प्राक्कालीन वाङ्‍मयीन अभिव्यक्ती

चित्रकार के.के बेब्बर यांची एक कलाकृती(चित्र सौजन्य के.के हेब्बर)

अलीकडेच पुण्याच्या जुन्या बाजारात एक जुन्या पावलीच्या आकारचे तांब्याचे नाणे मिळाले आहे. त्या नाण्याच्या एका बाजूवर झूल घातलेला हत्ती डावीकडून उजवीकडे जात असलेला दाखविलेला असून डाव्या बाजूच्या कडेला, ब्राह्मी लीपीत, ‘रय्यो सिरि हालस्स’ (राज श्री हाल यांचे) अशी अक्षरे आहेत व नाण्याच्या दुसऱ्या बाजूला उज्जयिनीचे सुप्रसिद्ध राजमुद्रा चिन्ह आहे.

कलियुगातील राजवंशांतल्या राजांचे संबंधी पुराणांत जी काही त्रोटक माहिती मिळते. त्यानुसार आंध्रभृत्य सातवाहनवंशीय हालसातवाहन याचा सतरावा क्रमांक आहे व त्याचा राज्यकाल पाच वर्षांचा होता असा उल्लेख आहे. प्रारंभी उल्लेख केलेल्या नाण्याची प्राप्ती होण्यापूर्वी केवळ वाङ्‍मयीन क्षेत्रांतून कांही थोडी माहिती उपलब्ध होती. परंतु आता ह्या नाण्यामुळें त्या माहितीला संपूर्ण दुजोरा मिळाला असून, हाल नावाचा सातवाहन वंशातला राजा सुमारे १८०० वर्षापूर्वी होता, त्याचे राज्य विस्तृत होते, अर्वाचीन कर्नाटकाचा उत्तरेकडचा पट्टा व दक्षिण महाराष्ट्रापासून विंध्य पर्वतावलीपलीकडे माळव्यातही त्याची सत्ता होती, इतकी शुद्ध व स्पष्ट ऐतिहासिक तथ्ये प्रमाणित झाली आहेत.

पुरातन साहित्यानुसार, हाल सातवाहनाची राजधानी गोदावरी नदीच्या काठी पैठणला होती. त्याचे अधिकांश राज्य नर्मदेच्या दक्षिणेकडील प्रदेशात होते. एका प्राचीन गाथेत, ‘हाल सातवाह पैठण सोडून गेला तरी गोदावरी (नदीने) तसे केले नाही. प्रतिस्थान/प्रतिष्ठान=पैठण सोडून ती दूर हटली नाही’ असे म्हटले आहे. दुसऱ्या एका पुरातन गाथेत, ‘शुभ्र उत्तुंग हिमाच्छादित पर्वत उत्तरेत आहे, हालसातवाहनाची यशोराशी दक्षिणेत तितकीच उंच आहे’. असे हालसातवाहनाच्या पराक्रमाचे वर्णन आहे. ह्या दोन्ही गाथा श्लेषपूर्ण आहेत. गाथासप्तशतीच्या एका जुन्या हस्तलिखिताच्या पुस्तिकेत, हालसातवाहन कुंतलाधिपति होता असे उल्लेखिले आहे. कृष्णानदी व तिच्या उपनद्या ज्या भूभागात वहातात, त्या भागाला, तिथली भूमी काळी असल्याने, कुंतलदेश अशी संज्ञा होती. म्हणजे महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेवरचा काही भूभाग व कर्नाटाकाच्या उत्तर सीमेवरचा काही भाग ह्या दोहोंना मिळून कुंतलदेश ह्या नांवाने संबोधिले जात असे. गोदावरीच्या तीरावरचे, राजधानी असलेले प्रतिष्ठान हे शहर मोठे नगर मानले जात असे आणि कृष्णेच्या एका उपनदीच्या-पंचगंगानदीच्या- काठावर वसलेले नगर लहान म्हणून, क्षुल्लकपूर (वर्तमानकालातील कोल्हापूर) सातवाहनाचे कालात समजले जाई. त्या काळच्या ग्रीक व रोमन प्रवासवर्णनांत क्षुल्लकपुराचा पाठभेद ‘हिप्पोकूरा’ असा आढळतो.