राजा शरमिंधा झाला

कवी गुरु कालीदास हा एका कलावंतिणीला गाणं शिकवायला जाई. राजा भोजही तिच्याकडे अधूनमधून तिचं नृत्य पाहायला जाई. आपण जिच्याकडे जातो, तिच्याकडे कालीदासही जातो, असं कळताच राजानं त्याची फ़जिती करायचं ठरवलं. तो त्या कलावंतिणीकडे गेला असता तिला म्हणाला, ‘हे पहा शुभानना, कालीदास आज तुझ्याकडे येईल तेव्हा त्याला सांग की. संपूर्ण हजामत केल्याशिवाय उद्या तुम्ही माझ्याकडे यायचं नाही.’

कलावंतिणीने कालीदासाला याप्रमाणं सांगताच याच्यामागे राजाचा हात असल्याचा त्याला संशय आला. तो तिला म्हणाला,’ खरं सांग; तू मला हे जे हजामत करून यायला सांगितलंस, ते महाराजांच्या सांगण्यावरुन ना?’

तिनं ते मान्य करताच कालीदास तिला म्हणाला, ‘महाराज या राज्याचे राजे असतील, पण मी तुझा गुरु आहे. तेव्हा त्यांच्यापेक्षा तू मलाच आधिक मानले पाहिजेस. म्हणून मी सांगतो तसं करायचं. मी तर तुझ्या इच्छेप्रमाणे उद्या रात्री संपूर्ण क्षौर करुन येतोच पण मी येऊन गेल्यानंतर महाराज तुझ्या घराचे पुढले दार ठोठावू लागले की त्यांना तू म्हण, महाराज ! गाढवासारखा आवाज काढल्याशिवाय मी आज आपल्याला आत घेणार नाही.’ तुझ्या भेटीसाठी आतूर झालेले महाराज तुझा हट्ट पुरविण्यासाठी तसे ओरडायला कमी करणार नाहीत.’

दुसऱ्या दिवशी राजा त्या कलावंतिणीकडे गेला व तिने हट्ट धरल्यामुळे गाढवासारखा ओरडला ! त्याच्या दुसऱ्या दिवशी कालीदासाला हजामत करुन दरबारात आल्याचे पाहून भोजराजानं खवचटपणे त्याला विचारलं, ‘काय कविराज ! आपण आज संपूर्ण क्षौर का बरं केलयं ?’

यावर कालीदासानं उत्तर दिलं, ‘काल रात्री मी गाढवाचा आवाज ऎकला. गाढवाचा आवाज रात्री कानी पडला म्हणजे, संकट ओढवतं, असं मानलं जातं. ते संकट येऊ नये म्हणून क्षौर करावं, असं शास्त्र सांगतं.’ कालीदासाच्या या चपलख उत्तरानं राजा शरमिंधा झाला.