पुणे जिल्हा

शनिवार वाडा, पुणे

शनिवार वाडा, पुणे

पुणे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण : पुणे
पुणे जिल्ह्यातील तालुके : चौदा
पुणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ : १५,६४३ चौ.कि.मी.
पुणे जिल्ह्याची लोकसंख्या : ५५,३२,५३२

हे पुणे ! शिवरायांनी याच पुण्यात बालपणी संस्करांचे व पराक्रमी धडे गिरविले. पेशवाईमध्ये याच पुण्याचे राजधानीचे स्थान भूषविले. पेशव्यांचे कर्तृत्वही फुलविले याच पुण्याने. असे हे पुणे ! लोकमान्य टिळकांची ही कर्मभूमी. थोर समाजसुधारक जोतिबा फुल्यांच्या समाजपरिवर्तनाच्या कार्यास सुरुवातही येथूनच झाली. या कार्याला प्रेरणाही या पुण्यातच मिळाली आणि…. विरोधही येथेच झाला.

समाजपरिवर्तन, सुधारणेच्या कार्यात सर्वस्व झोकून देणाऱ्या अनेक समाजसुधारकांचे कर्तृत्व याच पुण्याने फुलविले. याच पुण्यातील सनातन्यांनी आगरकारांच्या हयातीतच त्यांची प्रेतयात्रा काढण्याचा करंटेपणाही दाखविला. असे हे पुणे ! टिळक व आगरकर असे दोन भिन्न विचार-प्रवाह येथेच निर्माण होतात; कधी हातात हात घालून आपली वाटचाल करतात तर कधी कायमच्याच दोन समांतर रेषा बनतात.

गोपाळ हरी देशमुख (लोकहितवादी), महात्मा जोतिबा फुले, यांसारखे समाजसुधारक ही पुण्याच्या मातीने राष्ट्राला दिलेली देणगीच ठरली. रा. गो. भांडारकर, सुधाकर आगरकर, लोकमान्य टिळक, गोपाल कृष्ण गोखले, महर्षी धोंडो केशव कर्वे यांसारख्या नररत्नांचे कर्तृत्व याच पुण्याने फुलविले – याच पुण्यात फुलले ! असे हे पुणे !

 • पुणे जिल्ह्याचा ईतिहास
 • पुणे जिल्ह्याचे भौगोलीक स्थान
 • पुणे जिल्ह्यातील तालुके
 • पुणे जिल्ह्याची प्राकृतिक रचना
 • पुणे जिल्ह्याची माती
 • पुणे जिल्ह्याचे हवामान
 • पुणे जिल्ह्यातील नद्या
 • पुणे जिल्ह्यातील धरणे
 • पुणे जिल्ह्यातील पिके
 • पुणे जिल्ह्यातील जंगले/वने
 • पुणे जिल्ह्यातील किल्ले
 • पुणे जिल्ह्यातील महत्वाची स्थळे
 • पुणे
 • जुन्नर
 • देहू
 • राजगुरुनगर
 • चाकण
 • लोणावळे
 • सासवड
 • उरूळी-कांचन
 • जेजुरी
 • बनेश्वर
 • वढू
 • भाटघर
 • आर्वी
 • वालचंदनगर
 • पिंपरी-चिंचवड
 • बारामती
 • भोर
 • पुणे जिल्ह्यातील उद्योगधंदे
 • पुणे जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था

इतिहास :

पुणे शहराच्या नावावरून जिल्ह्यासही पुणे जिल्हा असे नाव पडले. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात होऊन गेलेल्या टॉलेमी याच्या लिखाणात पुण्याचा ‘पुन्नाटा’ असा उल्लेख आढळतो. राष्ट्रकूट राजवटीत या गावाचा ‘पुनवडी’ नावाने उल्लेख केला जाई. पुण्य या शब्दावरून पुणे हे नाव पडले असावे, अशीही एक उपपती मांडली जाते. मुळा व मुठा या नद्यांच्या संगमावर वसलेले पुण्यस्थळ म्हणून हे नाव पडले असावे. मोगल राजवटीत या गावाचा ‘कसबे पुणे’ असा उल्लेख आढळतो.
आंध्र, चालुक्य व राष्ट्रकुटांच्या प्राचीन राजवटी पुण्याने पाहिल्या. मध्युगातील यादवांचा अमलही पुण्याने पाहिला. बहामनी, निजामशाही व आदिलशाही राजवटीही येथेच त्यांच्या मनात रुजले. मराठा राजवटीत पुणे हे एक महत्त्वाचे राजकीय केंद्र होते. पुढील काळात पेशव्यांनी आपली राजधानी येते वसविली. १८१८ साली मराठेशाहीचा अस्त झाला व पुण्याच्या शनिवारवाड्यावरील भगव्या शेंड्याची जागा ‘युनियन जॅक’ने घेतली. स्वांतत्र्य आंदोलनातही पुणे अग्रभागी राहिले. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडक्यांची कर्मभूमीही पुणे हीच होती. पुण्याच्या गणेशखिंडीतच २२ जून १८९७ रोजी चापेकर बंधूनी रँड या जुलमी प्लेग कमिशनरचा वध केला. अनेक क्रांतिकारकांनी व स्वतंत्र्य सेनानींनी पुण्यास आपली कर्मभूमी मानले होते. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला आणि पुण्याच्या शनिवारवाड्यावरील ‘युनियन जॅक’ची जागा भारताच्या ‘तिरंगी झेंड्याने’ घेतली.

स्थान :

पुणे जिल्ह्याच्या उत्तरेस व पुर्वेस अहमदनगर जिल्हा, आग्नेयेस सोलापूर जिल्हा, दक्षिणेस सातारा जिल्हा. पश्चिमेस रायगड जिल्हा, तर वायव्येस ठाणे जिल्हा आहे. पुणे जिल्ह्याला नैसर्गिक सीमाही लाभली आहे. जिल्ह्याची कुकडी, घोड व भीमा या नद्यांनी तर दक्षिण सीमा नीरा नदीने निश्चित केली आहे. जिल्ह्याची पश्चिम सीमा सह्य पर्वतरांगांनी आखून दिली आहे.
जिल्ह्याचा आकार सर्वसाधारणः त्रिकोणी आहे. जिल्ह्याला पूर्व-पश्चिम जास्तीत जास्त विस्तार सुमारे १७१ कि.मी. असून दक्षिण-उत्तर जास्तीत जास्त विस्तार सुमारे १५५ कि.मी. आहे.

पुणे जिल्ह्यातील तालुके : एकूण तालुके चौदा.

 1. पुणे शहर
 2. हवेली
 3. खेड
 4. आंबेगाव
 5. जुन्नर
 6. शिरूर
 7. दौंड
 8. इंदापूर
 9. बारामती
 10. पुरंदर
 11. भोर
 12. वेल्हे
 13. मुळशी
 14. मावळ

प्राकृतिक रचना :

पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात सह्य पर्वताच्या रांगा पसरलेल्या आहेत. हा डोंगराळ भाग सुमारे ५ ते १० कि.मी. रुंदीचा असून त्यास ‘घाटमाथा’ असे म्हणतात जिल्ह्याच्या पश्चिम भागातीलच पण काहीशा वायव्येकडे असलेल्या नाणेघाटातून ठाणे जिल्ह्यात उतरता येते, तर बोरघात उतरून रायगड जिल्ह्यात प्रवेश करता येतो. जिल्ह्याच्या पश्चिम भागातीलच परंतु काहीशा नैऋत्येकडे असलेल्या वरंधा घाटातूनही रायगडा जिल्ह्यात उतरता येते. घाटमाथ्याच्या पूर्वेस असलेल्या ३० ते ४० कि.मी. रुंदीच्या पट्ट्यास ‘मावळ’ म्हणून ओळखले जाते. मावळ हा डोंगराळ भाग असून त्यामध्ये अधून-मधून सखल प्रदेश आढळतो.जिल्ह्याचा पूर्वेकडील व आग्नेयेकडील भाग पठारी असून त्यास ‘देश’ म्हणून ओळखले जाते>

भाटघर येथील धरण १९२९ मध्ये बांधण्यात आले असून पूर्वी ते तत्कालीन मुंबई इलाख्याचे गव्हर्नर लॉईड यांच्या नावाने ‘लॉईड धरण’ म्हणून ओळखले जात असे.

सह्याद्रीच्या रांगा उत्तर-दक्षिण पसरलेल्या असून या पर्वतरांगामध्ये उत्तरेस असलेले हरिश्चंद्रगड (१४२४ मीटर) हे जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर होय. तसुबाई, भीमाशंकर, शिंगी ही जिल्ह्यातीळ पश्चिम सीमेवरील सह्य पर्वतरांगांमध्ये वसलेली काही उंच शिखरे होत. जीवधन, धाक, अहुपे, नागफणी (ड्यूक्स नोज) ही या रांगांमधील आणखी काही महत्त्वाची शिखरे होत. जिल्ह्याच्या उत्तर भागात हरिश्चंद्रगड डोंगराच्या रांगा पश्चिमेकडून पूर्वेकडे गेलेल्या आहेत. शिंगी, तासुबाई, मांडवी, ताम्हीनी व अंबाला या डोंगररांगाही सह्य पर्वततातून निघून पश्चिम-पूर्व अशा गेलेल्या आहेत. शिंगी डोंगररांगांनी भीमा व भामा या नद्यांच्या जलविभाजकाचे कार्य पार पाडले आहे. पवना व मुळा या नद्यांच्या दरम्यान मांडवी डोंगररांगा पसरलेल्या आहेत, तर मुळा व मुठा या नद्यांच्या दरम्यान ताम्हीनी डोंगररांगा पसरलेल्या आहेत. अंबाला डोंगररांगेने मुळा व नीरा या नद्यांच्या जलदुभाजकाचे कार्य केले आहे.
पश्चिमकडील डोंगराळ भाग या भागाला लागून असलेला पूर्वेकडील टेकड्यांचा उंच-सखल प्रदेशा व त्याच्याही पूर्वेकडील पठारी प्रदेश अशी जिल्ह्याची सर्वसाधारण प्राकृतिक रचना सांगता येईल. पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेशात जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे व भोर या तालुक्यांचा काही भाग येतो. बहुतांशी याच तालुक्यांचा पूर्व भाग; तद्वतच शिरूर; हवेली व पुरंदर या तालुक्यांचा काही भाग टेकड्यांच्या उंच सखल अ प्रदेशात मोडतो. दौंड, बारामती, इंदापूर आदी तालुक्याचा समावेस पूर्वेकडील पठारी प्रदेशात होतो.

मृदा :

पुणे जिल्ह्यातील तांबडी, तपकिरी व काळी अशा तीन प्रकारची मृदा आढळते. पश्चिमेकडून, जसजसे पूर्वेकडे जावे तसतशी मृदेची सुपीकता वाधलेली आढळून येते. जुन्नर, आंबेगाव, खेड व पुरंदर या भागातील डोंगराळ प्रदेशात तांबडी मृदा आढळते. खेड, हवेली, शिरूर, दौंड व पुरंदर या तालुक्यांच्या काही भागातील मृदा तप्किरी आहे. इंदापूर व बारामती या तालुक्यात काळी कसदार मृदा आढळते.

हवामान :

जिल्ह्यातील हवामान वर्षातील बराचसा काळ कोरडे व आल्हाददायक असते. उन्हाळ्यात तुलनात्मकदृष्ट्या हवामान उष्ण असते. मे महिन्यात तापमान ४१ डिग्री सें.ची मर्यादा ओलांडते. काही वेळा मेम्हिन्यात तापमान त्याहीपेक्षा अधिक वाढलेले आढळून येते. हिवाळ्यात तापमान ६ डिग्री सें.पर्यंतही खाली येते. इंदापूर, दौंड, बाराअती या पूर्वेकडील तालुक्यातील हवामान तुलनात्मदृष्ट्या अधिक उष्ण असते. पश्चिमेकडील डोंगराळ भागात तापमान तुलनात्मकदृष्ट्या कमी आढळते. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालखंडाला नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो. घातमाथ्यावर पावसाचे प्रमाण अधिक म्हणजे ३०० ते ४०० सें.मी.पर्यंत असते. घाटमाथ्याकडून पूर्वेकडे पावसाचे प्रमाण कमी कमी होत जाते. जिल्ह्याचा पूर्व भाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात मोडतो. येथील पावसाचे वार्षिक प्रमाण सर्वसाधारणतः ७०ते १२० सें. मी. पर्यंत असते. सुखटणकर, समितीच्या शिफारशीनुसार जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, दौंड, बारामती, इंदापूर, पुरंदर व हवेली या तालुक्यांचा समावेश अवर्षणप्रवण क्षेत्रात केला गेला असून १९७४-७५ पासून या तालुक्यांमध्ये अवर्षणप्रवण क्षेत्रविकास कार्यक्रम राबविला जात आहे. आता डॉ. सी. एच. हनुमंतराव समितीच्या शिरफारशींच्या आधारे भोर, मुळशी व मावळ या तालुक्यांचाही नव्याने अवर्षणप्रवण क्षेत्रात समावेश करण्यात आला असून येथेही १९९४-९५ पासून अवर्षणप्रवन क्षेत्रविकस कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

नद्या :

भीमा ही जिल्ह्यातील प्रमुख नदी होय. ती पुणे जिल्ह्यातच आंबेगाव तालुक्यात सह्य पर्वतरांगामध्ये ‘भीमाशंकर’ येथे उगम पावते. ती प्रथम काही अंतर जिल्ह्याच्या मध्यातून व नंतर जिल्ह्याच्या पूर्व सीमेवरून वाहाते. जिल्ह्यातील तिचा प्रवास आंबेगाव, खेड, शिरूर या तालुक्यामधून व दौंड आणि इंदापूर या तालुक्यांच्या सीमावर्ती भागातून होतो. दौंड आणि इंदापूर तालुक्यांच्या सीमावरून वाहाताना तिने काही काळ पुणे व अहमदनगर आणि पुणे सोलापूर या जिल्ह्यांमधील नैसर्गिक सीमेचे कार्य केले आहे. दौंड आणि इंदापूर या तालुक्यांच्या सीमावरून वाहात जाऊन ती पुढे नीरा नदीचा प्रवाह आपल्या पोटात घालूनच सोलापूर जिल्ह्यात प्रवेशते. इंद्रायणी, घोड, मुळ, मुठा व नीरा या भीमेच्या जिल्ह्यातील प्रमुख उपनद्या होत.
इंद्रायणी ही भीमेची उपनदी जिल्ह्याच्य मध्यभागातून वाहाते. ही नदी लोणावळ्याच्या नैऋत्येस सह्य रांगांमध्ये कुरवंडे घाटाजवल उगम पावते. हवेली तालुक्यातील तुळापूर येथे ही भीमेस मिळते. नीरा नदी जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून पश्चिम-पूर्व अशी वाहाते. आपल्या या प्रवासात तिने पुणे व सातारा आणि पुणे व सोलापूर या जिल्ह्याच्या नैसर्गिक सीमेचे कार्य केले आहे. कऱ्हा ही नीरेची जिल्ह्यातील प्रमुख उपनदी होय. ती बारामती तालुक्याच्या सीमावर्ती भागात नीरेस मिळते. बारामती गाव कऱ्हा नदीकाठी वसले आहे. घोड ही भीमेची आग्नेयवाहिनी उपनदी. आंबेगाव तालुक्यातील आहुपे गावाजवळ हीचा उगम होतो. दौंडचा वायव्येस पाच किलोमीटर अंतरावर सांगवीनजिक ती भीमेस मिळते. आंबेगाव, गोडेगाव, वडगाव व शिरूर ही तिच्याकाठची प्रमुख गावे होत. कुकडी नदी जुन्नर तालुक्यात नाणेकडीजवळ चावद येथे उगम पावते. तिचा सुरुवातीचा प्रवास जुन्नर तालुक्यातून होतो. पुढे ती शिरूर व नगर जिल्ह्यातील पारनेर या तालुक्याच्या सीमेवरुन वाहाते. या सीमावर्ती भागातच ती घोड नदीस मिळते. मीना ही घोडनदीची आणखी एक उपनदी होय.

देशातील सर्वांत पहिले उपग्रह दळणवळण केंद्र (विक्रम) जुन्नर तालुक्याट आर्वी येथे १९७१ पासून कार्यरत आहे.

धरणे :

वेळवंडी या नीरेच्या उपनदीवर भाटघर येथे धरण बांधण्यात आले आहे. या धरणास पूर्वी ‘लॉईड धरण’ म्हणून ओळखले जाई. आता तेथील जलाशयास ‘येसाजी लीक जलाशय’ असे संबोधले जाते. खडकवासला प्रकल्पांतर्गत पुण्याजवळ तीन धरणे बांधण्यात आली आहेत. अंबी या मुठेच्या उपनदीवर वरसगाव येथे दुसरे धरण आहे. या धरणाच जलाशयास ‘वीर बाजी पासलकर’ यांचेनाव देण्यात आले आहे. अंबी, मोशी व मुठा या नद्यांवर खडकवासला येथे तिसरे धरण बांधण्यात आले आहे. याशिवाय पुण्याजवळच मुळशी येथे मुळा नदीवर आणखी एक धरण बांधण्यात आलेले आहे. भीमा प्रकल्पातंर्गत पवना नदीवर मावळ तालुक्यात फागणे येथे पवना धरण आहे. कुकडी प्रकल्पातंर्गत घोड नदीवर शिरूर तालुक्यात चिंचणी येथे तसेच आंबेगाव तालुक्यात डिंभे येथे तसेचह कुकडी नदीवर जुन्नर तालुक्यात येडगाव व माणिकडोह येथे धरणे बांधण्यात आली आहेत.
वरील प्रकल्पांशिवाय खेड तालुक्यातील चासकमान प्रकल्प, जुन्नर तालुक्यात पुष्पावती प्रकल्प, पुरंदर तालुक्यात नाझरे प्रकल्प हे मध्यम प्रकल्प जिल्ह्यात आहेत. बारामती तालुक्यात शिरसुफळ, इंदापूर तालुक्यात शेटफळ व दौंड तालुक्यात वरवंड, कासुर्डी आणि माटोबा हे महत्त्वाचे तलाव आहेत.

पिके :

बाजरी व तांदूळ ही जिल्ह्यातील महत्त्वाची खरीप पिके होत. तर गहू आनी हरभरा ही महत्त्वाची रबी पिके होत. ज्वारीचे पीक जिल्ह्यात दोन्ही हंगामांत घेतले जाते.
भोर, खेड, हवेली, इंदापूर हे तालुके खरीप ज्वारीच्या दूष्टीने तर इंदापूर, दौंड, शिरूर, बारामती व पुरंदर हे तालुके रबी ज्वारीच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. बाजरीचे पीक प्रामुख्याने शिरूर, जुन्नर, खेड व वेल्हे हे तालुके तांदळाच्या पिकासाठी प्रसिद्ध आहेत.

भारतातील पहिली मुलींची सैनिकी शाळा जुलै १९९७ पासूनपुणे येथे सुरू झाली आहे.

‘आंबेमोहोर’ हा सुवासिक तांदूळ भोर तालुक्यात विशेषत्वाने घेतला जातो. मुळशी तालुक्यात ‘कमोद’ जतीच्या तांदुळासाठी, तर जुन्नर तालुका ‘जिरेसाळ’ जातीच्या तांदुळासाठी प्रसिद्ध आहे. बारामती, इंदापूर व शिरूर हे तालुके गव्हाच्या उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे होत. जुन्नर, खेड व इंदापूर या तालुक्यात हरभरा मोठ्याप्रमाणावर घेतला जातो.
ऊस हे जिल्ह्यातील प्रमुख बागायती पीक असून बारामती, इंदापूर व हवेली हे तालुके उसाच्या उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. पुरंदर, दौंड व शिरूर या तालुक्यांतही उसाचे उत्पादन बऱ्यापैकी घेतले जाते.
पुणे हे महत्त्वाचेशह्र जिल्ह्यात असल्याने शहराच्या गरजा ओळखून जवळपासच्या भागात पालेभाज्या व फळभाज्या यांच्या उत्पादनास महत्त्व दिले जाते. खेड, हवेली आंबेगाव या तालुक्यांमध्ये भाजीपाला अधिक पिकविला जातो. आंबेगाव तालुक्यात टोमॅटोचे उत्पन्न चांगले निघते. खेडा, आंबेगाव व जुन्नर तालुक्यात बटाट्याचे पीक घेतले जाते. जुन्नर, खेड पुरंदर आदी तालुक्यांमध्ये कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.
फळांचा उत्पादनाच्या दृष्टीनेही जिल्हा महत्त्वाचा गणला जातो. बारामती तालुक्यात व हवेली तालुक्याच्या काही भागात द्राक्षबागा आहेत. दौंड व शिरुर तालुक्यात संत्री-मौसंबीच्या तर पुरंदर तालुक्यात अंजीर व सीताफळाच्या बागा आहेत.
जिल्ह्याच्या काही भागात विशेषत्वाने जुन्नर, हवेली व दौंड या तालुक्यांमध्ये थोड्याफार प्रमाणावर फुलांची शेतीही केली जाते.

वने :

जिल्ह्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी जवळजवळ १२ टक्के क्षेत्रावर वने आहेत. कोणत्याही प्रदेशात पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने ३३ टक्के भू-क्षेत्र वनांखाली असणे अपेक्षित असते; हे लक्षात घेता जिल्ह्यातील वनांचे प्रमाण अतिशय कमी आहे. जिल्ह्यातील निम्म्यापेक्षा अधिक वन-क्षेत्र पश्चिमेकडील डोंगराळ भागात आहे. मुळशी मावळ, आंबेगाव, भोर व वेल्हे या तालुक्यांमध्ये बऱ्यापैकी वने आहेत. हवेली व पुरंदर तालुक्यांच्या काही भागातही विरळ वने आहेत. आंबेगाव तालुक्यात भीमाशंकर येथे अभयारण्य विकसित करण्यात आले असून या अभयारण्याचा काही भाग ठाणे जिल्ह्यातही पसरलेला आहे. पुण्यजवळच्या सिंहगड परिसराताही वनाचा जाणिवपूर्वक विकास करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील वनांमध्ये लांडगा, कोल्हा, तरस, ससा, रानमांजर, मुंगूस, सायाळ यांसारखे विविध प्राणी आढळतात. जिल्ह्यात सुमारे ३०० प्रकारचे पक्षी आढळून येतात.

पुणे येथे १९८२ पासून शासनमान्य शेअर बाजार कार्यरत आहे.

रानकोंबडा, तितर, मोर, पोपट, बुलबुल, कबुतर, आदी पक्षी येथील वनांत विशेषत्वाने आढळतात. भीमाशंकर येथील वनांत ‘शेखरू’ ही उडणारी खार आढळते.

किल्ले :

पुण्यापासून जवळह हवेली तालुक्यात ‘सिंहगड’ हा किल्ला आहे. या किल्ल्याचे पूर्वीचे नाव ‘कोंडाणा’ असे होते. ह किल्ला जिंकताना तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले. गड जिंकला पण सिंहपक्रामी तानाजी गेला म्हणून याचे नाव ‘सिंहगड’ आसे ठेवले गेले. जेथे शिवरायांचा जन्म झाला. तो शिवनेरी किल्ला जुन्नर तालुक्यात आहे. एथेशिवाई देवीचे प्राचीन मंदिर असल्याने किल्ल्यास ‘शिवनेरी’ हे नाअ पडले. जो गड जिंकून शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधले, तो ‘तोरणगड’ पुण्यापासून जवळच वेल्हे तालुक्यात वेल्ह्यापासून जवळच ‘राजगड’ हा डोंगरी किल्ला आहे. शिवरायाम्ची बरीचशी कारकीर्द या किल्ल्यावरूनच पार पडली. ‘पुरंदरगड’ पुण्यापासूनजवळ असलेला आणखी एक दुर्ग. हा गड पुरंदर तालुक्यात सासवडजवळ आहे. पुरंदरगडाला लागून ‘वज्रगड’ हा दुर्ग आहे. ‘लोहगड’ हा जिल्ह्यातील एक प्राचीन किल्ला असून तो मळवली रेल्वेस्थानकाच्या दक्षिणेस सुमारे सात किलोमीटर अंतरावर इंद्रायणीच्या खोऱ्यात वसला आहे. बोरघाटाच्या मुखाशी असलेला हा किल्ला लष्करीदृष्ट्या महत्त्वाचा गणला गेला होता. या किल्ल्याच्या जवळच विसापूर हा दुसरा किल्ला आहे. याशिवाय अनेक लहान-मोठे गडकोट पुणे जिल्ह्यात असून चाकणचा भुईकोट किल्ला व पुण्यातील पेशवेकालीन शनिवारवाडा इतिहासप्रसिद्ध आहेत.

महत्त्वाची स्थळे :

पुणे : जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. मुळा-मुठेच्या संगमावर वसलेले, एकेकाळी पेशव्यांची राजधानी असणारे हे शहर आज महाराष्ट्रातील महत्त्वाचे शैक्षणिक, सांस्कृतिक व औद्योगिक केंद्र मानले जाते.
‘विद्येचे माहेरघर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पुण्यात शिक्षण विभागाचे संचालनालय, महाराष्ट्र राज्याचे विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्या पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य परिक्षा मंडळ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ यांसारख्या शैक्षणिक संस्था तसेच अनेक सामान्य शिक्षण महाविद्यालये, अध्यापक महाविद्यालये, विधी महाविद्यालये, अभियांत्रिक महाविद्यालयचे व वैद्यकीय महाविद्यालये

पुण्याजवळ येरवडा येथे असलेल्या आगाखान पॅलेसमध्ये महात्मा गांधीना कैदेत ठेवले होते. येथेच कस्तुरबांचा मृत्यू झाला.

पुणे हे पुणे विद्यापीठाचे मुख्य ठिकाण आहे. येथील राजा केळकर वस्तुसंग्रहालय व महात्मा फुले वस्तुसमंग्रहालय प्रसिद्ध आहेत.
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंडळ, चित्रपट आणि दूरचित्रवाणी शिक्षण केंद्र, आकाशवाणी केंद्र, भारत इतिहास संशोधन मंडळ, राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, राष्ट्रीय स्फोटके प्रयोगशाळा, मध्यवर्ती जल व शक्ती संशोधन केंद्र, उष्ण कटिबंधीय मान्सून प्रयोगशाळा (वेधशाळा), भारतीय अन्वेषण मंडळ, इंडियन ड्रग रिसर्च लॅबोरटरी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी इत्यादी संस्था पुणे व परिसरात आहेत. पुण्याजवळ वानवडी येथे महादजी शिद्यांची समाधी आहे. हे ठिकाण ‘शिंद्यांची छत्री’ म्हणून ओळखले जाते. पुण्यापासून जवळच बालेवाडी येथे क्रीडासंकुल उभारण्यात आले आहे. पुण्याजवळच पानशेत व वरसगाव येथील जलाशयाच्या परिसराचा क्रीडाकेंद्र व पर्यटनस्थळ म्हणून विकास होत आहे. पुण्याजवळ निगडी येथे ‘अप्पूघर’ हे करमणुकीचे केंद्र आहे.
पुणे हे महत्त्वाचे औद्योगिक केंद्र असून पिंपरी, चिंचवड, भोसरी, हडपसर, पर्वती व गुलटेकडी येथे औद्योगिक वसाहती आहेत. जवळच थेरगाव येथे कागद गिरणि आहे. पुणे हे महत्त्वाचे रेल्वे जंक्शन व बाजारपेठ असून पुण्याजवळ लोहगाव येथे विमानतळ आहे. पुणे-मुंबई अंतर रेल्वेने १९२ कि.मी. असून सडकेने १७० कि.मी. आहे.

जुन्नर : जुन्नर तालुक्याचे मुख्य ठिकाण. राजगुरुनगरपासून ६० कि.मी. अंतरावर, सह्याद्रीच्या कुशीत हे ठिकाण वसले आहे. येथूनच भीमा नदीचा उगम होतो. येथील महादेवाचे देवस्थान बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते. येथील देवालय नाना फडणवीसांनी बांधले आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणूनही भीमाशंकर प्रसिद्ध आहे. येथे अभयारण्य विकसित करण्यात आले आहे.
आळंदी : पुण्यापासून जवळच असलेले हे तीर्थक्षेत्र खेड तालुक्यात मोडाते. इंद्रायणी नदीकाठी वसलेल्या या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली आहे. आषाढी व कार्तिकी एकादशीला ज्ञानरायांच्या समाधीचे दर्शन घेण्यास लाखो भाविक येथे गर्दी करतात.

देहू : पुण्यापासून जवळच हवेली तालुक्यात वसलेले तीर्थक्षेत्र. हे स्थान संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थळ म्हणून ओळखले जाते. फाल्गुन वद्य द्वितीयेला (तुकाराम बीज) येथे

अष्टविनायकांच्या आठ स्थानांपैकी पाच स्थाने एकट्या पुणे जिल्ह्यात आहेत. ही स्थाने अशी : (१) चिंतामणी (थेऊर ता. हवेली) (२) श्रीगणपती (रांजणगाव, ता. शिरूर) (३) मोरेश्वर (मोरगाव, ता. बारामती) (४) श्रीविघ्नेश्वर (ओझर, ता. जुन्नर (५) गिरिजात्मक (लेण्याद्री, ता. जुन्नर).

मोठी यात्रा भरते. येथून पाच कि.मी. अंतरावर भंडारा डोंगर आहे. तेथे एकांतात तुकाराम महाराज चिंतन करीत असत, असे म्हटले जाते.

राजगुरुनगर : खेड तालुक्याचे मुख्य ठिकाण. हुतात्मा राजगुरुम्चे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध.

चाकण : खेड तालुक्यात. कांद्याची मोठी बाजारपेठ. येथील भुईकोट किल्ला प्रसिद्ध. येथे औद्योगिक वसाहत असून या परिसरात अनेक मोठे उद्योग उभे राहिले आहेत.

लोणावळे : पुण्यापासून ६० कि.मी. अंतरावर पुणे-मुंबई हमरस्त्यावा असलेले हे थंड हवेचे ठिकाण मावळ तालुक्यात मोडते. येथे आर. एन. एस. नौदल प्रशिक्षण केंद्र आहे. लोणावळ्यापासून जवळच वळवण येथे धरण आहे. लोणावळ्याच्या पूर्वेस ८ कि.मी. अंतरावर कार्ले, भाजे व बेंडसा येथे प्राचीन लेणी आहेत. कार्ले येथील लेणी ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकातील आहेत.

सासवड : पुरंदर तालुक्याचे मुख्य ठिकाण . येथे सोपानदेवाची समाधी आहे. जवळच असलेले ‘कोठीत’ हे गाव आचार्य अत्रे यांचे जन्मस्थान आहे. जवळच पुरंदर किल्ला आहे.

उरूळी-कांचन : हवेली तालुक्यात. येथील निसर्गोपचार केंद्र प्रसिद्ध आहे. १९८२ च्या रॅमन मॅगसेसे पुरस्काराचे मानकरी व थोर गांधीवादी कार्यकर्ते मणिभाई देसाई यांनी स्थापन केलेली भारतीय अ‍ॅग्रो फाऊंडेशन ही संस्था येथे आहे. जवळच ‘भुलेश्वर’ हे श्रीशंकराचे देवस्थान व सहलीचे ठिकाण आहे.

जेजुरी : पुरंदर तालुक्यात. येथील गडावर महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबाचे देवस्थान आहे. सोमवती अमावास्येस येथे मोठी यात्रा भरते.

बनेश्वर : पुण्यापासून ३० कि.मी. अंतरावर नसरापूरजवळ हेस्थान वसले आहे. येथील शिवमंदिर प्रसिद्ध आहे. निसर्गरम्य परिसरामुळे सहलीसाठी लोक येथे येतात.

खेड-शिवापूर : हवेली तालुक्यात. येथील कमर‍अली दरवेशाचा दर्गा अनेक हिंदू-मुस्लिमांचे श्रद्धास्थान आहे.

वढू : हे गाव शिरुर तालुक्यात भीमा-कोरेगावपासून ३ कि.मी. अंतरावर आहे. येथे संभाजी महाराजांची समाधी आहे.

भाटघर : हे भोर तालुक्यात असून नीरेची उपनदी वेळवंडीवर बांधलेले ‘लॉईड धरण’ येथे आहे. या धरणाच्या जलाशयास आता ‘येसाजी कंक जलाशय’ असे नाव देण्यात आले आहे. पुण्यापासून ४० कि.मी. अंतरावर असलेले हे स्थळ आता पर्यटककेंद्र म्हणून विकसित होत आहे.

पुणे जिल्ह्यात मांजरी येथे ग्रामसेवक व ग्रामसेविका यांच्यासाठी प्रशिक्षण केंद्र चालविले जाते.

आर्वी : हे ठिकाण जुन्नर तालुक्यात असून येथे ‘विक्रम’ हे उपग्रह दळणवळण केंद्र आहे.

वालचंदनगर : हे ठिकाण इंदापूर तालुक्यात असून येथे सहकारी तत्त्वावरील साखर कारखाना, प्लॅस्टिकचा कारखाना, वनस्पती तुपाचा कारखाना व वालचंदनगर उद्योगसमूहाचा अभियांत्रिकी उत्पादनांचा कारखाना आहे.

पिंपरी-चिंचवड : पूर्वी पुणे शहराची उपनगरे समजली जाणाऱ्या या ठिकाणी आता स्वतंत्र महानगरपालिका आहे. पिंपरी आणि चिंचवड येथे औद्योगिक वसाहत असून या वसाहतींमध्ये व परिसरात अनेक, उद्योगधंदे स्थापन झाले आहेत. चिंचवड येथे श्रीमोरया गोसावी या सत्पुरुषाची समाधी आहे.

बारामती : बारामती तालुक्याचे मुख्य ठिकाण. कऱ्हा नदीकाठी वसले आहे. तालुक्यात माळेगाव व सोमेश्वरनगर येथे सहकारी तत्त्वावरील साखर कारखाने कार्यरत. येथे बारामती ग्रेप इंडस्ट्रीजचा मद्यनिर्मिती प्रकल्प कार्यरत असून येथील औद्योगिक वसाहतीत अनेक लहान-मोठे कारखाने उभे राहिले आहेत.

भोर : भोर तालुक्याचे मुख्य ठिकाण. भोर परिसरात अलीकडील काळात लहान मोठ्या अनेक उद्योगधंद्याचे केंद्रीकरण झाले असून येथील रंगाचा व रेक्झीनचा (भोर इंडस्ट्रीज) कारखाना प्रसिद्ध आहे.
याशिवाय पौड (मुळशी तालुक्याचे मुख्य ठिकाण, जवळच मुळशी येथे धरण.); शिरूर (शिरूर तालुक्याचे मुख्य ठिकाण. घोडनदीकाठी वसले आहे.); इंदापूर (इंदापूर तालुक्याचे मुख्य ठिकाण. सहकारी तत्त्वावरील साखर कारखाना.); तळेगाव (मावळ तालुक्यात. काच कारखाना प्रसिद्ध.); वडगाव (मावळ तालुक्याचे मुख्य ठिकाण.) ही जिल्ह्यातील अन्य महत्त्वाची स्थळे आहेत.

उद्योगधंदे :

औद्योगिकदृष्ट्या प्रगत जिल्हा. जिल्ह्यात पिंपरी, चिंचवड, भोसरी, गुलटेकडी, पर्वती, हडपसर, बारामती, भोर, लोणावळे (तालुका मावळ), जेजुरी (तालुक पुरंदर), कुरकुंभ (तालुका दौंड), पिरंगुट (तालुका मुळशी), चाकण (तालुका खेड), कोरेगाव, शिक्रापूर, रांजणगाव, कारेगाव (सर्व तालुका शिरुर) या ठिकाणी वसाहती वा औद्योगिक केंद्रे प्रस्थापित झाली आहेत.
जिल्ह्यात पुणे-मुंबई राष्टीय महामार्ग हा प्रमुख औद्योगिक पट्टा आहे. टेल्को, फिलिप्स, बजाज, किर्लोस्कर, सेंच्युरी एन्का, गरवारे नायलॉन, क्रॉप्टन ग्रीव्ह्‌ज यांसारख्या

‘वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था’ ही सहकारी क्षेत्रातील प्रगत संशोधन संस्था पुणे येथे आहे.

उद्योगसमुहांचे अनेक आधुनिक उद्योग या औद्योगिक पट्ट्यात एकवटले आहेत. पिंपरी येथे हिंदुस्थान अ‍ॅन्टिबायोन्टिक्सचा कारखना आहे. खडकी व देहूरोड येथे केंद्र सरकारचा दारूगोळ्या कारखाना आहे. तळेगाव दाभाडे येथे काच कारखना व ईगल फ्लास्क कंपनीचा थर्मासचा कारखाना आहे. मुंढवा येथे भारत फोर्ज व कल्याणी स्टील या कंपन्यांचे अवजड यंत्रसामुग्रीचे कारखाने आहेत. चिंचवड येथे बजाज कंपनीचे स्कूटर व रिक्षा यांचे कारखाने आहेत. पिंपरी येथे टेल्को कंपनीचा मोटारीचा कारखाना आहे. भोर येथील रेक्झीनचा व रंगाचा कारखाना प्रसिद्ध असून इतरही अनेक कारखाने तेथे विकसित झाले आहेत. इंदापूर तालुक्यात वालचंदनगर येथे यंत्रनिर्मितीचे कारखाने आहेत. शिरूर तालुक्यात रांजणगाव येथे अपोलो टायर या कंपनीचा टायरचा कारखाना असून व्हर्लपूल या कंपनीचा रेफ्रिजरेटर निर्मिती प्रकल्पही आहे. याच तालुक्यात कोरेगाव-सणसवाडी येथे शार्प कंपनीचा दुरचित्रवाणीसंच निर्मितीचा प्रकल्प, इस्पात कंपनीचा फोर्जिंगचा कारखना व अन्य लहानमोठे अनेक कारखाने आहेत. पिंपरी येथे तसेच हवेली तालुक्यात लोणी-काळभोर येथे फिलिप्स कंपनीचे रेडिओ-दूरचित्रवाणी संच निर्मितीचे कारखाने आहेत. जिल्ह्यात दौंड तालुक्यात मधुरकरनगर येथे भीमा सहकारी साखर कारखाना, इंदापुर तालुक्यात भवानीनगर येथे श्रीछपत्रती सहकारी साखर कारखाना; बारामती तालुक्यात शिवनगर (माळेगाव) येथे माळेगाव सहकारी कारखाना, बारामती तालुक्यातच सोमेश्वरनगर येथे श्रीसोमेश्वर सहकारी साखर कारखना; हवेली तालुक्यात चिंतामणीनगर (थेऊर) येथे यशवंत सहकारी साखर कारखाना; जुन्नर तालुक्यात शिरोली येथे श्रीविघ्नहर सहकारी साखर कारखाना, भोर तालुक्यात अनंतनगर (निगडे) येथे राजगड सहकारी साखर कारखाना; शिरूर तालुक्यात न्हावरे येथे घोडगंगा सहकारी कारखाना; इंदापूर तालुक्यात महात्मा फुले नगर (बिजवडी) येथे इंदापूर सहकारी साखर कारखाना; मुळशी तालुक्याट हिंजवडी येथे श्रीसंत तुकाराम सहकारी साखर कारखान हे सहकारी तत्त्वावरील साखर कारखने कार्यरत आहेत.
याशिवाय जुन्नर येथे हातकागद, बनविण्याचा व्यवसाय प्रचलित आहे. मेंढीच्या केसांपासून घोंगड्या बनविण्याचा उद्योगही जुन्नर तालुक्यात चालतो. विड्या वळणे, दोरखंड तयार करणे यासारखे उद्योग विखुरलेल्या स्वरूपात जिल्ह्याच्या विविध भागात आस्तित्वात आहेत.

वाहतूक :

मुंबई-पुणे-बंगळूर-चेन्नई हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार जिल्ह्यातून जातो. खंडाळा, लोणावळे, कामशेत, वडगाव, तळेगाव, निगडी, चिंचवड, पिंपरी, पुणे, शिवापूर

३१४ कि.मी. लांबीचा राष्ट्रीय महामार्ग पुणे जिल्ह्यातून गेला आहे, तर पुणे जिल्ह्यातील लोहमार्गाची एकूण लांबी ३११ कि.मी. हून अधिक आहे.

ही या महामार्गावरील जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणे होत. पुणे-सोलापूर-हैदराबाद विजयवाडा हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊही जिल्ह्यातून जातो. या महामार्गावर पुणे, लोणी, भिगवण, इंदापूर ही जिल्ह्यातील ठिकाणे आहेत. पुणे-नाशिक हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पन्नासही जिल्ह्यातून गेला आहे. पुणे, चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा ही या महामार्गावरील जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणे होत. याशिवाय पुणे-अहमदनगर, पुणे-पंढरपूर, पुणे-बारामती (हडपसर, जेजुरीमार्गे), पुणे-महाड हेही प्रमुख रस्ते जिल्ह्यातून गेले आहेत. जुन्नरहून कल्याणकडे जाताना नाणे घाट लागतो. पुण्याहून साताऱ्यास जाताना आपणास कात्रज घात ओलांडावा लागतो. पुण्याहून सासवडला जाताना दिवे घाट पार करावा लागतो. भोरवरून महाडला जाताना वरंधा घाट उतरावा लागतो.
मुंबई-पुणे-कोल्हापूर हा लोहमार्ग जिल्ह्यातून गेला आहे. लोणावळे, तळेगाव, पुणे, उरळी-कांचन, दौंड ही या लोहमार्गावरील प्रमुख स्थानके होत. पुणे-मिरज हा जिल्ह्यातून जाणारा आणखी एक लोहमार्ग होय. सासवड रोड, जेजुरी, वाल्हे, नीरा ही या लोहमार्गावरील प्रमुख स्थानके होत. याशिवाय पुणे-बारामती हा रुंदमापी लोहमार्गही जिल्ह्यातून गेला आहे. पुणे व दौंड ही जिल्ह्यातील रेल्वे जंक्शन्स होत. पुण्याजवळ लोहगाव येथे विमानतळ आहे.

इसवी सन पूर्व पहिल्या शतकापासून जुन्नर जवळच्या नाणेघाटातून घाटमाथा व तळकोकण यांच्यामध्ये व्यापार व दळणवळण चालत होते.

28 thoughts on “पुणे जिल्हा

 1. Pingback: पुणेरी माणुस, पुणेरी पगडी आणि आता पुणेरी ढोल | Puneri Manus Puneri Pagadi Now Puneri Dhol

 2. Pingback: मेंढी ते घोंगडी-एक खडतर प्रवास | Mendhi to Ghongadi Journey

 3. Pingback: श्री कसबा गणपती पुणे | Shri Kasba Ganpati Pune

 4. Pingback: श्री तांबडी जोगेश्वरी गणपती पुणे | Shree Tambdi Jogeshwari Ganpati Pune

 5. Pingback: २७ सप्टेंबर दिनविशेष | September 27

 6. Pingback: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती पुणे | Shrimant Dagdusheth Halwai Ganpati Pune

 7. Pingback: १४ ऑक्टोबर दिनविशेष | October 14

 8. Pingback: सावली प्रतिष्ठान एक आनंदाचं झाड | Savali Institutional Care and Rehabilitation Center, Kothrud

 9. Pingback: चिंतामणी जयंती समारोह २०१२ | Chintamani Jayanti Samaroh 2012

 10. Pingback: दहशतवादी अजमल कसाबला पुण्यात फाशी | Ajmal Kasab hanged at Yerwada Jail in Pune

 11. Pingback: २३ नोव्हेंबर दिनविशेष | November 23

 12. Pingback: सातारा शॉर्ट फिल्म फेस्टिवल २०१२ | Satara Short Film Festival 2012

 13. Pingback: अंकूर समाजहिताचा | Ankur Samajhitacha

 14. Pingback: २८ नोव्हेंबर दिनविशेष | November 28

 15. Pingback: महिंद्रा कॉलेजचा अक्षर उपक्रम | UWC Mahindra College Akshara Programme

 16. Pingback: गिरिजात्मज गणेश स्थापना | Girijatmak Ganesh Sthapana

 17. Pingback: यलो चिलीची नाविन्यपुर्ण मेजवानी | The Yellow Chilli Cookbook By Sanjeev Kapoor

 18. Pingback: वेश्या वस्तीतली अनोखी पाळणाघरं

 19. Pingback: हुतात्मा बाबू गेनू सईद | Hutatma Babu Genu Said

 20. Pingback: १६ डिसेंबर दिनविशेष | December 16

 21. Pingback: १८ डिसेंबर दिनविशेष | December 18

 22. Pingback: संत तुकाराम | Saint Tukaram

 23. Sachin Payghan

  Pune Jilha ha Aitihasic Aahe.
  Tyamule tyala khup prasidhi milaleli aahe.
  Junnar Madhil… “Shivneri Killa” Aani Tethil Hill Station ha mahtvapurna Ase Aahe
  Mhanunacha Pune Jilha Ha mahtvpurna Ahe.
  Maza Aavadta Jilha Pune Ha Aahe..

 24. Pingback: ५ जानेवारी दिनविशेष | January 5

 25. Pingback: दुसरा आंतराराष्ट्रीय फ्लॉवर फेस्टिवल | International Flower Festival Sikkim 2013

 26. Pingback: १९ मार्च दिनविशेष | March 19

 27. Pingback: २० एप्रिल दिनविशेष | April 20

 28. Pingback: १२ जुलै दिनविशेष | July 12

 29. Pingback: ३० ऑगस्ट दिनविशेष | August 30

Comments are closed.