राज यांनी फोडली महाराष्ट्र धर्माची डरकाळी

राज ठाकरे

राज ठाकरे

पोलिसांवर हल्ला करणे आम्ही कधीही सहन करणार नाही. मग तो माणूस कोणत्याही धर्माचा असो, त्याला फोडून काढा. आझाद मैदानाजवळील जो हिंसाचार झाला त्यात जखमी झालेले पोलिस हे महाराष्ट्रातील माझे मराठी बांधव होते. मी फक्त महाराष्ट्र धर्मच जाणतो. आमच्या धर्माच्या आडवे याल तर याद राखा,’ अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पोलिसांवर हल्ला करणाऱ्या दंगेखोरांना तसेच बांगलादेशीनविरुद्ध डरकाळी फोडून आझाद मैदान पेटवून दिले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आझाद मैदानानजीक पोलिसांवर आणि प्रसिद्धिमाध्यमांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आझाद मैदानाजवळ मोर्चा आयोजित केला होता. या मोर्चाचे रुपांतर सभेत झाले जेव्हा हा मोर्चा गिरगाव चौपाटीवरुन आझाद मैदानात पोहोचला. मोर्चेकऱ्यांची रांग मरिन ड्राइव्ह ब्रिजवरच होती जेव्हा राज सभेच्या ठिकाणी केव्हाच पोहोचले होते.

राज यांनी पोलिसांवरील हल्ल्याचा मुद्दा काढला. ‘पोलिसांवरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठीच्या माझ्या मोर्चाला परवानगी मिळत नाही आणि रझा अकादमीच्या मोर्चाला मात्र परवानगी मिळते. जेव्हा पोलिस भगिनींवर अत्याचार सुरु होते आणि पोलिसांवर मारहाण सुरु होती तेव्हा प्रतिकार करण्याचे आदेशच त्यांना त्यावेळेस दिले गेले नाही. पोलिसांचे नीतिधैर्य वाढविण्यासाठी मात्र मी आज रस्त्यावर उतरलो आहे’, असे ठणकावून सांगत, आर. आर. पाटील व अरुप पटनाईक यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही राज यांनी केली.

यावर गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे म्हणणे आहे की, ‘माझ्या राजीनाम्यासाठी मनसेने काढलेला मोर्चा राजकीय होता व राजकीय हेतूने राजीनाम्याची मागणी केली होती. त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच येथे उभा राहत नाही.’ दरम्यान राज यांनी अरुप पटनाईक यांच्या राजीनाम्याची मागणी करताच, मुंबईचे आयुक्तपद अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) डॉ. सत्यपालसिंह यांच्याकडे देण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा मंगळवारी रात्री सुरु झाली. त्या प्रकारचे एसेमेसही संबंधित वर्तुळातून सर्वत्र पाठविण्यात आले.