नाटक

ज्याला अस्सल मराठी नाटक म्हणून संबोधिता येईल अशा नाटकाचे आद्य प्रवर्तक अण्णासाहेब किर्लोस्कर (१८४३-१८८५) हे होत. किर्लोस्करांनी कविकुलगुरू कालिदासाच्या अजरामर शाकुंतलाचे मराठी रूपांतर १८८० साली केले. आणि त्या मराठी ‘शाकुंतला’चा पहिला प्रयोग म्हणजे (नंतरच्या काळात लोकप्रिय झालेल्या) संगीत नाटकाची गंगोत्री होय. या प्रयोगात जवळपास शंभर पदे होती. आणि या पदांची रचना ओवी, लावणी, साकी, दिंडी इ. रूढ छंदांना अनुसरणारी होती. या नाटकाबाबत असे म्हणता येईल, की किर्लोस्कर त्यांचे पूर्वसूरी जे भावे त्यांचे ते काही एक देणे लागत नव्हते. अनुवादित शाकुंतला नंतर किर्लोस्करांनी सर्वस्वी स्वतंत्र असे सौभद्र नाटक रचले. आणि खरे तर असे म्हणता येईल, की या सौभद्र नाटकाने तदनंतरच्या अर्धशतकातील मराठी नाटकाचा इतिहास घडवला.

सौभद्र हे एक अग्रगण्य असे संगीत नाटक आहे. आणि त्याची सर्वाधिक लोकप्रियता आजतागायत अबाधित आहे. सौभद्र नाटकातील संगीताची मोहिनी आजही मराठी रसिकतेला झपाटून टाकते. सौभद्रचा आणखी एक विशेष असा आहे, की त्या नाटकाच्या जडणघडणीत प्राचीन संस्कृत व अर्वाचीन इंग्रजी नाट्यरीतीने संमिश्र असे एक विलक्षण रसायन आहे. सौभद्र कथाभागाचा मूलाधार म्हणजे महाभारत-भागवतातील कथांचाच होय, पण सौभद्राची रचना मात्र इंग्रजी भाषेतील ‘लाइट कॉमिडी’ या नाट्यविशेषाला अनुसरणारी आहे. पण असे असले, तरी त्यातील गीतसंगीत हे मात्र शुद्ध मराठी मातीचे आहे. ‘सौभद्र’ आणि (अपूर्ण) रामराज्यवियोग या किर्लोस्करांच्या दोन्ही नाटकात पण विशेषकरुन दुसऱ्या नाटकात-तत्कालीन सामाजिक घटनांचे संदर्भ आढळून येतात.

स्वतःला बलवत्पदनत असे साभिमान म्हणवणारे देवल (१८८५-१९१६) यांनी गुरुवर्य किर्लोस्करांप्रमाणेच प्रथम विक्रमोर्वशीय (१८८१) आणि मृच्छकटिक (१८९०) या संस्कृत नाटकांचे मराठी संगीतनुवाद केले. त्याशिवाय ऑथेल्लो नाटकाचे झुंजारराव (१८९०) हे त्यांचे रूपान्तरही प्रसिद्ध आहे. पण देवलांची खरी ख्याती आहे. ती तदनंतरच्या शारदा (१८९९) व संशयकल्लोळ (१९१६) या भिन्न प्रकृतींच्या नाटकांसाठी. शारदा नाटकात त्या काळातील हुंडा-जरठकुमारी विवाह आणि प्रामुख्याने असहाय्य अशा वधूची दयनीय अवस्था अशा काही काही सामाजिक समस्यांचे चित्रण आहे; तर ज्याची परिणती फार्समध्ये होते पण ज्याचे मूळ रूप हलक्या फुलक्या कॉमेडीचे आहे अशा संशयकल्लोळची गणना मराठी भाषेतील उत्तमोत्तम संगीत नाटकांत होते. शारदा नाटकातील नानाविध व्यक्तिचित्रे आणि त्यातील व्यक्तित्वानुरूप असे संवाद व संशयकल्लोळ मधील कधी न कोमेजणारा विनोद आणि या दोन्ही नाटकांतील अस्सल मराठी गीतसंगीत यांसाठी देवलांचे नाव मराठी नाट्येतिहासात अजरामर झालेले आहे.

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर (१८७२-१९३४) यांनी वीरतनय (१८९६) आणि मूकनायक (१९०१) सारख्या काही काही रोमॅन्टिक कॉमिडीज एका काळी रचलेल्या आहेत. आणि त्यांपैकी काही काही त्या काळात लोकप्रियही होत्या. पण कोल्हटकरांची खरी ख्याती आहे ती त्यांच्या नाटकातील औत्तरीय किंवा फारसी चालींवरच्या पदांसाठी. पण त्यांची सर्वच नाटके पराकाष्ठेची कृत्रिम असल्यामुळे त्या नाटकांची लोकप्रियता त्या काळापुरतीच मर्यादित होती.

खाडिलकर (१८७२-१९४६) हे मातबर नाटककार आहेत, आणि मराठी रंगभूमीचे सुवर्णयुग म्हणून ज्या कालखंडाचा (१९१०-१९२०) सतत निर्देश केला जातो, त्या सुवर्णयुगाचे ते एक शिल्पकार होत. दुसरे म्हणजे बालगंधर्व. ते एक अलौकिक प्रतिभेचे संगीत नट होते. खाडिलकर हे लोकमान्य टिळकांचे कट्टर अनुयायी आणि सहकारी. त्यामुळे त्यांच्या कीचकवध (१९०७), मानापमान (१९११), व स्वयंवर (१९१६) सारख्या नाटकांतून लोकमान्य टिळकांच्या तत्कालीन राजकारणाचा सावेश पुरस्कार आढळतो. उन्मत्त ब्रिटिश राज्यकर्ते व पददलित भारतीय जनता यांच्यातील संघर्ष हा त्यांच्या बहुतेक सर्व विषय असतो. अर्थातच त्यांची ही नाटके म्हणजे तत्कालीन राजकारणाची रूपके होत. मुळात ते गद्य नाटकांचे लेखक, पण कालांतराने ते संगीत नाटकांकडे वळले. अभिजात रागदारीच्या नाट्यगत संगीतासाठी विशेष करून त्यांची ख्याती आहे. हे नाट्यसंगीत जोपर्यंत नाटकाच्या लगामी व संयत होते, तोपर्यंत संगीत नाटकाची काही एक शान होती. पण रंगमंचावर जेव्हा मुळात गायक असलेला नटांचा गाण्याच्या मैफली रुजू व्हायला लागल्या. तेव्हापासून संगीत नाटकाच्या ऱ्हासाला सुरुवात झाली. खाडिलकर-बालगंधर्व युतीच्या काळात संगीत हेच मराठी नाटकांचे प्रधान आकर्षण व भूषण ठरणे क्रमप्राप्तच होते. जे संगीत नाटकाला उपकारक असायला हवे, तेच संगीत नाटकाचे सर्वस्व म्हणून या काळात समजले जाऊ लागले. आणि अल्पावधीतच नाटकासाठी संगीत ही रास्त व्यवस्था लोप पावली, व संगीतासाठी नाटक ही नवी व्यवस्था रूढ झाली. आणि शेवटी या नव्या व्यस्थेनेच संगीत नाटकाचा बळी घेतला.