पशुआहार

वासारांचा आहार –

जन्मल्याबरोबर वासरास मातेचे दूध अर्थात चीक पाजणे आवश्यक आहे. कारण त्यातील रोग प्रतिबंधक घटकांमुळे वासरांचे बालवयात होणाऱ्या रोगांपासून संरक्षण होते. शिवाय जन्मल्यानंतर ६ तासाचे आत हे चीक अन्ननलिकेत शोषून घेण्याची क्षमता जास्त असते. वासरास किमान १ महिन्यापर्यंत मातेचे दूध पाजावे. दूध पाजण्याचे प्रतिदिन प्रमाण त्याच्या वजनाच्या अंदाजे १/१० एवढे असावे व ते एकाच वेळेस न देता दिवसातून २/३ वेळा विभागून पाजावे. दूध पाजण्याच्या वेळेतील अंतर सारखे ठेवावे. या काळात वासराला माती दूध मिळाल्यास त्याची वाढ चांगली होते. वयाच्या दुसऱ्या आठवड्यापासून वासराला प्रथीनयुक्त गोवत्स आहार ( काफ स्टार्टर) देण्यास हळूहळू सुरूवात करावी. अशा प्रकारे चौथ्या आठवड्यापर्यंत संपूर्ण दूध बंद करून गोवत्स आहार द्यावा. हा आहार वासरास ६ महिन्यांपर्यंत देता येतो, अशा प्रकारे वासरांच्या संगोपनावरील खर्च कमी करता येईल. बाजारात गोवत्स आहार “काफ स्टार्टस” या नावाने तयार सुद्धा मिळतो किंवा घरीच गोवत्स आहार तयार करावयाचा असल्यास भरडलेला मका-६०%, भूईमूग, सोयाबीन किंवा तिळाची पेंड -३०%, गव्हाचा कोंडा-७%, क्षार, खनिज मिश्रण-२%, व खाण्याचे मीठ- १%, असे मिश्रण तयार करून त्यात प्रति १०० किलो खाद्यात २० ग्रॅम जीवनसत्व ‘अ’ व ‘ड’ असलेली पावडर मिसळावी. वासरू २ ते ३ आठवड्याचे झाल्यानंतर, त्याला कोवळे लुसलुशीत गवत देण्यास सुरूवात करावी. यामुळे त्याच्या रवंथ करणाऱ्या पोटाची वाढ लवकर होते.

पशुसाठी चारा –

प्रत्येक जनावरांची खाद्यातील शुष्क पदार्थ खाण्याची ठरावीक गरज असते. साधारणपणे वजनाच्या २ ते२.५ टक्के शुद्ध पदार्थ जनावराला त्याच्या आहारातून पुरविले पाहिजेत. यासाठी त्याच्या आहारात वाळलेला चारा असणे आवश्यक ठरतो. रवंथ करणाऱ्या जनावरांचे पोट मोठे असते. ते संपूर्ण भरल्यानंतर त्यास भूक मिटल्याचे समाधान मिळते. मोठ्या जनावरांमध्ये हिरव्या चाऱ्याचा अंतर्भाव करणे फायदेशीर आहे. त्यातून जनावराला ‘अ’ जीवनसत्त्वाचा पूरवठा होवून त्याचे डोळे, कातडी त्वचा सतेज होते शिवाय रोग प्रतिकार शक्ती वाढून उत्पादनाची पातळी टिकविण्यास मदत होते. हिरव्या चार्‍यातून जनावरास पोषक द्रव्ये अगदी ताज्या स्वरूपात मिळतात. यामुळे आरोग्य चांगले टिकून रहाते. चाऱ्यातून जनावराला चांगल्या प्रमाणात प्रथीणे व इतर पोषक द्रव्ये मिळवण्यासाठी हिरवा चारा देताना, त्यात द्विदल चारा जसे, लुसर्न, बर्सिम किंवा मूग, भुईमूग, उडीद यासोबत कडधान्य चारा मका, ज्वारी इत्यादिचे १:३ प्रमाणात मिश्रण करावे. केवळ द्विदल चारा पोटभर खाऊ घातल्याने सुद्धा अपचनाचा व पोटफुगीचा त्रास जनावरास होवू शकतो. चारा तसाच जनावरासमोर न टाकता तो कुटी करून दिल्यास चारा वाया जाण्याचे प्रमाण कमी होते शिवाय अशा कुटी केलेल्या चाऱ्याची पाचकता जास्त असते.

उत्पादक पशुचा आहार –

देशी गायीला सव्वा किलो तर संकरित गायीला व म्हैशीला दिड ते पावणे दोन किलो तयार संतुलित पशूखाद्य केवळ शरीर पोषणासाठी लागते. या व्यतिरिक्त प्रत्येक दोन ते अडीच लिटर दूध उत्पादनासाठी एक किलो पशु खाद्य अतिरिक्त दिले पाहिजे. म्हणेज आपल्या दुधाळ जनावराकडून चांगले उत्पादन मिळू शकेल. गाभण काळाच्या सातव्या महिन्यापासून शरीर पोषणा व्यतिरिक्त एक किलो पशुखाद्य अधिक द्यावे. यामुळे गर्भाची वाढ योग्य प्रकारे होते व जन्मणारे वासरू सुद्धा चांगल्या वजनाचे राहाते. याशिवाय पुढील दूध उत्पादन टिकविण्यास मोलाची मदत होते.

पशुखाद्याचा वापर –

बाजारात विविध कंपन्याचे पशुखाद्य तयार स्वरूपात मिळते. हे खाद्य संतुलित असून जनावराची आवश्यकता लक्षात घेऊन बनविलेले असते. वासरे, भाकड जनावरे व दुधाळ जनावरे यांच्यासाठी वेगवेगळे खाद्य कंपनी बनवित असते. वासरासाठी काफ रेशन, भाकड जनावरांसाठी ड्राय रेशन, दुधाळ जनावरांसाठी मिल्क रेशन तर १० लिटर पेक्षा जास्त दूध देणाऱ्या गाई म्हैशीसाठी स्पेशल मिल्क रेशन बाजारात मिळते.

खनिज व क्षार मिश्रणाचा वापर –

बाजारात उपलब्ध असलेल्या चांगल्या दर्जाच्या खनिज व क्षार मिश्रणात (मिनरल मिस्क्चर) जनावरास आवश्यक. असे घटक असतात. खनिज व क्षाराच्या आहारातील अभावामुळे जनावरास बरेच आजार होवू शकतात ज्यामुळे दूध उत्पादन कमी होते. वंध्यत्व येते, जनावर व्यवस्थित माजावर येत नाही. हे सर्व टाळण्यासाठी जनावराच्या १ किलो खाद्यात अंदाजे खनिज व क्षार मिश्रण पावडर (मिनरल मिक्स्चर) टाकणे आवश्यक आहे.