प्रीत हवी चित्राला

प्रीत हवी चित्राला

नेमेची टांगली चित्रे पांढऱ्या भिंती वरती
हप्ताभर जनाची रीघ, रांगा मागे पुढती

रंगात कोणी रंगले कुणाचे भान हरपले
ओलावती काही नजरा, कुणी पुसती नाकी डोळे

भावली सारी चित्रे अन चित्रांमधले भाव
हळूच कुणी मज पुसती, काय हो चित्रांचे भाव

कुणी घेतली चित्रे, कुणी लाविली बोली
करिती घासाघीस, टक्क्यात अधेली चवली

चित्रांच्या भावा परते, होता भाव-अभाव
अशांच्या लागलो ना नादा, रसिकांत रंक ना राव

‘प्रेमा’ पोटी सारी चित्रे तयार झाली
निर्मिता ना उरली माझी, प्रीतीस केवळ विकली

म्हणती देव तो वरचा असतो भाव भुकेला
आम्हीही तसेच म्हणतो प्रीत हवी चित्राला