अननसाचा हलवा

साहित्य:

  • १ किलो ताज्या अननसाचे लहान तुकडे
  • २५० ग्रॅम खवा
  • एक-दीड वाटी ताजी घोटलेली साय किंवा क्रीम
  • ५०० ग्रॅम साखर
  • ४ मोठे चमचे तूप
  • पाव चमचा केशर (ऐच्छिक)
  • १ वाटी पाणी
  • २-३ चमचे काजू बदामाचे पातळ काप

कृती:

अननसाचा हलवा

अननसाचा हलवा

साखरेत पाणी घालून दोनतारी जाड पाक मंद आंचेवर करावा. पाक तयार झाला की त्यात अननसाचे तुकडे घालावेत. त्यांना सुटलेले पाणीही त्यात घालावे. मंद आंचेवर अननस शिजवावा. अधूनमधून ढवळावे. गरम पाण्यात केशर भिजत ठेवावे. उन्हाळ्यात केशर वापरू नये. उष्ण पडते.

अननस शिजत आला की पाकही आळतो व मिश्रण घट्ट होऊ लागते. केशर घालायचे असल्यास त्यात घालावे. दुसऱ्या जाड बुडाच्या पातेल्यात तूप तापले की अननसाचे मिश्रण घालून परतावे. खवा त्यातच कुस्करून घालावा व मिसळेपर्यंत सतत ढवळावे. ३-४ मिनिटे ढवळून खाली उतरवावे व कोमट होऊ द्यावे.

पुडिंग बोलमधे घालून त्यावर साय व काजू-बदामाचे काप घालावे.

पार्टीसाठी करायचा असल्यास साय किंवा क्रीम‍ऐवजी बरोबर व्हॅनिला किंवा दुसरे रंगसंगती व स्वादसंगती साधणारे आईस्क्रीम द्यावे.

हा हलवा दोनतीन दिवस अगोदर करून ठेवला तरी चालतो. मात्र अननस ताजा, पूर्ण पिकलेला व रसाळ हवा. डब्यातला घेऊ नये. हे पुडिंग मोठ्या पार्ट्यात करायलाही हरकत नाही.