पारधी आणि कवडा

एकदा एक कवडा एका पारध्याच्या जाळ्यात सापडला. तेव्हा तो दीनवाणीने पारध्यास म्हणतो, ‘दादा, मला जर तू कृपा करून सोडून देशील तर मी दुसऱ्या पुष्कळ कवडयास फसवून ते तुज्या जाळ्यात सापडतील असे करीन.’ हे ऐकून पारधी म्हणतो, ‘अरे, तुला सोडून दयावे अशी माझी इच्छा नव्हतीच. पण आता तर, तू दयेस मुळीच पात्र नाहीस, हे तुझ्या भाषणानेच सिद्ध झाले. जो नीच प्राणी स्वतःच्या बचावासाठी आपल्या भाऊबंदांस संकटात पाडण्यास तयार होतो, त्याला मरणापेक्षाही भयंकर शासन असले पाहिजे, असे मला वाटते.’

तात्पर्य:- स्वार्थासाठी स्वजनाचा नाश करण्यास प्रवृत्त होणाऱ्या माणसासारखा नीच माणूस दुसरा नाही.