पांडित्य सत्कारणी लावा

पांड्य राजाच्या पदरी असलेल्या पंडीत कोलाहल याची बुध्दी असामान्य होती. त्याच्याकडे येणाऱ्या पंडिताने एखादे असत्यच नव्हे, तर सत्य विधान जरी केले, तरी पंडीत कोलाहल हा आपल्या तरल कल्पकतेच्या जोरावर, ते विधान असत्य असल्याचे सिध्द करी.

आपल्या पदरी असलेल्या या पंडिताचा पांड्य राजाला मोठा अभिमान वाटत होता, म्हणून त्याने एक पण जाहीर केला, ‘जो कोणी माझ्या समक्ष या माझ्या पंडीत कोलाहलांचा बोलण्यात पराभव करील, त्याला एक हजार सुवर्ण मोहोरा तर देण्यात येतीलच, पण त्याशिवाय त्याची दरबारात, पंडीत कोलाहल शास्त्र्यांच्या जागी नेमणूक केली जाईल.’

राजाने केलेला हा पण सर्वत्र जाहीर झाल्याने, देशोदेशीचे गाढे विद्वान त्याच्या दरबारी आले, पण पंडीत कोलाहल यांच्याकडून ते पराभूत झाल्याने, शरणागती लिहून देऊन परत गेले !

एकदा भाष्याचार्य नावाचे पंडित आपला पट्टशिष्य यमुनाचार्य याच्यासह पांड्य राजाच्या दरबारी आले. भाष्याचार्य आपला पराभव करण्यासाठीच आले असल्याचे समजताच पंडीत कोलाहल पुढं आला आणि म्हणाला, ‘ भाष्याचार्य ! तुम्ही कोणतंही विधान करा; मी ते खोटं असल्याचं सिध्द करुन दाखवीन.’

‘खरं असलं, तरीही ते खोटं असल्याचं तुम्ही सिध्द कराल का?’ भाष्याचार्यांनी प्रश्न केला.
पंडीत कोलाहल म्हणाला, ‘अर्थात ! ते तर माझ्या अचाट बुध्दीचं वैशिष्ट्य आहे.’

भाष्याचार्यांनी आव्हान दिलं, ‘मग बाप हा अगोदर आणि नंतर मुलगा हे माझं विधानं खोटं असल्याचं सिध्द करा पाहू?’

यावर पंडीत कोलाहल म्हणाला, ‘तुमचं म्हणणं साफ़ चुकीचं आहे. ‘मुलगा हा अगोदर आणि नंतर बाप’ ही वस्तुस्थिती आहे. जोवर मुलगा झालेला नसतो, तोवर त्या माणसाला कुणी बाप म्हणत नाही. एखाद्याला मुलगा झाल्यानंतरच त्याला बाप म्हटल जातं म्हणजे अगोदर मुलगा आणि नंतर बाप. तेव्हा भाष्याचार्यजी ! तुम्ही मला निमूटपणे शरणागती लिहून द्या आणि इथून निघून अजा.’

आपल्या गुरुचा शरणागती लिहून देण्याकडे कल झुकला असल्याचे पाहून शिष्य यमुनाचार्य पुढे सरसावून म्हणाला, ‘पंडीत कोलाहल शास्त्रे ! बुध्दीच्या जोरावर ही तुम्ही केवळ शाब्दीक कसरत चालविली आहे. तरीही मी तीन विधाने करतो, ती खोट असल्याचं जर तुम्ही सिध्द केलतं, तर मी तुम्हाला नुसतीच शरणागती लिहून देणार नाही, तर मी तुमचा अजन्म सेवक होईन. मात्र तुम्ही माझे विधाने खोडू शकला नाहीत, तर राज दरबारातील ही वैभवशाली नोकरी सोडून आपलं पुढलं उर्वरीत आयुष्य तुम्ही अशिक्षीतांना व गोरगरिबांना शिक्षण देण्यात घालवाल का ?’

पंडीत कोलाहलांनी होकार देताच, पंडित यमुनाचार्य म्हणाला, ‘माझं पहिलं विधान असं आहे की, तुम्ही ज्यांच्या आश्रयाला आहात ते पांड्य महाराज भरतखंडाचे भूषण आहेत,
माझं दुसरं विधानं असं आहे की, पांड्य महाराजांची राणी सुनीतीदेवी ही थोर पतिव्रता आहे,
‘आणि माझं तिसरं विधानं असं आहे की, पांड्य महाराज व राणी सुनीतीदेवी यांना देवानं शतायुषी करावं, अशी तुमची, माझीच नव्हे, तर सर्व प्रजेची मनोमन इच्छा आहे.’

‘यमुनाचार्य ही जी तीन विधाने केली, पांड्य महाराजांच्या समोर खोडून काढणं म्हणजे मृत्युला आमंत्रण आहे:’ हे हेरुन पंडीत कोलाहलाने ती विधाने मान्य केली; तरुण यमुनाचार्याला शरणागती लिहून दिली आणि राजदरबारातील नोकरी सोडून, तो अशिक्षित व गरीब लोकांना सुशिक्षित करण्यासाठी उरलेलं आयुष्य खर्च करण्य़ासाठी निघून गेला.