नाटक

मराठी नाटक घाशीराम कोतवाल,लेखक विजय तेंडूलकर

मराठी नाटकाचा संक्षिप्त इतिहास(Marathi Natak – History of Marathi Drama) सुसंगत सांगण्याचे काम तसे सोपे नाही. आणि त्या इतिहासातील सर्व टप्पे दृष्टीपथात आणणए, हे कामही तसे मोठे कष्टाचे आहे. ब्रिटिश सत्तेच्या आगमनापूर्वीचा मराठी साहित्याचा जो काही इतिहास उपलब्ध आहे, त्यात नाटकाचे कोठे नाव सुद्धा नाही; ही वस्तुस्थिती आहे. आणि त्या इतिहासातील नाटकाच्या अभावाने कारण पण नीटसे ध्यानात येत नाही. प्राचीन मराठी साहित्य हे तत्पूर्वीच्या संस्कृत साहित्याचे ऋणाईत आहे, हे सर्वश्रुतच आहे. पण‘काव्येषु रम्य’ असे जे ‘नाटक’ त्याची संस्कृत साहित्यात वाण नाही. भास, कालिदास व भवभूतीसारख्या प्रतिभाशाली नाटककारांनी संस्कृत साहित्य संपन्न केलेले आहे. पण आद्यकवी मुकुंदराजापासून तो मोरोपन्तापर्यंत असा एक लेखक नाही, की ज्याला एखाद्या श्रेष्ठ संस्कृत नाटकाचा मराठी अनुवाद करावा; असे वाटले.

प्राचीन मराठी साहित्यात नाटकाचा निर्देश नाममात्रही नसला, तरी नाटकाशी जवळीक साधू शकतील असे काही काही लोककलाविशेष त्या काळातही आढळतात. कठपुतळीचा खेळ, बहुरूपी, भारुड, लळित, गोंधळ, भजन, कीर्तन इ. लोकप्रिय लोककलाविशेष त्या काळातही अस्तित्वात होते. आणि त्याची दखल प्राचीन लेखकांनी घेतलेली दिसते. त्यांपैकी कीर्तन म्हणजे तर जणू काय एकपात्री नाटकच होते. कीर्तनाच्या उत्तररंगात कीर्तन्कार एखाद्या पौराणिक कथेचे निवेदन करीत असे, आणि त्या निवेदनातच देव आणि दानवम ऋषिमुनी आणि राजपुरुष, अप्सरा, राजस्त्रिया आणि साध्वी या सर्वांचीच सोंगे कीर्तनकार नाचगाण्याच्या मदतीने हुबेहूब वठवीत असत. पण तरी सुद्धा कीर्तन म्हणजे काही नाटक नव्हे. पण या कीर्तनानेच आद्य मराठी नाटककारांना नाट्यरचनेची प्रेरणा दिलेली दिसते,- पण ती सुद्धा अव्वल इंग्रजी अमदानीच्या मध्यकाळात.

आता ही गोष्ट तर खरीच आहे, की शहाजी राजांचे वारस असलेले कित्येक भोसलेकुलोत्पन्न राजे सोळाव्या शतकाच्या अखेरच्या दशाकापासून नाट्यरचनेत गुंतलेले दिसतात. पण हा भोसले वंश तिकडे दूर कर्नाटकात तंजावर येथे पोसलेला. या सुसंस्कृत राजांची नाट्यरचना संस्कृत नाट्यशास्त्राला अनुसरणारी असली , तरी त्या नाट्यरचनेत नृत्यगायनाला प्राधान्य होते. त्यातील पहिले लक्ष्मीकल्याण नाटक (इ. स. १७९०) . अर्थात या नाटकांचे प्रयोग हे एक तर सामान्य जनांपर्यंत कधी पोचले नाहीत. आणि दुसरे म्हणजे त्यांचे प्रयोग होत होते ते दूरस्थ कानडी मुलुखात. त्यामुळे त्यांचा कसला म्हणून परिणाम तदनंतरच्या मराठी नाटकावर झाल्याचे दिसून येत नाही, त्याचे आणखी एक कारण उघड आहे. तंजावरकर भोसले राजांच्या या नाटकांचा शोध इतिहासाचार्य राजवाड्यांना जेव्हा प्रथम लागला, तेव्हा मराठी नाटकाचे सुवर्णयुग चालू होते!

आता अशी एक सार्वत्रिक समजूत दिसते, की येथे महाराष्ट्रात मराठी भाषेत रचलेले पहिले नाटक म्हणजे सीता स्वयंवर (१८४३) होय. आणि हे नाटक रचणारे पहिले मराठी नाटककार विष्णुदास भावे (१८१९-१९०१) हे होत. सीता स्वयंवर नाटकाची मूळ प्रेरणा कानडी मुलखात रुढ असलेल्या यक्षगान नृत्यनाटकाची आहे, असे भावे यांनीच स्वतः स्वच्छ म्हटले आहे. पण त्या म्हणण्यातही काही एक खोच आहे. त्यांचे म्हणणे असे दिसते, की कानडी यक्षगान हा नृत्यविशेष नाट्यप्रकार मुळात तसा अगदी असंस्कृत होता. आणि सीता स्वयंवर हे त्या यक्षगानाचे सुसंस्कृत आणि श्रेयस्कर आसे नाट्यरुप आहे. त्यांचे म्हणणे काही असो; आज जी वस्तुस्थिती प्रत्ययास येते, ती अशी आहे की भावे यांची (एकूण ५५) नाटके मुळात तशी नाटकाची प्राथिमक अवस्था दर्शवणारी अशीच आहेत. त्या नाटकांतून पौराणिक कथेचे निवेदन पद्यरूप करीत असे. आणि त्या पद्यातील आशय जवलपासचे नट मूकाभिनयातून व्यक्त करण्याचा यत्न करीत असत.

हे जे भावे-नाटक होते, त्यात सांगितलेली पौराणिक गोष्ट रूढ कीर्तनपरंपरेतील असे. आणि त्या गोष्टीचे सूत्र जोडणारी जे वर्णनपर गाणी असत ती पुन्हा कीर्तनपरंपरेतीला अनुसरणारी अशीच असत. आणि या भावे-नाटकाचा एकूण रागरंग कीर्तनातील आख्यानाचाच असे. वस्तुस्थिती अशी आहे की ज्याला सर्वार्थाने केवळ मराठी नाटक म्हणता येईल, असे नाटक भावे नाटकानंतर कित्येक दशकांनी उदयास आले. आणि त्या अस्सल मराठी नाटकाचा तत्पूर्व भावे नाटकाशी तसा काही एक सबंध नव्हता.