गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायलाच हवा

राज ठाकरे आणि आर. आर. पाटील

राज ठाकरे आणि आर. आर. पाटील

‘आझाद मैदानाजवळ पोलिसांवर जो हिंसाचार झाला त्यात पोलिस आयुक्तांबरोबरच गृहमंत्रीही तेवढेच दोषी आहेत. त्यामुळे, त्यांनी राजीनामा द्यायलाच हवाच’, अशी तोफ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर डागली. जर एखाद्या खात्यातील समजत नसेल तर दुसऱ्या खात्याचा कार्यभार हाती घ्यावा, असा सणसणीत टोलाही राज यांनी लगावला.

‘पोलिस आयुक्तांना प्रमोशन मिळाले, ही ‘जितं मया’ परिस्थिती नव्हे. माझे त्यांच्याशी वैयक्तिक वैर नाही पण, अशा गोष्टीतून अधिकारी व मंत्र्यांनी बोध घ्यावा’, अशी अपेक्षा राज यांनी व्यक्त केली. राज यांनी दावा केला की, ‘आझाद मैदानाच्या घटनेनंतर पोलिसांचे धैर्य वाढवणे अत्यंत गरजेचे होते आणि आम्ही तेच केले. जे मुस्लिम महाराष्ट्रात राहतात, ते पोलिसांवर कधीही हल्ला करु शकत नाही. पण महाराष्ट्राला बांगलादेशी घुसखोर आणि उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड येथील परप्रांतीयांमुळेच धोका आहे. त्यामुळे या लोकांवर वेळीच लगाम घालायला हवा’, अशी मागणीही यांनी केली.

‘या घटनेतील आरोपींना अटक करण्यासाठी तुम्ही सण बघता का? ते इतके दिवस तुमच्यासाठी मुंबईतच थांबून राहतील का’, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. त्यांनी विचारणीही केली की, दसरा, दिवाळी, गणपती असे सण आमच्या आंदोलकांवर कारवाई करताना बघता का.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन काही जण राजकारण करतात पण, त्यांचे विचार कधी अंमलात आणलेत का, याचा पुनरुच्चर त्यांनी केला. स्मारकासाठी पंतप्रधानांनी परवानगी देऊनही अजून किती दिवस इंदू मिलसाठी जप करत राहणार, असा सवालही राज यांनी केला.