तर शनिवारपासून पाणीकपात

तर शनिवारपासून पाणीकपात

पावसाने आपली कृपा न दाखवल्यामुळे आणि खडकवासला धरणातील पाणी कमी असल्यामुळे सात जुलैनंतर पुणेकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने एक दिवसाआड पाणी देण्याचे व काही भागांत तासानुसार पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले असल्याचे समजले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले की, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जर चांगला पाऊस पडला नाही तर पुण्याच्या पाण्याबाबत वेगळा निर्णय घ्यावा लागेल. अद्याप तरी पावसाने ओढ दिल्यामुळे सात जुलैनंतर पाणीकपात करावी लागणार असल्याचे सांगण्यात आले.

सात जुलैनंतर पाण्याच्या वितरणाचे वेळापत्रक महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले. पावसाची हीच स्थिती जर या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातही राहिली तर, दोन दिवसाआड पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आल्याचे समजते.

मार्च महिन्यापासूनच महापालिकेने पंपिंग स्टेशनच्या दुरुस्तीच्या नावाखाली संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याचे धोरण स्वीकारले आहे. कॅनॉलमधून शेतीला पाणी देण्यासाठी मार्च आणि एप्रिल महिन्यात शहरातील पाणीपुरवठा दुरुस्तीच्या निमित्ताने बंद ठेवण्यात आला होता. शहराला ८ मार्च आणि २९ मार्च रोजी शहराला पाणी देण्यात आले नव्हते. संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याऐवजी एप्रिल महिन्यात काही भागाला पाणी देण्यात आले नाही. मे महिन्यामध्ये भर उन्हाळ्यात दोन वेळा शहराला पाणी देण्यात आले नव्हते. ३ मे आणि १० मे रोजी पाणीपुरवठा करण्यात आला नाही.

खडकवासला धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे पुणेकरांना दोन वेळा पाणीकपाताला सामोरे जावे लागले. पंपिंग स्टेशनच्या दुरुस्तीचे कारण २१ आणि २८ जून रोजी पुढे करण्यात आले. आता उद्याही (गुरुवारी) पाणी येणार नाही. पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले की, पाऊस जर पडला नाही तर, जे नियोजन करण्याचे ठरविले आहे त्याची सात जुलैला पाटबंधारे खात्याबरोबर बैठक घेतली जाणार आहे.