नाणी

इ. स. ६०० ते १५०० या मध्ययुगीन काळातील अस्थिरता व या भागातील राजकीय उलथापालथ यामुळे पाचव्या शतकानंतरचा फारच थोडा नाणेविषयक पुरावा मोळतो असे मानण्यास जागा आहे. अलीकडेच कलचुरी राजा कृष्णराज( सहावे शतक ) याची काही नाणी घारापुरीला सापडली आहेत. या प्रदेशावर राज्य केलेल्या श्रेष्ठ राष्ट्रकूटानीसुद्धा नाणी मागे ठेवलेली नाहीत. देवगिरीच्या यादवांनी ( बारावे व तेरावे शतक ) भावी पिढ्यांकरता काही शिक्क्यांची सुवर्ण पद्मांतके मागे ठेवली आहेत. शिक्क्यांवरची चित्रे सिंह, देवता, श्री, शंख, कमळ अशी प्रतीके असून शिवाय देवनागरी अक्षरे आहेत.

नवव्या शतकापासून अकराव्या शतकापर्यंत दख्खन व उत्तर राज्य केलेल्या शिलाहारांची नाणी कोल्हापूर व जवळपासच्या प्रदेशात सापडतात. सोन्याप्रमाणे त्यांनी चांदीचाही नाणी चालू केली होती. परंतु एवढी माहिती संपूर्ण अभ्यासात पुरेशी नाही.

देवगिरी (दौलताबाद) जिंकल्यावर खिलजी घराण्याच्या उल्लाउद्दिन महम्मद शहा (इ.स. १२९६-१३१६) याने त्या शहरात नाणी पाडली. महम्मद बिन तुघ्लक (इ.स. १३२५-१३५१) याने कुतुबाबादच्या नावाने देवगिरी येथून इ.स. १३२५-१३२७ मध्ये नाणी सुरू केली. पुढे इ.स. १३२७ मध्ये देवगिरी हे नाव काही काळ नाण्यांवर दिसू लागले, इ,स. १३२८ मध्ये त्याचे पुन्हा दौलताबाद करण्यात आले. नंतरच्या राज्यकर्त्यानी सुरू केलेल्या अनेक नाण्यांवर दौलताबाद टाकसाळ अनेकदा दिसते.

औरंगजेबानंतरच्या (इ.स. १६५८ते१७०७) नाणेविषक तिहास फार गोंधळाचा आहे. अनेक नाण्यांवर मोगल राज्यकर्त्यांची नावे असली तरी ती नाणी त्यांनी सुरू केलेली नाहीत. मोगल टाकसाळी मिळून जवळपास २०० टाकसाळीत मोगल राज्यकर्त्यांच्या नावे नाणी पाडली जात होती.

या नाण्यांवरून लक्षात येणाऱ्या महाराष्ट्रातील काही टाकसाळि म्हणजे औरंगाबाद, बालनगर, बलवनतनगर, चांदोर, चिंचवड, दौलताबाद, दिलशदाबाद, काल्पी, कंकोर्ती, कोल्हापूर, खुजिस्ता बुनयाद (औरंगाबाद), मुहियाबाद (पुणे), मुंबई, संगमनेर, सातारा, आणि सोलापूर येथील होत.

दुसरा महम्मद शहा (इ.स.१६५६-१६७२) याने दक्षिणेत प्रचलित असणाऱ्या चलनापेक्षा अगदी वेगळे चांदीचे चलन सुरू केले. ते मूळचे परदेशी नाणे. त्याला लारिन असे म्हणत. पर्शियाच्या आखाताच्या वरच्या बाजूत असलेल्या लार परगण्यात हे चलन प्रथम प्रचलित झाले आणि दर्यावर्दी अरब व्यापाऱ्यांमध्ये ते फार लोकप्रिय होते. प्रत्येक लारिन केसातील पिनेप्रमाणे मध्यभागी वाकवलेला केवळ एक चांदीचा तुकडा किंवा तार असे. अक्षरांसाठी लारिनवर फारच थोडा पृष्ठभाग असे. तरीसुद्ध, त्यापैकी बहुतेकांवर एका बाजूला सुलतान आदिल शहा आणि दुसर्‍या बाजूवर झर्ब लारि डांगि (किंवा दाबूल) सान हा मजकूर असे. कदाचित किनारपट्टीची पैशांची मागणी पुरवण्यासाठी ही नाणी पाडली गेली असावीत. १९१९ साली रत्नागिरी जिल्ह्यात दापोली इथे ३५९ चांदीच्या लारिनचा साठा सापडला.

छत्रपती शिवाजी (इ.स. १६२७-१६८०) आणि त्यांचे वंशज यांनी सोन्याची व तांब्याची नाणी सुरू केली. त्याचप्रमाणे दक्षिणेत तंजोर येथे स्थापित झालेल्या व्यंकोजीच्या-शिवाजीच्या भावाच्या- वंशाचे ही नाणी सुरू केली. शिवाजीच्या नाण्यांवर एका बाजूला नागरी लिपीत छत्रपती व दुसऱ्या बाजूला श्री राजा शिव असे शब्द आहेत. होन म्हणून ओळख्ली जाणारी हीनाणी दुर्मिळ आहेत. सभासदाच्या बखरीमध्ये शिवजीच्या खजिन्याचा घेताना ३२ प्रकारच्या सोन्याच्या नाण्यांचा आणि ६ प्रकारच्या चांदीच्य नाण्यांचा उल्लेख आहे भरपूर प्रमाणात सापडणाऱ्या तांब्याच्या नाण्यांवरही तीच अक्षरे आहेत. शिवाजीच्या वंशजांच्या नाण्यांवर एका बाजूला ‘छत्रपती’ हे बिरुद कायम ठेवलेले असून दुसऱ्या बाजूला श्री राजा शाहू किंवा श्री सरभराजा असे शब्द आहेत.