पाणी गढूळ करणारा कोळी

एका कोळ्याने आपले जाळे नदीत टाकले आणि माशांस भिववून जाळ्यात आणावे म्हणून, एका लांब कठीने तो नदीचे पाणी गढूळ करू लागला. शेजारी काही लोक राहात होते, त्यापैकी एक असमी येऊन त्या कोळ्यास म्हणाला, ‘अरे, तू जो इतक्या जोराने पाणी बडवीत बसला आहेस, याचे कारण काय बरे ? तुझ्या ह्या कृत्यामुळे आमचे पिण्याचे पाणी गढूळ होत आहे, हे तुला दिसत नाहीत नाही काय ?’ कोळी उत्तर करितो, ‘गडया, मला फक्त इतकेच समजते की, मी तुमचे पाणी गढूळ तरी केले पाहिजे एक, किंवा मासे न मिळाल्यामुळे उपाशी तरी राहिले पाहिजे एक, याशिवाय दुसरा मार्ग नाही.’

तात्पर्य:- काही लोक इतके स्वार्थी आणि बेपर्वा असतात की, स्वतःच्या अल्प फायदयासाठी दुसऱ्याचे कितीही नुकसान झाले, तरी ते करण्यास चुकत नाहीत.