पाणबुडा पक्षी

पाणबुडा नामक एका जातीचे पक्षी आहेत, ते पाण्यात उडया मारून मासे धरून खातात. एका पाणबुडयाने, आपण पारध्याच्या हाती सापडू नये म्हणून आपले घरटे, नदीकाठच्या एका झाडावर बांधले होते. एके दिवशी तो पक्षी आपल्या पिलांसाठी भक्ष्य शोधण्यास बाहेर गेला असता, नदीस अकस्मात्‌ पूर येऊन पाणी इतके चढले की, त्यात त्या पक्ष्याचे घरटे पिलांसकट वाहून गेले; काही वेळाने तो पक्षी त्या जागी येऊन पाहतो तो घरटे व पिले नाहीशी झाली आहेत, असे त्यास आढळून आले. मग तो आपल्याशीच म्हणतो, ‘केवढा मी दुर्दैवी ! एका शत्रूस चुकविण्यासाठी मी येथे येऊन राहिलो, तोच दुसऱ्या शत्रूच्या तडाक्यात सापडलो.’

तात्पर्य:- एका संकटातून निभावण्याचा प्रयत्न करीत असता, कधी कधी दुसरेच एखादे संकट येऊन पुढे उभे राहते.