२६/११ हल्ल्यामागे पाकचाच हात

पी. चिदंबरम आणि अबू जुंदल

अबू जुंदलच्या चौकशीतून स्पष्ट झाले आहे की, मुंबईचा २६/११ दहशतवादी हल्ला तडीस नेण्यासाठी पाकिस्तानात नियंत्रण कक्ष तयार केले गेले होते. शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषद झाली व त्यात गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी सांगितले की, हे नियंत्रण कक्ष सरकारच्या मदतीशिवाय उभारले जाऊ शकत नाही. त्यामुळे या कटामागे पाकिस्तानाचाच हात असल्याचा त्यांनी ठामपणे पुनरुच्चार केला. अबू जुंदलच्या अटकेतून बरीच माहिती मिळण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, ‘२६/११ च्या हल्ल्यासाठी जे नियंत्रण कक्ष उभारले गेले होते त्यात अबू जुंदलबरोबर इतरही जण होते आणि ‘लष्कर-ए-तैयबा’चा प्रमुख हफीज सईद सुद्धा होता असा आमचा अंदाज आहे.’

जे अतिरेकी या कटात सहभागी होते त्यांचे प्रशिक्षण एका ठिकाणी आणि नियंत्रण कक्ष एका ठिकाणी होते. साधनसामग्री तेथे पुरवली गेली होती. हे काम सरकारच्या मदतीशिवाय होऊच शकत नाही. अर्थात या कटामागे नेमकी कोणती व्यक्ती होती, हे अबूची चौकशी पूर्णत्वाला गेल्यावरंच समजेल, असे त्यांनी सांगितले.