प्रश्न व तज्ज्ञ डॉक्टरांची उत्तरे

आपल्या एकूण आरोग्याविषयी आणि वैद्यकीय उपचार, पद्धती यांविषयी आपल्या मनात बरेच प्रश्न घोटाळत असतात. सर्वसामान्य दृष्टीने, नेहमी विचारले जाणारे काही प्रश्न आणि त्या प्रश्नांना तज्ज्ञ डॉक्टर व विचारवंतानी दिलेली ही उत्तरे..

 • गर्भारपणात चांगले वाचन मनन केल्यास मुलांवर चांगले परिणाम होतात का ?
 • कोड बरे होते का ?
 • जन्मलेले मूल मुके व बहिरे आहे हे कसे ओळखावे ?
 • केस लवकर पांढरे होऊ नयेत म्हणून काय करावे ?
 • बिनटाक्याचे दुर्बिणीतले ऑपरेशन म्हणजे काय? ते कसे केव्हा व कोणासाठी केले जाते ?
 • कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया तीन मुलानंतर व मुलगा पाच वर्षांचा झाल्यावर का सांगतात ?
 • पोथी-पुराण, व्रत वैकल्पे केल्यास मनाची शांती वाढते काय ?
 • तोंडावरचे देवीचे व्रण कढता येतात काय ?
 • लूपमुळे कॅन्सर होतो काय ?
 • आर. एच. निगेटिव्ह रक्तगटाच्या मुलीचे लग्न त्याच गटाच्या मुलांशी करणे आवश्यक आहे काय ?
 • स्त्रियांना हार्ट अ‍ॅटॅक येतो का ?
 • फार दिवस पाळणा लांबवण्याच्या गोळ्या घेतल्याने परत मूल होत नाही का ? पाळी बंद होत का ? कॅन्सर होतो का ?
 • पाळी ५० वयापर्यंत बंद न झाल्यास काय करावे ?
 • पाळीच्या दिवसात बाहेर बसावे का ?
 • ‘एक्सपायरी डेट’ जवळ असलेली औषधे वापरावीत काय ? एक्सपायरी डेट उलटून गेलेल्या औषधांचे काय करावे ?
 • पालथ्या पिशवीवर दिवस जात नाहीत ?
 • स्त्री कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेनंतर किंवा नलिका बंद असल्यास पुन्हा मुले होऊ शकतात काय ?
 • लहानपणापासून गायनाची तालीम केल्यास आवाज सुधारतो काय ?
 • दिवस पूर्ण न भरता बाळंतपण झाले असेल तर त्या मुलामध्ये नंतरकाही वैगुण्य राहते काय ?
 • क्रायो सर्जरी म्हणजे काय ?

गर्भारपणात चांगले वाचन मनन केल्यास मुलांवर चांगले परिणाम होतात का ?
(आंनद यादव. पुणे विद्यापीठ पुणे.)

गर्भारपणात चांगले-वाचन-मनन केल्यास चांगले परिणाम होत असावेत असं वाटतं. वास्तविक मानसशास्त्रीय दृष्ट्याही हे पटवून देता येणं शक्य आहे. चांगल्या वाचनाने व मननाने मनाच्या सर्वच वृत्ती-प्रवृत्ती प्रसन्न आणि स्थिर राहतात. त्याचा परिणाम शरीर स्वाथ्यावरही होतो. एवढेच नव्हे तर आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीवर अंशतः तरी होत असतो आणि गर्भारपणातील स्त्री शरीर हे एक फळ वाढवीत असते. अशावेळी जर वरीलप्रमाणे चांगल्या वान-मननाचे परिणाम स्त्री शरीरावर होत असतील आणि स्त्री शरीराचे परिणाम मुलावर होत असतील, तर पर्यायाने स्त्रीने गर्भारपणात केलेल्या चांगल्या वाच्न मननाचे परिणाम मुलावर होत असतात असेच मानले लागेल.

कोड बरे होते का ?
(डॉ. पी. बी. जोशी)

हा प्रश्न, उद्या पाऊस पडेल का? यासारखाच आहे व म्हणून याचे उत्तरही बरे होईल किंवा एखादेवेळी होणार नाही असंच असू शकतं.
कोडामध्ये बरेच प्रकार असतात. शरीराच्या कोणत्या भागावर सफेद डाग आहेत, किती मोठे आहेत, किती दिवसापासून आहेत अशा अनेक बाबींवर कोड बरे होणार का नाही ही गोष्ट अवलंबून असते. सामान्यतः चेहरा व मान यावरील डाग लवकर बरे होतात. याउलट ओठ, कंबर, बोटांची टोके, तळहात, तळपाय यावरील डाग बरे होणे जिकीरीचे असते. योग्य त्या तज्ज्ञांकडून उपचार केल्यावरसुद्धा एकूण औषधोपचार सुमारे २-३ वर्षेसुद्धा करावे लागतात व इतके करूनही सुमारे २० टक्के रुग्णात अपेक्षित यश होत नाही. औषधोपचार चालू केल्यावर पांढऱ्या डागावर कळे ठिपके येऊ लागतात. डाग पूर्णपणे काळा होईपर्यंत व नंतरही काही काळ उपचार करावेच लागतात. नाहीतर झालेला फायदा नष्ट होण्याची भीती असते.

जन्मलेले मूल मुके व बहिरे आहे हे कसे ओळखावे ?
(डॉ. चांडक)

जन्मलेल्या मुलांमध्ये सर्वप्रथम ऐकण्याच्या क्रियेच्या वाढीस सुर्वात होते. ती वाढ क्रमाने खाली दिल्याप्रमाणे होते.

 • मूल ३॥ महिन्याचे असताना अगदी मोठ्या प्रमाणात आवाज केल्यावर फक्त डोळ्यांची उघडझाप करते व दचकते.
 • मूल ६ महिन्याचे असताना जे आवाज पुन्हा पुन्हा होतात त्याला स्वतःला आवाज करून उत्तर देते. उदा. दुधाची बाटली, चमचा, आईचा आवाज इ.
 • मूल ७॥ महिन्याचे असताना मोठ्या प्रमाणात आवाज झाल्यास फक्त डोळ्यांची हालचाल करते. परंतु आवाजाची दिशा त्याला कळत नाही.
 • मूल ८॥ महिन्याचे असताना आवाज व आवाजाची दिशा बरोबर ओळखते. उदा. आईचा आवाज, खुळखुळा.

मूल जन्मल्यानंतर ९ महिन्यापर्यंत मुलांच्या ऐकण्याच्या क्रियेची वाढ पूर्ण होत व नंतर हळूहळू बोलायला लागते. जर ९ महिन्यांचे मूल कोणत्याही मोठ्या प्रमाणात होणाऱ्या आवाजाला वधत नसेल, तर मुलाला कमी ऐकू येत असावे असे ओळखावे. जे मूल ऐकू शकत नाही, ते मुकेही असते.

केस लवकर पांढरे होऊ नयेत म्हणून काय करावे ?
(डॉ. श्याम सी. जग्गी)

 • रोज नियमितपणे साबण व पाण्याने केस धुवावेत.
 • केसात जर कोंडा असेअल तर ताबडतोब उपचार करावेत.
 • सुगंधी तेले व सौंदर्यप्रसाधने याचा वापर करू नये.
 • व्हिटॅमीन ए. बी. लोह, तांबे, झिंक मॅगेनीज असलेला पूरक आहार घ्यावा. उदा. गाजर, बीट, मुळा, हिरव्या पालेभाज्या, दूध.
 • शक्य असल्यास महिन्यातून एक वेळा ‘डी-वॉर्मिंग’ उपचार करावेत.

बिनटाक्याचे दुर्बिणीतले ऑपरेशन म्हणजे काय? ते कसे केव्हा व कोणासाठी केले जाते ?
(डॉ. महेंद्र पारीख)

लेप्रोस्कोप ही साधारण एक सेंटीमीटर जाडीची दुर्बिण बधीर केलेल्या बेंबीच्या भागातून पोटात घालण्यात येते. गर्भनलिकाचे निरीक्षण करून त्या बंद करण्यात येतात. आपोआप गळणारा अंतर्गत टाका जरी घातला गेला, तरी पोटावर बाहेरून दिसणारा व नंतर काढावा लागणारा टाका घालावा लागत नाही. चार तासानंतर स्त्री घरी जाऊ शकते व दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर सर्व कामे पूर्ववत करू शकते. ही शस्त्रक्रिया स्त्रीच्या दृष्टीने अत्यंत साधी, सुलभ व सर्वोत्त्म असून कोणत्याही स्त्रीवर केव्हाही लाभ घेता येतो. परंतु प्रसवोत्तर क्रियेसाठी नेहमीचीच पद्धत बरी.

कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया तीन मुलानंतर व मुलगा पाच वर्षांचा झाल्यावर का सांगतात ?
(डॉ. एन. डी. पालकर)

स्त्री किंवा पुरुष यांच्यावर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करण्याच्या आधी खालील गोष्टींची पूर्तता होणे आवश्यक आहे. पतीचं वय सामान्यपणे पंचवीस वर्षांपेक्षा लहान व पत्नीचे वय वीस वर्षांपेक्षा लहान किंवा ४५ वर्षांपेक्षा मोठे असता कामा नये.ऑपरेशन करून येणाऱ्या जोडप्यास दोन जिवंत मुले ऑपरेशनच्या वेळेस असावीत व लहानाचे वय दोन वर्षांपेक्षा जास्त असावे. कुटुंबनियोजनाच्या ऑपरेशनासाठी पूर्णपणे प्रवृत्त झालेल्या स्त्री किंवा पुरुषास दोन मुलापेक्षा कमी मुले असतील किंवा लहान बालकाचं वय दोन वर्षांपेक्षा कमी असेल तर ऑपरेशन करू नये. तात्पुरत्या कुटुंबनियोजनाच्या पद्धतीची माहिती दून त्या वापरण्याचा सल्ला द्यावा. ( संपादकीय टीप – वरील नियम करण्यामागचा उद्देश झालेल्या मुलांची सुरक्षितता, क्कुटुंबाचे सौख्य व स्त्रियांचे आरोग्य व तिन्हीचा मेळ घालणे हा आहे.)

पोथी-पुराण, व्रत वैकल्पे केल्यास मनाची शांती वाढते काय ?
(डॉ. यु. म. पठाण)

ही मनाशांती भाविकांच्या श्रद्धेमुळे वाढते. तशा प्रकारे काहींना मनःशांती लाभत असल्यास पोथीपुराणाचा व व्रतवैकल्पे याचा उपयोग करावयास हरकत नाही. बऱ्याच वेळा याचे कर्मकांडात रूपांतर होते. व मूळ हेतू बाजूला राहतो. अध्यात्माच्याऐवजी सुगम विवेचन केलेल्या ग्रंथाचे वाचन केल्यास जीवनाचे गंभीर चिंतन करता येईल व खऱ्या अर्थाने मनःशांती लाभेल.

तोंडावरचे देवीचे व्रण कढता येतात काय ?
(डॉ. डड्डी)

देवी आणि देवीच्या व्रणासारखेच कांजण्या, मुरुम  ( Pimples )  अशा कारणामुळे चेहऱ्यावर डाग पडून चेहरा विद्रूप व खडबडीत दिसतो.
हे व्रण प्लॅस्टिक सर्जरीने ‘डर्मा अ‍ॅब्रेजन’ पद्धतीने काढता येतात. ह्या ऑपरेशनसाठी चेहऱ्यावरचे खोलगट डाग आणि भोवतालचे कातडे एका विशिष्ट पद्धतीने खरबडून झाल्यानंतर ह्या जागेवर नवीन कातडे एकाच पातळीवर येते आणि काही दिवसानंतर डाग नाहीसे होतात. हे ऑपरेशन उजळ चेहऱ्यांच्या व्यक्तींवरच जास्त प्रमाणात यशस्वी होते. ऑपरेशननंतर त्वचा मुलायम आणि सुंदर दिसायला काही महिन्याचा कालावधी लागतो, याची कल्पना असणे आवश्यक आहे.

लूपमुळे कॅन्सर होतो काय ?
(डॉ. टी. डी. चव्हाण)

तूप हे तात्पुरत्या कुटुंबनियोजनाचे साधन आहे व ते सामान्यपणे ३ ते ४ वर्षेपर्यंत ठेवता येते. त्यानंतर तपासणी करून पुन्हा नवीन तूप बसवता येते, किंवा दुसरी पद्धत अवलंबिता येते. कोणतीही बाहेरची वस्ती शरिरात फार दिवस राहिल्यास त्रास होणेची शक्यता असते. परंतु योग्यवेळी काढल्यास व नियमीत काळजी घेतल्यास कॅन्सर होण्याची शक्यता फारच कमी असते.

आर. एच. निगेटिव्ह रक्तगटाच्या मुलीचे लग्न त्याच गटाच्या मुलांशी करणे आवश्यक आहे काय ?
(डॉ. शशिधर कुडाळकर)

आर. एच. निगेटिव्ह रक्तगटाच्या मुलीचे लग्न आर. एच. निगेटिव्ह रक्तगटाच्या मुलाशी केल्यास गर्भधारणेत रक्तदोष उद्भवण्याचा संभव असत नाही. पण अँती ‘डी’ इम्यूनीग्लोबीलीनच्या शोधामुळे, पत्नी आर. एच. निगेटिव्ह असेल आणि पती आर. एच पॉझिटिव्ह असेल, तर प्रसूती नंतर पहिल्या बहात्तर तासात अँटी आर. एच. ‘डी’ सीरमचे इंजेक्शन दिल्यानंतर रक्तदोष उत्पन्न होण्याचा संभव असत नाही. यासाठी सर्वच स्त्रिया पहिल्या गरोदरपणात, पहिल्या तपासणीचे वेळी आर. एच. ग्रुपींग तपासले जाते. त्यामुळे प्रसूतीपूर्वी व प्रसूतीनंतर योग्य ती काळजी घेऊन मुलाला विघातक असा रक्तदोष उद्भवू दिला जात नाही. वरील शास्त्रीय शोधामुळे आर. एच. निगेटिव्ह रक्तगटाच्या मुलीचे लग्न आर. एच. निगेटिव्ह गटाच्या मुलाशीच करणेची बिलकूल गरज नाही.

स्त्रियांना हार्ट अ‍ॅटॅक येतो का ?
(डॉ. कुमार देसाई)

हार्ट अ‍ॅटॅकमध्ये हृर्दयातील एक छोटी रक्तवाहिनी प्रवाहातील अडथळ्यांमुळे बंद होते. त्या भागातील हृदयातील स्नायूला प्राणवायूचा पुरवठा कमी पडतो. या स्नायूला क्रॅप  (पेटका ) येतो, छातीत कळ येते. शरिराला पोचणाऱ्या रक्तपुरवठ्यात फरक पडतो. रक्तदाब कमी होतो. शॉकची लक्षणे दिसतात व शरिरावर दूरगामी परिणाम होतात. यालाच हार्ट अ‍ॅटॅक असे म्हणतात. हा रक्तप्रवाह बंद होण्यामागे जी मूलभूत कारणे आहेत. उदा. स्थूलपणा, मधुमेह, रक्तदाब, धूम्रपान ही पुरुषाप्रमाणे स्त्रीतही असू शकतात. भारतीय स्त्रियांमध्ये धूम्रपानाचे प्रमाण कमी असले तरी पाश्चिमात्य स्त्रियामध्ये ते झपाट्याने वाढत आहे. तेव्हा हार्ट अ‍ॅटॅक स्त्रियांनाही येतोच. कदाचित पुरुषापेक्षा काही टक्के कमी प्रमाणात असेल एवढेच !

फार दिवस पाळणा लांबवण्याच्या गोळ्या घेतल्याने परत मूल होत नाही का ? पाळी बंद होत का ? कॅन्सर होतो का ?
(डॉ. सुहास दाणी)

पाळणा लांबवण्याच्या गोळ्यांमुळे स्त्रीच्या शरिरात गर्भाधारणेप्रमाणे जीव रासायनिक वातावरण कृत्रिमरित्या निर्माण केले जाते. अर्थात या रासायनिक बदलाचे प्रमाण गर्भारपणापेक्षा फारच अत्यल्प असे असते. एकदा शरीराला याची सवा झाली की गोळ्या बंद केल्या तरी काही दिवस पाळी येत नाही. १॥ ते ३ महिनेपर्यंत पाळी न आल्यास तपासणी शिवाय जास्त काही करण्याची गरज नसते. बाळंतपणानंतर मासिक पाळी सुरु व्हायला जसा उशीर लागतो. अगदी तसाच प्रकार हा असतो आणि परत दिवस जातातच ना ? आता कॅन्सरबद्दल म्हणाल तर खरं सांगायच म्हणजे या गोळ्यातील मूलद्रव्यांच्या अतिसेवनाने प्राण्यांमध्ये कॅन्सर अधिक प्रमाणात झालेला आढळला. पण माणसामध्ये इतका जास्त काळ गोळ्या घेण्याची वेळ यावीच कशाला ? या गोळ्या वापरात येऊन फार काळ लोटलेला नाही आणि कोणत्याही स्त्रीने या गोळ्या तात्पुरता पाळणा लांबवणेच्या उपाय म्हणून वापरायच्या असतात. पुरेशी मुले झाल्यावर जास्तकाळ गोळ्या घेत बसण्यापेक्षा स्त्री किंवा पुरुष नसबंदी सारखा बिनधोक उपाय नाही. या गोळ्या योग्य मार्गदर्श्नानुसार तात्पुरता उपाय म्हणून थोड्या काळाकरता घेतल्या तर संभाव्य धोके बाळंतपणापेक्षा किंवा रस्त्याने चालताना होणाऱ्या अपघाताच्या धोक्यापेक्षा थोडे कमीच आहेत !

पाळी ५० वयापर्यंत बंद न झाल्यास काय करावे ?
(डॉ. ( सौ ) कुमुद तामस्कर)

मासिक पाळी सर्वसाधारणपणे ४५ ते५० च्या दरम्यान थांबते. थांबण्याची ही क्रिया विशिष्ट पद्धतीने होते. पाळीचे प्रमाण हळूहळू कमी होत जाते किंवा दोन पाळ्यांतील अंतर वाढत जाऊन पाळी बंद होते. पुष्कळ स्त्रियांची अशी समजूत आहे की, मासिक पाळी बंद होण्याच्या वेळेला पाळी अनियमित किंवा जास्त प्रमाणात जाते. ही समजूत चुकीची आहे. रक्तस्त्राव जास्त होत असेल किंवा ८ ते १० दिवसात पाळी येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जर गर्भाशयात फायब्राईड असेल किंवा मासिक पाळीचा काही रोग असेल, तर मासिक पाळी वयाच्या पन्नाशी नंतरही चालू राहते, म्हणूअ जर मासिक पाळी पन्नासपर्यंत थांबली नाही तर डॉक्टरी सल्ला घ्यावा.

पाळीच्या दिवसात बाहेर बसावे का ?
(डॉ. सुभाष नारगोलकर)

नियमित नैसर्गिक पाळीत शारीरिअक दृष्ट्या वेगळ्या आरामाची, व्यवस्थेची जरूर नसते. तसेच नियमीत कामे टाळायची सवय जाऊन घेण्याचीही जरुर नसते. वेगळेपणा दाखवून लोकांचे लक्ष सहानुभूती मिळवण्याचा पारंपारिक प्रयोग टाळावा. परंतु पाळीसंबंधी कोणतीही अडचण असल्यास तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला हा आजी-आया-मैत्रिणींच्या सल्ल्यापेक्षा उत्तम !

‘एक्सपायरी डेट’ जवळ असलेली औषधे वापरावीत काय ? एक्सपायरी डेट उलटून गेलेल्या औषधांचे काय करावे ?
(डॉ. जोगळेकर)

औषधांच्या मुदतीची तारीख संपल्यानंतर औषधे वापरू नयेत. एक्सपायरीची तारीख देताना तपमान, उजेड इत्यादी गोष्टीसंबंधी असणाऱ्या अटी त्यात नमूद केलेल्या असतात. तपमान उजेड यासारख्या दिलेल्या गोष्टी जर औषध साठवून ठेवताना कटाक्षाने पाळल्या असतील तर मुदतीची तारीख उलटून गेल्यावर काही आठवडे औषधांचा वापर करण्यास हरकत नाही. परंतु त्या अटी पाळल्या नसतील तर तारीख उलटून गेल्यावर औषधे वापरू नयेत. पातळ औषधांच्यामध्ये गढूळता आली असेल तर ती औषधे वापरु नयेत.

तसेच एखाद्या औषधांची मात्रा ठराविक असेल व सुरक्षितता कमी असेल तर मुदतीची तारीख उलटून गेल्यावर ते औषध वापरू नये. मुदत संपून गेल्यावर औषधातील गुण कमी होतो आणि काही औषधामध्ये विषारी पदार्थ निर्माण होतात ( उदा. टेट्रासायकलीन ) म्हणून मुदत संपलेली औषधे न वापरणेच योग्य. अशी औषधे नष्ट करून टाकणे आवश्यक आहे.

पालथ्या पिशवीवर दिवस जात नाहीत ?
(डॉ. सुनिल पारिख)

देवळ पिशवी पालथी म्हणून दिवस जात नाहीत असं नाही. पिशवी पालथी होण्याची काही कारणे असू शकतात. फायब्राईड, गर्भाशयाच्या कडेच्या पेशींना सूज येणे अशासारख्या कारणांनी जर पिशवी पालथी असेल तर प्रथम त्या कारणांचा शोध लावून त्यावर उपाय करणे जरूर आहे. केवळ पिशवी पालथी आहे म्हणून दिवस न जाण्याच्या इतर कारणांचा विचार न करणे चूक ठरेल.

(१७) डॉ. (मिस) बहान
स्त्री कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेनंतर किंवा नलिका बंद असल्यास पुन्हा मुले होऊ शकतात काय ?
बंद असलेल्या नलिका परत जोडून चालू करण्यासाठी प्रयत्नपूर्वक परत जोड शस्त्रक्रिया करता येते. या शस्त्रक्रियेत येणाऱ्या यशाचे प्रमाण नळ्या कोठे बंद आहेत, नळ्याचा किती भाग बंद आहे, नळ्याची टोके बंद आहेत काय ? नळ्या बंद होण्याचे कारण कोणते ? केवळ नळ्या बंद हे मूल  न होण्याचे कारण आहे काय ? शस्त्रक्रियेत येणाऱ्या अडचणी, शस्त्रक्रियेनंतर जंतुंचा प्रादुर्भाव अशा बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असते. तसेच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करताना नळीचा कोणता व किती भाग कापला आहे वा बांधला आहे याचा विचार करणेही जरुरीचे ठरते.
पुन्हा नळ्या जोडण्याच्या शस्त्रक्रियेस ‘ट्यूबोप्लास्टी’ असे म्हणतात. ही शस्त्रक्रिया प्लॅस्टिक शस्त्रक्रिया असल्याने खूपच नाजूकपणे करावी लागते. यासाठी विशेष उपकरणांची जरुरी असते. ऑपरेशन करताना जर त्यासाठी खास लागणारा मायक्रोस्कोप वापरला तर सूक्ष्म दोष लगेच दिसून शस्त्रक्रियेच्या यशाचे प्रमाण वाढते. ( मायक्रो सर्जरी )

(१८) डॉ. प्रभा अत्रे
लहानपणापासून गायनाची तालीम केल्यास आवाज सुधारतो काय ?
कंठ संगीतात ‘आवाज साधना’ नावाचे एक शास्त्र आहे. फार वर्षांपासून त्यावर होत आलेला दिसतो. परंतु ते ज्ञात अजून एकत्र करून व्यवस्थित मांडले गेलेले नाही. विज्ञानाच्या कसोटीवर ते तपासूनही पाहिलेले नाही. आवाज तयार करण्याच्या बाबतीत प्रत्येक गायक आपला मार्ग धुंडाळीत असतो. आवाजाच्या शक्यता लक्षात करून योग्य मार्गदर्शन मिळाव्यास आणि त्यानुसार रिवाज झाल्यास आवाज निश्चित सुधारतो. नुसती गायनाची तालीम घेऊन आवाज सुधारेल असे नाही.

(१९) डॉ. एस. व्ही. वाटवे.
दिवस पूर्ण न भरता बाळंतपण झाले असेल तर त्या मुलामध्ये नंतरकाही वैगुण्य राहते काय ?
दिवस पूर्ण न भरता झालेल्या मुलांची ( प्रीमेच्युअर बेबी ) योग्य तऱ्हेने सुरुवातीपासून काळजी घेतल्यास बव्हंशी मुलात कोणतेही वैगुण्य रहात नाही. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवली पाहिजे की जन्मतःच वैगुण्य असलेली बरीचशी मुले वेळ भरावच्या आधी जन्मास येणेची शक्यता असते. तसंच वजन जर ५०० ग्रॅम्स किंवा कमी असल्यास त्या मुलांच्यात काही वैगुण्ये अधिक प्रमाणात आढळतात. पण नवीन नवीन संशोधनानी व उपकरणांनी या अगदी कमी वजनाच्या मुलाचे भवितव्य ही थोड्या वर्षाच्या अवधीतच अधिकाधिक उज्ज्वल होत आहे.

(२०) डॉ. निशिकांत श्रोत्री
क्रायो सर्जरी म्हणजे काय ?
क्रायो सर्जरीमध्ये ठराविक पेशीच तपमान खूपच खाली आणलं जातं. त्यामुळे पेशी व त्यामधील असणारा पदार्थ गोठवून टाकला जातो. तो भाग कालांतरानं गळून जातो व नंतर ती जागा निरोगी पेशींनी भरून निघते. यासाठी सामान्यतः लिक्वीड नायड्रोजन वापरला जातो. त्यामुळे पेशीचं तपमान १८० सें. पर्यंत खाली येतं. गर्भाशयाच्या तोंडाला सूज येणं, बऱ्हाच काळाचं इंजेक्शन असणं यासाठी याचा उपयोग केला जातो. तसंच योनीमार्ग व बाहेरील बाजू या ठिकाणी लहान ‘वार्ट’ गोठवण्यासाठी याचा उपयोग होतो. गर्भाशयाच्या तोंडाचा अगदी प्राथमिक अवस्थेतील कॅन्सर असेल आणि त्या स्त्रीस अजूनमुले हवी असतील, तर गर्भाशयाची पिशवी न काढता कॅन्सरच्या भागावर क्रायोसर्जरीनी उपाय करता येतात. ठराविक जागेतून जर रक्तस्त्राव होत असेल तर त्या जागेचं तपमान कमी करून रक्तस्त्राव थांबवण्यासाठीसुद्धा क्रायोसर्जरीचा उपयोग होतो.