निरपराधी पाय

चार तरुणांनी एकत्र येऊन कापसाचा व्यापार सुरु केला, ‘ जो काही नफ़ा व तोटा होईल, तो चौघांत सारखा वाटून घ्यायचा’ असं ठरवलं. बाहेरगावहून येणाऱ्या कापसाच्या गासड्या ठेवण्यासाठी त्यांनी एक गुदामही बांधला.व्यापार चांगला चालू लागला, पण गुदामात उंदीर झाले आणि ते गासड्या कुरतडून कापसाची नासाडी करु लागले. अखेर उंदराच्या समाचारासाठी मांजर पाळण्यात आले.

‘मांजराच्या खाण्या-पिण्याचा खर्च चौघांनी सारखा वाटून घ्यायचा, त्याच्या पोटाला, पाठीला, शेपटीला वा तोंडाला काही दुखापत झाली, तर त्यावरच्या औषधपाण्याचा खर्चही चौघांना समसमान वाटून घ्यायचा, मात्र त्या मांजराच्या एकेका पायाची सर्व जबाबदारी एकेकाने घ्यायची असे ठरले.

एके दिवशी गुदामात इकडे तिकडे पळत असलेल्या उंदरावर झडप घेताना ते मांजर पडले आणि त्याचा एक पाय मोडला. त्या चार भागीदारांपैकी ज्याने मांजराच्या त्या पायाची जबाबदारी आपल्यावर घेतली होती. त्याने स्वखर्चाने त्या पायाला औषध लावून, एका चिंधीने त्याला वेष्टून टाकले.

दुसऱ्या दिवशी, त्या गुदामाला लागून असलेल्या रखवालदाराच्या खोलीतील चुलीजवळून जाताना, त्या मांजराच्या पायाला बांधलेल्या चिंधीला विस्तव लागला व तिने पेट घेतला. त्याबरोबर घाबरुन गेलेले ते मांजर त्या पेटत्या चिंधीसह गुदामात शिरले व सैरावरा धावू लागले. त्याच्या पायाच्या त्या पेटत्या चिंधीच्या स्पर्शाने त्या गुदामातील कापसाने पेट घेतला, आणि कापसासह त्या गुदामाची व रखवालदाराच्या खोलीची राखरांगोळी झाली.

मांजराच्या चिंधी बांधलेल्या ज्या पायामुळे एवढे नुकसान झाले, त्या पायाची जबाबदारी घेतलेल्या भागीदाराने आपणा प्रत्येकाला नुकसानभरपाई दाखल १५००० रुपये द्यावेत यासाठी बाकीच्या तीन भागीदारांनी त्याच्याविरुध्द न्यायालयात दावा केला.

त्या वेळी न्यायाधीश असलेल्या तेनाली रमण याने चौघांचेही म्हणणे शांतपणे ऎकून घेतले आणि त्या नुकसानभरपाई मागणाऱ्या तीन भागीदारांना विचारले, ‘त्या मांजराचा जो पाय मोडला होता व त्यामुळे ज्याला चिंधीने गुंडाळले गेले होते, त्या पायने ते चालू शकत होते का ?’ते तिघेही भागीदार म्हणाले, ‘छे छे! ते मांजर तो दुखावलेला पाय वरच्याचर उचलून घेऊन बाकीच्या तीन पायांवर इकडे तिकडे जात होते.’रमणने पुन्हा विचारले, ‘मग त्या मांजराच्या दुखऱ्या पायावरच्या चिंधीन पेट घेतल्यावरसुध्दा ते उरलेल्या तीन पायांनीच त्या गुदामत गेले असणार नाही का ?”अर्थात ! त्या भागीदारांनी एका सुरात उत्तर दिलं.

त्यांचं ते उत्तर ऎकून चतूर रमण म्हणाला, ‘मग कापसाच्या गुदामाला आग लावून या एकंदरीत नुकसानीला तो चिंधी बांधलेला पाय कारणीभूत झालेला नसून, त्या पायाला गुंडाळलेली चिंधी पेटली असतानासुध्दा त्या पायाला त्या गुदामात घेऊन जाणारे बाकीचे चांगले शाबूत असलेले तुमच्या वाट्याचे त्याचे उरलेले तीन पायच जबाबदार आहेत. तेव्हा तुम्ही तिघांनी मिळून त्या तुमच्या निरपराध असलेल्या चौथ्या भागीदाराला १५००० रुपये नुकसानभरपाई म्हणून द्या.’