भाज्यांचे भाव अजूनही महागच

भाजी बाजार

भाजी बाजार

राज्यभरात पावसाने काही ठिकाणी हजेरी लावल्यानंतरही फळ आणि पालेभाज्यांचे भाव कडाडले आहेत. ५० रुपयांच्या भावात हिरवी मिरची आणि कांदापात घरात पोहोचला आहे. कोथिंबीर, पालक आणि मेथीसह अन्य पालेभाज्या महाग झाल्या आहेत. टोमॅटो आणि काकडीचा भाव उतरु लागला आहे. पाऊस सुरु झाल्यानंतर भाज्या स्वस्त होण्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज व्यर्थ ठरला आहे. आवक वाढेपर्यंत भाज्या तेजीत राहण्याची शक्यता आहे.
दोन महिन्यात फळ आणि पालेभाज्यांचे भाव उन्हाच्या कडाक्यामुळे वाढले होते. असे सांगण्यात आले होते की, मान्सूनचे आगमन झाल्यानंतर आठवड्याभरात भाज्यांचे भाव उतरतील. विविध जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांत पाऊस झाला. पण अजूनही आवक वाढली नसल्याने भाज्यांचे भाव कडाडलेच आहेत. पालेभाज्यांचे भाव दर्वर्षी जूनच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात उतरतात. मात्र, आता जून महिना संपत आला असूनही भाज्यांचे भाव उतरलेले नाही. २२ ते २५ रुपये हा भाव कोथिंबीरीच्या जुडीचा आहे तर मेथीच्या आणि पालकाच्या जुडीचा भाव १० रुपये आहे. घाऊक बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितले की, भाज्या महाग झाल्या आहेत कारण पाऊस होऊनही बाजारात माल कमी आहे.
घाऊक बाजारातील व्यापारी विलास भुजबळ म्हणाले की, ‘रविवारी १४० ते १५० गाड्या फळ आणि पाले भाज्यांची आवक गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात झाली. दरवर्षी भाज्यांची आवक जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून वाढते. पण पाऊस लांबल्याने यंदा आवक कमीच आहे. आवक सुरळीत तेव्हाच होईल जेव्हा पाऊस नियमित पडेल. सर्व भाज्यांचे भाव त्यानंतर आटोक्यात येतील.’