नाटक

घाशीराम कोतवालचा प्रयोग लोकनाटकाच्या शैलीतील असेला, तर तीन पैशाचा तमाशा मधील संगेताचा ढंग पाश्चात्त्य पॉप-म्यूझिकचा होता. त्यापेक्षा सर्वतोपरींनी वेगळा असा ऐन मराठी ढंगाचा प्रयोग सतीश आळेकरांनी (१९५०) आपल्याच महानिर्वाण (१९७४) नाटकात केला. महानिर्वाणमध्ये हिन्दू और्ध्वदैहिक विधींचे व चालीरीतींचे औपहासिक विडंबन आहे. त्यातील संगीताचा घाट आहे तो प्रामुख्याने कीर्तन-भजनाचा. याही नाटकाला उदंड लोकप्रियता लाभली आहे. पण ती ‘घाशीराम’ सारखी सार्वत्रिक नव्हे, तर महाराष्ट्रापुरती प्रादेशिक अशी.

या तथाकथित नव्या संगीत नाटकाच्या संबंघातील एक सुचिन्ह असे की, हे जे नवे आहे ते जुन्यालाच भक्तिभावे अनुसरणारे आहे. उदाहरणार्थः विजया मेहता ही मूलतः सदैव नव्याच्या शोधात असणारी एक ‘न्यू-वेव्ह’ नाटकांची दिग्दर्शिका, पण तिचा नवा छंद हा आधुनिक नाट्यसंहिताना परंपराप्राप्त लोकनाटकाचे रंगरूप देण्याचा आहे. काही वर्षांपूर्वी शाकुन्तल व मुद्राराक्षस या संस्कृत नाटकांच्या मराठी अनुवादांचे प्रयोग तिने प्राचीन नाट्यशास्त्रोक्त नेपथ्यरचनेत बंदिस्त करून घडवले होते. त्याचप्रमाणे ब्रेख्तच्या ‘कॉकेशियन चॉक सर्कल’चा खानोलकरकृत अनुवाद अजब न्याय वर्तुळाचा (१९७३) तिने तमाशाच्या शैलीत सादर केला होता. सर्वाधिक उल्लेखनीय असा तिचा प्रयोग म्हणजे हयवदन या नाटकाचा होय. गिरीश कर्नाड यांचे सुप्रसिद्ध इंग्रजी नाटक मुळात गद्यरुप आहे. पण हयवदनची गोष्ट म्हणजे मुळात एक लोककथाच आहे. विजया मेहता यांनी या नाटकाचा जो नवा मराठी अनुवाद सिद्ध केला तो अशा हेतूने की, त्याच्या प्रयोगात नानाविध लोक नाट्यप्रकारांचे दर्शन घडवता येईल. घाशीराम प्रमाणेच हयवदनलाही युरोपियन प्रेक्षकांचा अनुकूल प्रतिसाद लाभलेला आहे.

छान्दस नाटकांचा विषय चालू आहे तर त्याबाबत आणखी एअक गोष्टीचा निर्देश येथे करायला हवा. पु. शि. रेगे (१९१०-१९७८) यांची ख्याती वस्तुतः एक अग्रगण्य कवी म्हणून आहे. पण त्यांनी रंगपांचालिक व कालयवन सारखी छान्दस रचलेली आहेत. पैकी रंगपांचालिकचे काही प्रयोग दिल्ली येथील राष्ट्रीय नाट्यशाळेच्या विद्यार्थ्यांनी केलेले होते. पण रेगे यांच्या छान्दस नाटकांकडे अजून नाटकवेड्यांचे लक्ष गेलेले दिसत नाही. कविवर्य रेगे यांची ही छान्दस नाटके एकांकरूप आहेत. तर रत्नाकर मतकरी यांचे आरण्यक (१९७५) हे छान्दस नाटक मोठ्या नाटकाचा परिपूर्ण ऐवज देणारे आहे. या नाटकात महाभारतातील धृतराष्ट्र, विदुर, गांधारी व कुंती या वयोवृद्धांच्या अन्तिम महानिर्वाणाचे दर्शन घडते. हे संपूर्ण नाटक छान्दस शैलीतील आहे. आणि त्यातील संसृतिटीका मनोज्ञ आहे.

परंपराप्राप्त असे जे संगीत नाटक होते. त्यातील संगीत हा केवळ एक अविभाज्य असा घटक होता. पण शेवटी तो घटकच तर आज असे दृश्य दिसते की काही प्रतिभाशाली नाटककार व दिग्दर्शक हे एका नव्या प्रकारच्या संपूर्ण संगीत नाटकाच्या शोधात आहेत. पन तरी सुद्धा विद्यमान मराठी नाटक हे प्रायशः गद्यरुप आहे. ही वस्तुस्थितीहे ध्यानात घ्यायला हवी असो.

आज परिस्थिती अशी आहे की अन्य भारतीय भाषातील नाटकांवरचा मराठी नाटकाचा संस्कार उल्लेखनीय आहे. संभव आहे की आजचे मराठी नाटक हे अखिल भारतीय भाषांतील सर्वाधिक प्रगत असे नाटक आहे. तेव्हा मराठी माणसांना आपल्या या संपन्न मराठी नाटकाच्या प्रदीर्घ परंपरेचा रास्त अभिमान आहे. आणि मराठी रंगभूमीची सद्यःस्थिती इतकी संपन्न आहे की, मराठी माणसांनी आजच्या नाटकाचाही अभिमान अधिकारपरत्वे जरूर मिरवावा.