मूर्ख लांडगा

एके रात्री, एका बाईचे हट्टी मूल फार रडू लागले. त्यास उगी करावे म्हणून त्याच्या आईने फार प्रयत्न केला, परंतु ते ऐकेना. शेवटी त्यास भय दाखवावे, म्हणून ती म्हणाली, ‘जर तू उगी राहिले नाहीस, तर तुला दारी लांडगा आला आहे त्याच्या स्वाधीन करीन.’ त्या वेळी एक लांडगा दारी खराच आला होता, त्याने ते ऐकले आणि बोलल्याप्रमाणे आई मुलास आपल्या स्वाधीन करील या आशेने तो तेथेच तिष्ठत बसला. शेवटी मूल रडता रडता थकले आणि झोपी गेले. मग त्या बिचाऱ्या लांडग्यास उपाशी रानात परत जावे लागले. वाटेत त्यास एक कोल्हा भेटला. त्याने विचारले, ‘मित्रा, तू खुशाल आहेस ना ?’ लांडगा उत्तर करितो, ‘गडया, ते काही विचारू नकोस; मी वेडा एका बाईचे खोटे बोलणे खरे मानून फसलो, आणि सगळी रात्र उपास आणि जागरण करून दुःख भोगले ?’

तात्पर्य:- एखादयाच्या तोंडून सहज निघालेल्या शब्दांवर एकाएकी विश्वास ठेवू नये. त्या शब्दांचा पुढचा मागचा संबंध काय आहे, हे न पाहता ते शब्द खरे आहेत असे मानून चालणे हा मूर्खपणा होय.