राज यांनी काढली नगरसेवकांची खरडपट्टी

राज ठाकरे

राज ठाकरे

‘आठ जागांवरुन थेट विरोधी पक्ष म्हणून ‘नवनिर्माणा’ची जबाबदारी असूनही पक्ष इतरांप्रमाणेच ‘राजकीय’ मार्गाने चालला आहे. शहरात विरोधी पक्षाचे काही अस्तित्व आहे की नाही? शहराच्या प्रश्नांवर परस्पर निर्णय कसे घेतले जातात’, अशा शब्दांत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या नगरसेवकांची चांगलीच खरडपट्टी काढली.

राज ठाकरे पुण्याला भेट देण्यासाठी शुक्रवारी आले होते. त्यांनी सकाळी पक्षाचे शहराध्यक्ष आणि विरोधी पक्षनेत्यांसह स्थायी समिती आणि शहर सुधारणा समितीच्या सदस्यांची बैठक घेतली. पुणे शहराच्या विकासासाठी सध्या काम सुरु आहे. त्याबाबत राज यांनी त्यांना विविध सूचना केल्या आणि सहा महिन्यातील कामकाजाचा हिशोब मांडला. ‘मतदारांनी मनसेला विरोधी पक्ष म्हणून निवडून दिले खरे पण शहरात तसे चित्र अजिबात दिसत नाहिये. आता जरा आळस झटकून कामाला लागा’ अशा शब्दांत त्यांनी सूचना दिली.

शहरात दीड ते दोन महिन्यांपासून कत्तलखानाचा विषय गाजत आहे. त्याबाबत पक्षाच्या पालिकेतील भूमिकेवर राज यांनी नापसंती व्यक्त केली. अशा विषयांवर सुरुवातीपासूनच विरोधी भूमिका घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षणसंस्थांच्या अतिउत्साला आवर घालावी यासाठी ते पदाधिकाऱ्यांना सूचक बोलले.

राज यांनी पालिकेच्या पदाधिकाऱ्यांना गेल्या सहा महिन्यातील विषय जे चांगल्या पद्धतीने हाताळले गेले, पक्षाने शहराच्या प्रश्नांवर कशी भूमिका घेतली आणि विरोधी पक्ष म्हणून आगामी काळात काय करायला हवे, याचा अहवाल एक सप्टेंबरपूर्वी तयार करायला सांगितला आहे.

तसेच, शहराच्या प्रश्नांवर कोणतेही निर्णय घेण्या अगोदर आधी माझ्याशी संवाद साधा, असा स्पष्ट आदेशही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. या वेळी शहराध्यक्ष बाळा शेडगे, विरोधी पक्षनेते वसंत मोरे, स्थायी समिती सदस्य बाबू वागस्कर, किशोर शिंदे, नीलम कुलकर्णी आणि शहर सुधारणा समिती सदस्य राजा बराटे, रवींद्र धंगेकर आणि प्रकाश ढोरे उपस्थित होते.