नाटक

जयवंत दळवी (१९२५) या नाटककाराला नाटककार म्हणून ख्याती लाभली ती संध्याछाया (१९७४) या एका संयत ट्रॅजिडीच्या परिणामी. ज्यांचा एकुलता एक मुलगा स्वदेशी कधी परत न येण्यासाठी म्हणून परदेशी गेलेला आहे, अशा एक वयोवृद्ध दाम्पत्याचे ही कहाणी नोठी हृदयस्पर्शी होती. पण दळवींना खरी लोकप्रियता लाभली ती त्यांच्या बॅरिस्टर (१९७७) या रोमॅन्टिक नाटकामुळे. हे नाटक रोमॅन्टिक असले, तरी ते मनोविकृतीचेही निदर्शक आहे. अलीकडच्या काळातील दळवींची बहुतेक सर्वच नाटके काही ना काही कामविकृतीची द्योतक अशी आहेत. उदाहरणार्थ महासागर(१९८०), पुरुष (१९८३) व पर्याय (१९८४).

आजच्या काळातील आणखी एक लोकप्रिय नाटककार म्हणजे रत्नाकर मतकरी (१९३८) हा होय. अश्वमेध (१९८०), दुभंग (१९८१), खोल खोल पाणी (१९८३) यांसारखी त्याची कित्येक नाटके प्रस्तुत निर्देशयोग्य ठरावीत अशी आहेत. हा एकच एक नाटककार असा आहे की, जो व्यावसायिक व प्रायोगिक अशा उभयविध रंगमंचावर कार्यक्षम आहे. लोककथा‘७८ (१९७९) या त्याच्या प्रायोगिक नाटकात आदिवासी मुलखातील अजाण जमातींवर जे नानाविध अत्याचार होतात, त्यांचे हृदयस्पर्शी असे चित्रण आहे. ब्रह्महत्या (१९६) प्रेमकहाणी (१९७२), लोकथा’७८ आणि आरण्यक (१९७५) सारखी मतकरींची प्रायोगिक नाटके त्यांच्या व्यावसायिक नाटकांइतकीच महत्त्वाची आहेत. मतकरींचा आणखी एक विशेष त्यांनी त्यांच्या नाट्यलेखनाच्या सुरुवातीपासूनच बालनाट्याला वाहून घेतले आहे. आणि निम्मा शिम्मा राक्षस (१९६३) सारखी त्यांनी लहान मुलांसाठी लिहिलेली नाटके उल्लेखनीय होत.

एका काळी प्रायोगिक नाटक हे विलक्षण कार्यक्षम होते, पण आज मात्र परिस्थिती अशी आहे की, तेच प्रायोगिक नाटक आज नामशेष झाल्यातच जमा आहे. गेला काही वर्षे दादरमधील छबिलदास सभागृहात प्रायोगिक नाटकाचे अधिष्ठान होते व आहे. आणि तेथे अच्युत वझे, गो. पु, देशपांडे, वृन्दावन दंडवते व श्याम मनोहर यांसारख्या उदयोन्मुख नाटककारांच्या नाट्यकृतींचे सुरेख प्रयोग झालेले आहेत. सत्यदेव दुबे, श्रीराम लागू, अरविन्द देशपांडे. अमोल पालेकर, दिलीप कोल्हटकर व जयदेव हट्टंगडी यांसारख्या तोलामोलाच्या तालेवार दिग्दर्शकांने आपल्या प्रायोगिक नाट्यकृती येथे सादर केल्या होत्या. पन आज मात्र दुर्दैवाने हा प्रायोगिक रंगमंच-कारणे काही असोत- निष्क्रिय झालेला दिसतो. संभव आअहे की आज त्याची गरज संपली असेल, आणि उद्या जेव्हा केव्हा त्याची गरज भासेल तेव्हा रंगमंच पुनश्च पहिल्याप्रमाणेच कार्यक्षम होईल.

कदाचित असेही असेल की प्रामुख्याने मुंबईतच लाभलेल्या प्रायोगिक नाटकाला अन्य दिशा गवसल्या असतील. गेल्या कित्येक वर्षांपासून महाराष्ट्र शासन मराठी नाटकांच्या स्पर्धा आयोजित करीत आहे. आणि या स्पर्धांतून जी नाटके सादर केली जातात, त्यांचे प्रयोग केवळ मोठ्या शहरांतूनच नव्हेत, तर मागासलेल्या विभागातूनही दरसाल सादर होत असतात, आणि या नाट्यस्पर्धांतून जी नवी नवी नाटके प्रयोगरूपात सादर केली जातात, त्या नाटकांचे लेखक-दिग्दर्शक व अन्य सर्व कलाकार हे प्रायशः अज्ञात असे असतात. पण जेथे कोठे त्या नाटकांचे प्रयोग प्रथम झडत असतात तेथे प्रायोगिक नाटकाचे मूळ धरले आहे असे समजण्यास प्रत्यवाय नाही.

मराठी नाटकाच्या प्रस्तुतच्या संक्षिप्त इतिहासाचा प्रारंभ तंजावरकर भोसले, विष्णुदास भावे व अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या नाटकांनी केलेला होता. या सर्व नाटकांच्या नाभिस्थानी गीतसंगीत होते. आणि किर्लोस्करांच्या शाकुंतल-सौभाद्र नाटकांपासून जे अस्सल मराठी संगीत नाटक प्रस्थापित झाले, त्या संगीत नाटकाची परंपरा तदनंतरची पन्नास वर्षे अखंड विद्यमान होती. त्यानंतर मराठी नाटकाला काही काळ फार वाईट दिवस आलेम आणि एकाएकी संगीत नाटकाची वैभवशाली परंपरा खंडित झाली. तदनंतर मराठी नाटकाचे जे पुनरुज्जीवन झाले, त्यात संगीताचा धागा अजिबात तुटला. आणि केवळ गद्य नाटकांच्या प्रयोगांनी मराठी रंगभूमी मराठी गजबजून गेली. मध्यावधीत संगीत नाटकाला जसे ग्रहण लागले होते. डॉ. भालेराव या नाटकवेड्या माणसाच्या एकाकी यत्नांनी परंपराप्राप्त संगीत नाटकाचे प्रयोग अल्प काळ झडत राहिले. पण तोपर्यंत बालगंधर्वांसारखे संगीत नट वृद्ध आणि क्षीण झालेले होते. आणि संगीत नाटकाचे हे अल्पकालीन पुनरुज्जीवन बघता बघता कालोदधीत लुप्त होऊन गेले.