२० मिनिटांचे भाषण एक परफेक्ट राज निती

राज ठाकरे

राज ठाकरे

मुंबईतल्या आझाद मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भरवलेली जाहीर सभा आणि त्याआधी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेला मोर्चा या दोन्ही गोष्टी म्हणजे चाणक्यनितीचे उत्तम उदाहरण. ११ ऑगस्टला रझा अकादमीच्या मोर्चानंतर जो काही धुडगूस झाला त्याचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा होता. या मोर्चानंतर आणि राज ठाकरे यांच्या भाषणानंतर आता राजकीय पक्ष आणि त्यांचे कथित विश्लेषक या सार्‍याचा अर्थ काढत बसले आहेत. प्रत्येकाला यात काही वेगळा वास येतोय. ‘आम्ही आधी आंदोलन केले, राज ठाकरे मागाहून आले,’ असे सांगत कुणी नेता आपल्या पक्षाकडे श्रेय घेऊ पाहतोय; राज ठाकरे आज जे काही करताहेत ते मूळात आपल्या पक्षाने, आपल्या पक्षाच्या नेत्यानी पूर्वी केव्हाच केलंय, असं कुणाला वाटतंय; तर राज ठाकरे सतत आपल्या पक्षाची दिशा बदलताहेत, असे कुणी सुचवू पाहतोय.

चर्चेच्या या सार्‍या गुर्‍हाळातून आठवण येते ती हत्ती आणि सात आंधळे या गोष्टीची. राज ठाकरे यांनी मोर्चा काढला हे खरे, त्यांनी मुंबईकरांना जिंकले हे खरे आणि अवघ्या पोलिस दलाची (किमान कनिष्ठ पातळीवरच्या पोलिस कर्मचार्‍यांची – जे पोलिस दलात संख्येने सर्वाधिक आहेत त्यांची) सहानुभूती मिळवली हेही खरे. रझा अकादमीच्या मोर्चानंतरचा हिंसाचार आणि त्यावर मुंबई पोलिस दलाच्या नेतृत्वाची (मग त्यात वरिष्ठ पोलिस अधिकारी, गृहखाते, पोलिस दलावर नियंत्रण ठेवणारे गृहसचिव हे सारे आले) प्रतिक्रिया यावर अन्य विरोधी पक्षांनी ज्या तीव्रतेने टीका केली त्यापेक्षा राज ठाकरे यांच्या कालच्या मोर्चाची आणि भाषणाची तीव्रता कितीतही पटीने अधिक होती, हे देखील तितकेच खरे. विश्लेषकांनी आपापल्या परीने कितीही श्लेष काढले तरी राज ठाकरे आपल्या उद्दीष्टात यशस्वी झाले हे यातले सत्य आहे.

राजकीय बुद्धीबळाच्या पटावर खेळलेल्या एकाच चालीत अनेक गोष्टी साध्य करण्याची ‘राज’निती, कालच्या घटनेतून स्पष्ट होते. सत्ताधार्‍यांनी जे करायल हवे होते ते त्यांनी केले नाही, हे राज यांनी कालच्या भाषणातून स्पष्टपणे दाखवून दिले. विरोधी पक्षांनी जे करायला हवे होते ते त्यांनी केले नाही, याचीही अप्रत्यक्ष जाणीव आपल्या कृतीतून त्यांनी करुन दिली. मुंबई पोलिस दलात कनिष्ठ पदांवर काम करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांबद्दल आत्मियता दाखवतानाच राज ठाकरे यांनी या पोलिसांच्या कुटुंबियांच्या मनातही स्वतःचे एक स्थान निर्माण केले असणार हे नक्की. मुंबई पोलिस दलात जे कर्मचारी आहेत त्यापैकी बहुसंख्य कर्मचारी कोकण आणि पश्चिम-दक्षिण महाराष्ट्रातून आलेले आहेत. हे पोलिस, त्यांचे कुटुंबीय, सगोसोयरे आणि गावी असलेले नातेवाईक, मुंबईत रोजगार कमवायला कोकणातून आलेले चाकरमाने आणि गावाकडे असलेली त्यांची पाती या साऱ्यांची सहानुभूती ही, ‘मिशन २०१४’च्या दृष्टीने राज ठाकरे यांनी केलेली उत्तम गुंतवणूक आहे, असेच म्हणायला हवे.

पोलिस दलाला स्वायत्तता द्यावी, ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. पण कुठल्याच सत्ताधार्‍यांनी; मग कधीकाळी जे सत्तेत होते आणि आज विरोधात आहेत त्यांनीही; याकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. कारण भक्कम पोलिस दल नियंत्रणाखाली असणे, हा सत्तास्थान भक्कम करण्याचा एक मार्ग आहे, अशीच आजवरच्या सत्ताधार्‍यांची ठाम भावना आहे. पण जर पोलिस खात्यातच अस्वस्थता असेल तर?

राज ठाकरे यांच्या भाषणानंतर प्रमोद तावडे या पोलिस कर्मचार्‍याने व्यासपीठावर जाऊन राज यांना फूल देणं हे या अस्वस्थतेचेच प्रतीक आहे. राज्य सरकारने काही भक्कम उपाययोजना केल्या नाहीत तर पोलिस दलातली वरीष्ठ पातळीवरची फळी आणि कनिष्ठ कर्मचारी यांच्यातली दरी भविष्यात वाढत जाईल, याचे संकेत या घटनेतून मिळत आहेत. ही अस्वस्थता चव्हाट्यावर आणण्याचे कामही राज ठाकरे यांच्या भाषणाने साध्य झाले आहे.

रझा अकादमीचा मोर्चा, त्यानंतरचा हिंसाचार; राज यांचा कालचा मोर्चा आणि त्यानंतर त्यांनी केलेले भाषण या साऱ्या घटना विचार करायला लावणाऱ्या आहेत. आता जे कुणी ‘मिशन २०१४’ची तयारी करत असतील त्या सार्‍यांनाच या घटनेतून बोध घेत आपल्या चाली बदलायला लागतील. किंबहूना या चाली बदलायला लावण्याची किल्ली राज ठाकरे यांनी काल फिरवली असे म्हटले तर वावगे ठरू नये.