संकटमोचक प्रणवदाच

प्रणव मुखर्जी

प्रणव मुखर्जी

‘यूपीए’चे राष्ट्रपतिपदाचे उमेद्वार म्हणून कॉंग्रेस आघाडी सरकारचे संकटमोचक प्रणव मुखर्जी यांच्याच नावावर आखेर मोहोर उमटली. प्रणव मुखर्जी यांच्या नावाचा प्रस्ताव यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मांडला आणि तृणमूल कॉंग्रेस वगळता या निर्णयाला ‘यूपीए’तील सर्व घटकपक्षांनी पाठिंबा दिला. या निर्णयानंतर प्रणवदांना समाजवादी पक्षाने उघडपणे पाठिंबा देण्याचे जाहीर केले आणि ममता बॅनर्जी यांना एकाकी पाडले. ‘यूपीए’च्याच बाजूने बहुजन समाज पक्षानेही कौल दिल्याने कॉंग्रेसच्या उपद्रवी ममता बॅनर्जी यांना बाजूला सारून प्रणवदांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.

ममता यांनी आघाडीचे विधिनिषेध धूडकावून राष्ट्रपतिपदाच्या निवडणूकीसाठी डॉ. कलाम यांचे नाव परस्पर जाहीर केले. ‘सपा’ त्यांच्या सुरात सूर मिसळत होते व यामुळे कॉंग्रेसमोर अडचणी उभ्या राहिल्या. पण राष्ट्रपतिपदावरून भाजपप्रणित ‘एनडीए’मध्येच घोळ सुरु होता. सपा-बसपाचा अपेक्षित पाठिंबा व पुन्हा डाव्या पक्षांना जवळ करण्याची रणनीती कॉंग्रेसच्याच पथ्यावर येऊन पडली. या पदासाठी मुखर्जी यांचे नाव सोनियांनी सुचवताच द्रमुक, राष्ट्रीय लोक दल, राजद, राष्ट्रवादी कॉंग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स, मुस्लिम लीगने त्याला लगेच पाठिंबा दर्शविला. मुखर्जी यांच्या नावाची अधिकृत घोषणा एका तासाच्या बैठकीनंतर सोनियांनी केली.