नाटक

व्यावसायिक मराठी नाटकाला जेव्हा असे वाईट दिवस आले होते, तेव्हा ज्यांच्या डोळ्यासमोर प्रायोगिक नाटकाची स्वप्ने तरळत होती असे काही नाटककार, दिग्दर्शक, नट-नटी आणि तंत्रज्ञ एकत्र येऊन नाटकाच्या भल्यासाठी काय करत येईल याचा विचार करीत होते. आणि त्यांच्यापैकी काहींनी मुंबईत कलाकार व रंगायन, पुण्यात प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिस्टस्‌ असोसिएशन आणि नागपुरात रंजन कलामंदिर सारख्या नाट्यसंस्थांची स्थापना केली होती. त्यांचा उद्देश मराठी नाट्कात आमूलाग्र क्रान्ती घडवून आणण्याचा होता. या काळात मुंबईचे माधव मनोहर (१९११), पु, ल, देशपांडे (१९१९) व विजय तेंडुलकर (१९२८) आणि नागपूरचे पुरुषोत्तम दारव्हेकर (१९२७) यांनी आशयगर्भ अशा कित्येक उत्तमोत्तम पाश्चात्त्य नाटकांचे मराठी अनुवाद केले. आणि आत्माराम भेंडे, पु. ल, देशपांडे, विजया खोटे व पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी या नाटकांचे प्रयोग मोठ्या जाणकारीने सादर केले. याच कालावधीत वसंत कानेटकरांनीही वेड्याचे घर उन्हात (१९५७) नावाचे एक स्वतंत्र मनोविश्लेषणपर नाटक लिहिले, आणि भालबा केळकरांनी पी. डी. ए -साठी या नाटकाचा मोठा देखणा असा प्रयोग सादर केला. आणखी एका महत्त्वाच्या नाट्यघटनेचा येथे निर्देश करायला हवा. रंगायनपूर्व काळात इब्राहिम अल्काझी हा एक नाटकांचे इंग्रजी प्रयोअ तो मोठ्या हिमतीनेम जेथे मोकळी जागा उपलब्ध असेल तेथे, करून दाखवीत होता. मध्यावधीतील अशा काही काही प्रायोगिक नाटकांच्या प्रयोगांचा उत्तरकाळातील व्यावसायिक रंगभूमीला मोठाच हातभार लागणार आहे, हे त्या काळात कोणाला सांगूनही खरे वाटले नसते. पण प्रत्यक्षात जे घडले ते मात्र असे की, या काळातील प्रायोगिक नाटकाच्या आंदोलनानेच तदुत्तर काळातील व्यावसायिक रंगभूमी आकारास आली. आणि आज परिस्थिती अशी आहे की व्यावसायिक नाटककार, दिग्दर्शक, नट-नटी व अन्य नाट्यतज्ञ हे सर्वच पूर्वकाळातील प्रायोगिक रंगमंचावर कसलेले होते. आणि तेच आजच्या व्यावसायिक नाटकचे शिल्पकार आहेत.

प्रायोगिक मराठी नाटक कळत-नकळत संघटित होत होते, त्याच काळात मराठी प्रेक्षकांना अतिशय आवडणारी अशी कौटुंबिक नाटकेही होत होतीच. आणि नागेश जोशी (१९१५-१९५८), बाळ कोल्हटकर (१९२६) व मधुसुदन कालेलकरांसारखे (१९२४) काही नाटककार देवमाणूस (१९४५), दिवा जळू दे सारा रात (१९६२) अशी काही लोकप्रिय नाटके लिहित होत. आणि त्यांचे प्रयोगही उत्साहभरात झडत होते. कालेलकर व कोल्हटकर हे दोघेही आजतागायत नवी नवी नाटके लिहीत आहेत, आणि त्यांच्या प्रयोगाच्या प्रेक्षकांची प्रेक्षकांची वाण कधी पडत नाही. ग्रीक पुराणांतील फिनिक्स नावाचा एक पक्षी स्वतःला जाळून घेतो आणि त्या ज्वलनाच्या रक्षेतून अधिक तेजस्वी रूपात अवरतो, तीच गत मराठी नाटकाची झालेली दिसते. दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडून एका काळी वनवासी झालेले मराठी नाटक आज पुन्हा एकदा जनसंमर्दात स्थिर व प्रतिष्टित झालेले दिसते.

आजच्या व्यावसायिक रंगमंचावर अनेक नव्या नव्या नाटककारांची वर्दळ आढळत असली, तरी त्यांच्यात एक प्रतिभाशाली नाटककार असा आहेकी जो खाडिलकर-गडाकऱ्यांच्या नाटकांचे ऋण मनापासून मानतो आहे, आणि त्यांच्या नाटकांचा श्रद्धापूर्वक जपतो आहे. हा नाटककार म्हणजे ‘कुसुमाग्रज’ शिरवाडकर, (१९१२). पूर्वसूरी गोविंदाग्रजांप्रमाणेच कुसुमाग्रजही आधी कवी आणि मग नाटककार वगैरे सर्व काही आहेत. त्यांच्या नाटकातील संवादभाषा गद्य असली, तरी ती सदैव काव्यमय असते. आणि त्यांच्या नाटकांचा आशय परंपराप्राप्त मूल्यभावांचे स्मरन करून देणारा असतो. शिरवाडकरांच्या नाटकी कारकीर्दीची सुरूवात दूरचे दिवे (१९४६) या अनुवादित नाटकाने झालेली असली, आणि नंतरही वैजयंती (१९५०) हे शिरवाडकरांचे सर्वाधिक लोकप्रिय नाटक ‘किंग लीयर’ची आठवण करून देणारे असले, तरी त्याची काव्यात्म प्रकृती नाटककाराच्या स्वत्वविशेष शैलीची द्योतक आहे. शिरवाडकरांनी कौन्तेय (१९५३) व ययाति आणि देवयानी (१९६८) यांसारखी पौराणिक व दुसरा पेशवा (१९४७) आणि वीज म्हणाली धरतीला (१९७०) यांसारखी ऐतिहासिक नाटकेही रचलेली आहेत. आणि ती सर्व त्यांच्या शैलीविशेषाची द्योतक आहेत. ‘मॅक्‌बेथ ’ व ‘ऑथेल्लो’ या शेक्सपेअरच्या नाटकांचे शिरवाडकरांनी केलेले उत्कृष्ट अनुवाद (अनुक्रमे १९५४ व १९६१) हे तर निरंतर संस्मरणीय असे आहेत.

वसंत कानेटकर (१९२३) हे आजकालच्या व्यावसाहिक नाटककारात अग्रगण्य होत. आजवर तीसपेक्षा अधिक नाटके त्यांनी रचलेली आहेत. आणि त्यांच्यापैकी काही नाटकांनी मराठी नाटकाला नवी दिशा दाखवलेली आहे. वेड्याचे घर उन्हात (१९५७) हे त्यांचे पहिलेच नाटक पूर्वप्राप्त नाटकांपेक्षा अगदी वेगळे असे मनोविश्लेषणपर आहे. त्या नाटकातील पिता-पुत्र संघर्ष हा अनोखा असा आहे. व्यवसायपरत्वे प्रतिष्ठित असलेला हा नाटककार वृत्तिपरत्वे प्रयोगशील आहे. आणि महत्त्वाची गोष्ट त्याने आपल्या नाटकाला कोणत्याही एका साच्यात बंदिस्त करून टाकलेले नाही. त्याच्या नाट्यकृतींची विविधता केवळ आश्चर्यकारक अशी आहे. प्रेमा तुझा रंग कसा (१९६१) सारखी एक अप्रतिम कौटुंबिक कॉमिडी त्याने ज्याप्रमाणे रचली आहे, त्याचप्रमाणे मत्स्यगंधा (१९६४) सारखे पौराणिक आणि रायगडाला जेव्हा जाग येते (१९६२) सारखे ऐतिहासिक नाटकही त्याने रचले आहे. या नाटकाचे एअक वैशिष्टय असे की, त्यातील छत्रपती शिवाजी व संभाजी हे महाराज व युवराज नसून सामान्य पिता व पुत्र आहेत, आणि तरीही त्या उभयतांची असामान्यता गृहीतच आहे. लेकुरे उदंड झाली (१९६६) सारख्या एका नाटकात त्याने संगीत रचनेचा जो नवा प्रयोग केला आहे. तो नाट्यसंगीत परंपरेचा विचार करता अनोखा व नवा असा आहे. हिमालयाची सावली (१९७२) व कस्तुरीमृग (१९७६) सारखी मोठी चारित्रिक नाटकेही त्याने रचलेली आहेत अणि अगदी अलीकडच्या काळात शेक्सपीअरचे सुप्रसिद्ध ट्रॅजिडीचतुष्टय गगनभेदी (१९८२) या एकाच नाटकत चित्रित करण्याचा त्यांचा महत्त्वाकांक्षी यत्न विस्मयजनक आहे.

विजय तेंडुलकर (१९२८) या बंडखोर नाटककाराचे प्रमुख कर्तृत्व म्हणजे सुप्तावस्थ मराठी नाटकाच्या शरीरात नवे रक्त अन्तर्भूत करण्याचे होय. श्रीमन्त (१९५५) व शान्तता! कोर्ट चालू आहे (१९६८) याम्सारखी अनुवादित नाटके त्यांनी रचलेली असली, तरी त्यांची सर्व स्वत्वविशेष नाटके ही प्रामुख्याने ‘सेक्स’ आणि ‘व्हायोलेन्स’ या दोन प्रवृतींची चित्रविचित्र दर्शने घडवणारी आहेत. गिधाडे (१९७१), सखाराम बाइन्डर (१९७२), बेबी (१९७५) आणि मित्राची गोष्ट (१९८२) ही अशा प्रकारची काही नाटके. वादग्रस्त वादळी विषयांचे या नाटककाराला काही विशेष आकर्षण आहे, असे दिसते. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे कन्यादान (१९८३) होय. उदात्त आदर्श व विदारक वास्त्व यांतील संघर्ष तर या नाटकात आहेच, पण त्याच्या जोडीला ब्राह्मण-दलित विवाहाची एक अस्वस्थ करणारी झलक पण त्यात आहे. आजचे कमला(१९८२) हे या प्रवृत्तीचे आणखी एक ज्वालाग्राही उदाहरण. त्यांचे आणखी एक लोकप्रिय अनैतिहासिक नाटक म्हणजे घाशीराम कोतवाल (१९७२) हे, या लोकविलक्षण नाटकाचे प्रयोग महाराष्ट्राबाहेर इतरत्र या देशाताच केवळ नव्हेत, तर युरोपमध्येही कित्येक ठिकाणी झडलेले आहेत. विजय तेंडुलकर हा असा एकमेव मराठी नाटककार आहे की ज्याच्या कित्येक नाटकांचे कित्येक भारतीय भाषातून अनुवाद झालेले आहेत आणि नाटककार म्हणून ज्याची ख्याती अखिल भारतीय आहे.