोठे होते. विस्तारते. मुलांच्या या भावविश्वात मग राजाराणी, फूल-परी, राक्षस, देवदूत, म्हातारी-चेटकी, जादूगार-भूत, सैतान-बैरागी, योगी-जोगी, शूरवीर योद्धा अशी मानवी व अमानवी किंवा अतिमानवी सामर्थ्यांची मंडळी प्रवेश करतात. संत, साधू, सेवक, महात्मे, धर्मवीर, कर्मवीर, कलावंत शास्त्रज्ञ यांच्याशीही, आणखी थोडे मोठे झाल्यावर ओळखदेख होते. त्यांच्या गोष्टीतून अद्भुत कुतूहलाबरोबरच सत असत. भलाई बुराई, प्रेम-कीर्य, सज्जनता-दूर्जनता, शौर्य-भीरुता, स्वातंत्र्य गुलामी, स्वाभिमान लाचारी, त्याग-स्वार्थ, न्याय-अन्याय, नीती-अनीती, ज्ञान-अज्ञान, धर्म-अधर्म, इत्यादी गुणावगुणाशी परिचय योत असतो. नकळत संस्काराची भलाईची वाट मोकळी होत असते. बालमनापर्यंत जाऊन भिडत असते. कळीचे फूल व्हावे इतक्या सहज, नैसर्गिक अकृत्रिमपणाने हे होत राहते. आणि तसेच ते द्यावे लागत.

‘संस्कार करतो, ‘संस्कार घडवतो’, मूल बनवतो’ असल्या आत्मप्रौढीवर किंवा अंहकार युक्त भाषेने, विचाराने वा कल्पनेने हे भले काम साधत नसते. उलट तसल्या घटपादी खटपटीने ते नासण्याचीच शक्यता अधिक असते. ते बिघडण्याचीच संभावना फार असते. हे कथाकथित मोठ्यांनी लक्षात घेतले पाहिजे.त्यासाठी गोष्टीचे काम गोष्ट सांगणाऱ्याने आपल्याकडे न घेता ते गोष्टीलाच उत्तम रीरीने करू द्यावे. म्हणजेच मुलांची प्रिय आवडती गोष्ट, मुलांना तिच्या अत्युत्कृष्ट स्वरूपात फक्त भेटवावी. वारंवार नि विविध रूपे देऊन तिची आणि मुलांची गाठ घालून द्यावी. या अशा भेटीगाठीतून मुलांचे भावविश्व अनेक पटींनी श्रीमंत समृद्ध होईल. गोष्टीची आणि मुलांची भेट तीन माध्यामाद्वारे होते. ‘श्रवण’ ‘दर्शन’ आणि ‘वाचन’ ह्या तिन्ही माध्यमांची उपलब्धता अधिकाधिक रीती आणि भिन्नाभिन्न परींनी कशी करून देता येईल. याचीच कालजी पाहिली पाहिजे व तेच घडवून आणले पाहिजे. मुलांच्या संदर्भात घडवायचे अहे ते हे अशा स्वरूपाचे आहे हेही तथाकथित मोठ्यांनी लक्षात घेतले पाहिजे.
‘श्रवणा’साठी गोष्ट सांगणे, कथा निवेदन, कथाकथन आहे. तर ‘दर्शना’ साठी नाट्य, चित्र, शिल्प, नृत्य, आदी दृक, माध्यमांचा उपयोग होईल. ‘वाचना’ साठी पुस्तके, नियककालिके आदी साहित्याचे साहाय्य होईल.

कथेचे विविध प्रकार
कथा अशा तीन माध्य्मापासून जशी भेटते, तशीच ती विविध रुपातही भेटते. तालकथा, किंवा गीतकथा, प्राणीकथा, सृष्टीकथा, नीतिकथा, लोककथा, परीकथा, धर्मकथा किंवा पौराणिक कथा, ऐतिहासिक कथा, विज्ञानकथा, साहसकथा, चातुर्यकथा, चरित्रकथा, स्वातंत्र्यकथा, मूल्यकथा, नवविचार कथा अशा स्थूलमानाने पंधरा रुपांनी कथेचा आविष्कार होत असतो. ती सगुण साकार होत असते. प्रकटत असते.
या प्रत्येक रुपगुणांचे वैशिष्ट्य असते. त्यांचे सविस्तर विवेचन हा एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे.‘बालविकासाची जी विविध साधने व माध्यमे आहेत, त्यात ‘गोष्ट’ ‘कथा’ हे एक फार मोठे महत्त्वाचे साधन आहे. गोष्ट ही बालकांच्या विविध ‘आनंद प्रवृत्ती’ पैकी एक प्रवृत्ती आहे आणि म्हणूनच मुलांच्या गोष्टींवर उड्या पडत असतात ! मुलांच्या ठायीची गोष्ट कथा ही प्रबळ अशी एक ‘आनंदप्रवृत्ती’ लक्षात घेऊनच ‘जिथे मूल तिने कथा’ नेली, पोचवली पाहिजे.

गोष्ट कशी असावी ?
सांगण्याची ही गोष्ट कशी असावी ? तर ती लहान-मोठा असा मुलांच्य वयोमानांचा विचार करून लहान-मोठी असावी.गोष्ट सोपी, सुलभ असावी. फार गुंतागुंतीची नसावी. नाहीतर गुंतागुंतीमुळेच ऐकताना क्वचित सांगताही गोंधळ होण्याचा संभव असतो. गोष्ट ही गोष्ट म्हणून उत्कृष्ट असावी.
मुलांची गोष्ट मुलांनाच रुचेल, पचेल अशीच असावी. गोष्टीचा आरंभ, मध्य, शेवट असे जे काही तिचे शरीर असते ते तर जिवंत, सुंदर, देखणे हवेच, पन तिच्या या देखण्या शरीरातील तिचा आत्माही त्याहून जिवंत, सुंदर, देखणा, चैतन्याने रसरसलेला हवा !अशी ही गोष्ट मात्र तशीच प्रभावी रीतीने मुलांना सांगितलीही पाहिजे. चांगली गोष्ट चांगल्या रीतीने सांगितली तरच ती मुलांनाही अधिक चांगली वाटते. आवडते. मुलांच्या चिमकुल्या मनात घर करून राहते.

अशी ही गोष्ट सांगायची कशी ? कथाकथन करायचे कसे ? -खरे तर या प्रश्नांची उत्तरे मुलांना गोष्ट-कथा सांगू लागले म्हणजेच मिळतात. ‘कथा-कथन’ हा एक अस्सल व जिवंत अनुभव आहे. कथाकथन ही कलाच मुळी नृत्य-संगीतारमाणे ‘जिवंत कला’-  (Living Art)  आहे. कथाकथन करताना कथा निवेदकाला ती कथा, त्यावेळी, विशिष्ट गोष्टींचे साहाय्य घेऊन जीवंत करावी लागते. त्यासाठी कथा निवेदकला ती ‘अनुभवावी’ लागते. हे अनुभवपणे तेव्हाच घडते, जेव्हा त्या विषयी अतीव आस्था असते. कथा निवेदकाला कथा आणि मुले यांच्या विषयीच मूळ आत्यतिक आस्था आणि निष्ठा असली पाहिजे. ‘तुका म्हणे झरा । आहे मुळीचांच खरा ॥’ अशी आस्था व निष्ठा असेल तरच कथा निवेदकाला कथेच्या अंतरंगात प्रवेश मिळतो. तरच त्याला सगली गोष्ट उसगते. तो गोष्टीत आणि गोष्ट त्याच्यात भिनते !

कथाकथन : एक कला
कथाकथनाची-गोष्ट सांगण्यची प्रथा परंपरा आपल्या देशात, समाजात, घरात तशी आरच जुनीपुराणी आहे. पण ही गोष्ट कशी सांगावी, हे काही तंत्र म्हणून लिहून ठेवलेले कुठे आढळत नाही. कथाकथनाच्या निमित्ताने गेली २०-२५ वर्षे महाराष्ट्रात हिंडत फिरत असताना, गोष्टी सांगता सांगताच मला काही सुचले. चिंतनातून निरसणातून स्फुरले.  गोष्ट कशी सांगायची ते सांगा ? असा प्रश्नही सर्वत्र विचारला जात होता. म्हणून चिंतनच मी पुढील दशसूत्रीत विस्तारीत गेलो अनेक शिबिरे घेतली. विविध प्रयोग केले. कथाकथनाची दशसूत्री कशी : (१) आत्मविश्वास, (२) गोष्टीची निवड, (३) तन्मयता, (४) वक्तृत्त्व, (५) शब्दसंपदा, (६) अभिनय, (७) चित्रमयता, (८) बहुश्रुतपणा, (९) श्रोत्याचा सहभाग आणि (१०) वेळेचे भान .
या प्रत्येक सूत्रावर, खरे तर विस्तृत अशा विवेचनाची व त्याच बरोबर प्रात्यक्षिकांचीही (Demonstration )  गरज आहे. ‘कथा आणि कथाकथन’ या माझ्या पुस्तकात या सूत्रांचे विस्तृत विवेचन केलेले आहे. प्रात्यक्षिकासाठी शिबिरवर्गाची व्यवस्था हवी.

मुलात मूल होणे महत्त्वाचे
ही सर्व तंत्रमंत्राची उठाठेव झाली. यातून स्थूल रूपरेखा कळू शकेल पण खरे असे आहे की, मुलांना गोष्ट सांगण्यासाठी आपण आपले सर्वतऱ्हेचे तथाकथित मोठेपण, प्रौढपण किती झुगारून देऊ शकतो ही मुख्य गोष्ट आहे ‘मुलात मूल’ ज्यांना होता येईल, त्यांनाच मुलांना उत्तम गोष्ट सांगता येईल ! प्रौढपणी लहान होणे ही अजब किमया आहे. ‘योग’ आहे, पूज्य सानेगुरुजींसारख्या एखाद्याच मोठ्याला ही किमया, हा योग साधतो. गुरुजी मातृहृदयी होते. त्यांना लहानात लहान होता आले. मातांना, भगिनींना निसर्गानेच ही वत्सल देणगी दिलेली आहे. म्हणून ही तिमया  साधने त्यांना अवघड नाही.

‘स्त्री’ शबदच ‘स्तु’ या धातूपासून निर्माण झालेला आहे. ‘स्तू’ म्हणजे विस्तारणे, फैलावणे, प्रसूत करणे, पसरवणे म्हणजेच अखिल विश्वांवर, मानवजातीवर, चराचर सृष्टीवर प्रेम, दया, माया, वत्सलतो या सद्गुणांची पसरण करणारी ती ‘स्त्री’ प्रेमाची मेघवृष्टी करून सृष्टी जोपासणारे तत्त्व म्हणजे स्त्री. स्त्रीची मातृरूपातली महती तर आपल्या प्राचीन वाङ्मयानेही गायलेली आहे. मनूने म्हटलेले आहे. ‘अपाध्यायन दशाचार्य ।’ व्रतबंधाच्यावेळी गायत्री मंत्र बटूला देणारा उपाध्याय अशा दहा उपाध्यायांच्या बरोबरीचा असतो एक आचार्य ! हा ज्ञानदाता एक पिता. इथंवर असे कोष्टकासारखे बरोबरीचे माप आहे. परंतु पुढे मातेच्या बाबतीत असे माप नाही. तर ‘सहस्त्र तु पितृन माता गौरवेणा तिरिच्यते ।’ म्हणजे हजार पित्यांपेक्षा माता श्रेष्ठ अशी गौरवाची भाषा उमटलेली आहे.

आच्र्य विनोबाजी तर म्हणतात “…माझ्या मते सर्व प्राथमिक शिक्षण जर स्त्रियांच्या हाती राहील, तर मुलांना योग्य वळण लागेल आणि समाजाला आवरण्याची शक्ति स्त्रियांमध्ये येईल. वस्तुतः लहान मुलांना शिकविण्याची अशी कोणत्याच प्रकारची पात्रता पुरुषात नाही. फार तर, मोठी मुले झाल्यावर पुरुषांनी शिकवावे. साहित्य शिक्षण व सांस्कृतिक समजली जाणीरी सारी क्षेत्रे स्त्रियांनी आपल्या हाती घ्यावी !

1 thought on “मुलांना गोष्टी कथा सांगाव्यात

Comments are closed.