पारधी आणि पारवा

एक पारवा एका पिंपळाच्या झाडावर बसला असता, त्यास मारण्यासाठी एक पारधी हाती बंदूक घेऊन त्या ठिकाणी आला. त्याने आपल्या बंदुकीचा नेम धरला व आता तो गोळी सोडणार, इतक्यात त्याच्या पायाखाली एक साप सापडला होता, तो त्यास कडकडून चावला. विष चढू लागताच पारध्याने आपल्या हातातली बंदूक टाकून दिली आणि तो म्हणाला, ‘दुसऱ्याचा जीव घेण्याचा मी प्रयत्न करीत असता, दुर्दैवाने माझाच जीव जाण्याचा प्रसंग आला. हे जशास तसेच झाले, यात संशय नाही.’