राज ठाकरे भेटले पोलिस आयुक्तांना

राज ठाकरे आणि डॉ. सत्यपालसिंह

राज ठाकरे आणि डॉ. सत्यपालसिंह

सोमवारी सायंकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवे पोलिस आयुक्त डॉ. सत्यपालसिंह यांची भेट घेतली. ही भेट पोलिस मुख्यालयात झाली. या भेटीत दोघांनी वेगवेगळ्या विषयांवर अर्धा तास चर्चा केली. त्यावेळी राज यांनी अपेक्षा व्यक्त केली की, आझाद मैदानावरील हिंसाचारामुळे पोलिसांचे मनोबल खचले आहे आणि ते वाढवणे अत्यंत गरजेचे आहे.

आझाद मैदानावरील मोर्चानंतर खूप मोठी दंगल झाली होती. ती हाताळण्यात पोलिस आयुक्त अरुप पटनाईक अपयशी ठरल्यामुळे विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीकेचा हल्ला केला होता. मनसेने पटनाईक यांना हटविण्यासाठी आझाद मैदानावर मोर्चा काढला होता. त्यावेळी राज यांनी वक्तव्य केले होते की, ‘पोलिस बंधू आणि भगिनींना पाठिंबा देण्यासाठी मी आज रस्त्यावर उतरलो आहे’ व त्यांनी पटनाईक यांच्या राजीनाम्याची मागणीही केली होती. पटनाईक यांच्या बदलीनंतर डॉ. सत्यपालसिंह यांनी सूत्रे हातात घेतली व चार दिवसानंतर ते राज यांना भेटले.

‘पोलिस आयुक्त किंवा पालिका आयुक्त यांची मुंबईत नियुक्ती झाल्यावर मी त्यांची भेट घेत असतो व पुढच्या कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देत असतो. काही गोष्टींवर भेटीत चर्चा झाली. पूर्वी झालेल्या चुका सुधारायला हव्या आणि पोलिसांचे मनोबल पुन्हा वाढेल यासाठी प्रयत्न करायला हवेत. डॉ. सत्यपालसिंह यांनी मान्य केले की या परिस्थितीला पोलिसांचे मनोबल खचले आहे. यावरुन हे स्पष्टपणे समजते की पोलिस आयुक्तांना पोलिस दलाची नस अन नस समजते, जी खूप चांगली गोष्ट आहे’, असे राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.