नाटक

उपर्युक्त सर्व नाटकारात राम गणेश गडकरी यांचे स्थान यासम हा असे अनन्यसाधारण आहे. गडकऱ्यांची पहिली ख्याती प्रतिभाशाली कवी ही होय, आणि नंतरची त्यांची सर्व नाटके त्यांच्या व्यक्तित्वविशेष अशा काव्यशैलीने नटलेली आहेत. विनोदकार म्हणूनही ते विख्यात होतेच. परिणामी त्यांची चार संपूर्ण व एक अपूर्ण अशी नाटके काव्यविनोदच्या अतिरेकाने ग्रासलेली आहेत. पण हा एक असा नाटककार आहे की, ज्याला आपल्या नाट्यविशेषांची व तज्जन्य नाट्यदोषांची जाणीव व जाण होती. आणि तो आपल्या नाटकांना सुधारण्याच्या यत्नात सदैव गढलेला दिसतो. गडकऱ्यांची अखेरची दोन नाटके, पैकी एक भावबंधन (१९१९) ही कॉमिडी व एकच प्याला (१९१९) ही ट्रॅजिडी ही रसिकमान्य आहेत. आणि तदनंतरच्या कित्येक नाटकांवर या नाटकांचे संस्कार स्पष्ट उमटलेले दिसतात. त्यांचे राजसन्यास हे अपूर्ण नाटक मराठी साहित्यातील शेक्सपीरियन ट्रॅजिडीचा अद्वितीय असा साक्षात्कार मानला जातो. साहित्यानिर्मितीच्या ऐन उमेदीतच या प्रतिभाशाली नाटककाराला मृत्यूने गाठले, ते जगते वाचते तर महत्तम मराठी नाटककार ही पदवी त्यांना सहज प्राप्त होती.

वरेरकर (१८८३-१९६४) हे उपर्युक्त सर्व नाटककारांचे समकालीन होत. पण त्यांच्यापैकी कोणत्याही एका मोठ्या नाटटकाराचा आदर्श त्यांनी आपल्या डोळ्यांसमोर वागवलेला दिसत नाही. केवळ स्वतःचीच अशी एक नाट्यशैली त्यांनी घडवली. हा एकचएक नाटककार असा आहे की, ज्याने प्रचलित रजकिय व सामाजिक घटनांचे उद्‍घाटन आपल्या नाट्यकृतींतून अव्याहत केलेले आहे. वरेरकरांची नाटकाची कारकीर्द प्रदीर्घ होती. त्यांचे दुर्दैव असे की लेखनाच्या ऐन उमेदीतच मराठी रंगभूमीवर वज्राघात झाला. पण तरी सुद्धा आपल्या प्रदीर्घ आयुष्याच्या अख्रेरीपर्यंत त्यांनी आपल्या नाट्यलेखनात कधी खंड पडू दिला नाही. हाच मुलाचा बाप (१९१७) हे हलके-फुलके सामाजिक नाटक, सत्तेचे गुलाम (१९२२) हे महात्मा गांधीच्या तत्कालीन राजकीय तत्त्वज्ञानाचा उद्‍घोष करणारे राजकीय नाटक, सोन्याचा कळस (१९३२) हे गिरणी मालक व गिरणी कामगार यांचा संघर्ष चित्रित करणारे पहिलेच नाटक, सारस्वत (१९४२) हे साहित्यविषयक समस्यांवरचे गंभीर नाटक आणि भूमिकन्या सीता (१९५५) ही उत्तररामचरिताची एक नवी व वेगळी वादळी ट्रॅजिडी, – या वरेरकरी नाटकांचा निर्देश केल्याविना मराठी नाट्येसहित पुरा होऊ शकणार नाही. आपल्या नाटकांच्या प्रयोगातील नेपथ्याबाबतही ते सदैव दक्ष असत.

मुके चित्रपट बोलू लागले आणि बोलपटांचा नवा जमाना सुरू झाला, तेव्हा मराठी रंगभूमीचे सर्व सूत्रभार मोठ्या आशेने सिनेमाकडे वळले. आणि १९३२ नंतरच्या पंचवीस वर्षाचा कालखंड म्हणजे मराठी नाटकाच्या मूर्च्छनेचा कालखंड होय. या काळात एकूण एक सर्व नाट्यगृहांचे रूपांतर सिनेमा थिएटर्समध्ये झाले. आणि व्यावसायिक नाटक जसे एकाएकी वनवासी झाले. पण हाच कालखंड प्रयोगिक नाटकासाठी उपयुक्त ठरला. वर्तकाचे (१८९४-१९५०) आंधाळ्यांची शाळा (१९३३) हे असे पहिले लक्षणीय प्रायोगिक नाटक की ज्याच्या परिणामी मराठी रंगमंचावर एक अभूतपूर्व असे इब्सेनयुग अवतरले. तत्पूर्वीचे अर्धशतक हे संगीत नाटकाचे होते. आणि ते शेक्सपीअरयुग म्हणून संबोधले जात होते. पण वस्तुस्थिती अशी आहे की मराठी नाट्यशतकाच्या पूर्वार्धात शेक्सपीअर असो की उत्तरार्धात इब्सेन, या उभयतांनी मराठी नाटकाच्या रचनेसाठी एक एक सांगाडा काय तो पुरवला. या युगप्रवर्तक नाटककारांच्या मूलभूत नाट्यसत्वाचे अनुकरण मराठी नाटकात अभावानेच काय ते आढळते. मराठी नाटाकाने त्यांची नाट्यरचनाच काय ती स्वीकारली. त्यांच्या नाट्याशयाबाबत ते सदैव उदासीनच राहिले.

आंधळ्यांची शाळा हे नाटक म्हणजे मराठी नाट्येतिहासातील एक योजनस्तंभ आहे. या नाटकाच्या परिणामी मराठी नाटक पुष्कळच बदलले. तत्पूर्वीचे मराठी प्रायशः रोमॅन्टिक होते तर तदनंतरचे मराठी नाटक वास्तववादी आहे. हा वास्तववाद जसा नाट्याशयात व्यक्त होतो. तसाच तो नाट्यप्रयोगातही व्यक्त होतो. पूर्वार्धातील बालगंधर्व किंवा मा. दीनानाथांसारखे मोठे नट त्यांच्या स्त्रीभूमिकांसाठी गाजले होते. तर आंधळ्यांची शाळा या नाटकापासून स्त्रीभूमिकांसाठी सुसंस्कृत नटी उपलब्ध होऊ लागल्या. आणि हा बदल इतका महत्त्वाचा होता की, त्याच्या परिणामी नाट्यवस्तूतील बदलही अपरिहार्य ठरला.

मराठी रंगभूमीच्या या पडत्या काळात मराठी रंगभूमी जीवन्त ठेवण्याचे श्रेय प्रमुख्याने दोन नाटककारांचे आहे. हे दोन नाटककार म्हणजे अत्रे व रांगणेकर हे होत. अत्र्यांनी साष्टांग नमस्कार (१९३३) सारखी हलकीफुलकी विनोदी नाटके जशी रचली आहेत, त्याचप्रमाणे घराबाहेर (१९३४) आणि उद्याचा संसार (१९३६) सारखी गंभीर प्रकृतीची सामाजिक नाटकेही त्यांनी रचलेली आहेत. आणि लग्नाची बेडी (१९३६) सारख्या अत्र्यांच्या नाटकात या दोन्ही प्रवृत्तींचे एक विलक्षण संमिश्रण आढळते. रांगणेकरांनीही (१९०७) कुलवधू (१९४२) सारखी कित्येक लोकप्रिय नाटके रचलेली आहेत. त्यांच्या कौटुंबिक नाटकांचे नादमधुर संगीत व सुख्द विनोद हे आकर्षक घटक होत. बदलत्या काळाची निदर्शक अशी त्यांची हलकीफुलकी नाटके एका काळी लोकप्रिय होती. आणि तो काळ पुन्हा असा, की जो मराठी नाटकाच्या लेखी कठिण होता.