पायांस साखळी बांधलेला कावळा

एका शेतकऱ्याने एक डोमकावळा पकडला आणि त्याच्या पायास एक साखळी अडकवून तो आपल्या मुलांस खेळावयास दिला. त्या स्थितीस तो डोमकावळा इतका कंटाळला की, एके दिवशी संधी साधून तो तेथून साखळीसकट उडाला आणि रानात गेला. तेथे एका झाडाच्या फांदीस ती साखळी अडकल्यामुळे त्यास उडता येईना व त्यामुळे तो तेथेच भुकेने तडफडून मरण पावला. मरतेवेळी तो म्हणाला, ‘अशा प्रकारे रानांत येऊन भुकेने मरण्यापेक्षा, माणसाची गुलामागिरी करणे पत्करले.’