पेटीतला उंदीर

एक उंदीर, जन्मल्यापासून एका पेटीत रहात असे . पेटीबाहेर जग आहे, याची त्याला कल्पनाही नव्हती. घरची मालकीण पेटीत जे खाण्याचे जिन्नस ठेवीत असे, त्यातले थोडेथोडे जिन्नस खाऊन, त्याजवर तो उंदीर आपला चरितार्थ चालवीत असे. एके दिवशी तो काही कारणाने अकस्मात्‌ पेटीबाहेर पडला असता, तेथे काही चांगला खाण्याचा पदार्थ ठेविला होता तो त्याच्या दृष्टीस पडला. त्यातला थोडासा भाग चाखून पाहिल्यावर तो आपल्याशीच म्हणतो, ‘सागळे सुख काय ते पेटीत आहे, असे जे मी आजपर्यंत समजत होतो, तो माझा केवढा मूर्खपण बरे !’