राजगुरु

अकबर बादशहानं एकदा दरबारात प्रश्न विचारले, ‘ईश्वर कुठे राहतो ? त्याचं तोंड कुठल्या दिशेला आहे ? आणि तो काय करु शकतो ?’या तीन प्रश्नांची समाधानकारक उत्तरं कुणालाही देता येईनात, मात्र बिरबल म्हणाला, ‘खाविंद, मला चार-दोन दिवसांचा अवधी दिलात, तर मी आपल्या प्रश्नांची उत्तरे देईन.’

बादशहानं त्याचं म्हणणं मान्य केलं. बिरबल घरी गेला व बादशहाच्या या तीन प्रश्नांची समर्पक व पटतील अशी उत्तरं कशा तऱ्हेनं द्यायची, याबद्दल विचार करु लागला.बिरबलाची चौदा -पंधरा वर्षाची मुलगी बापासारखीच बुध्दीमान व चतूर होती. आपले वडिल कसल्यातरी विचारात गढून गेले असल्याचे पाहून, ती जवळ जाऊन म्हणाली, ‘बाबा ! एवढ्या कोणत्या गहन विचारात गढून गेला आहात ?’

बिरबलानं तिला बादशहानं विचारलेल्या प्रश्नांबद्दल सांगताच, तिलाल त्या प्रश्नांची उत्तर सापडली आणि दुसऱ्याच दिवशी एका तरुणाचा पोषाख करुन, हाती एका पिशवी घेऊन व आपण दरबारात कशा तऱ्हेनं वागणार आहोत याची वडिलांना कल्पना देऊन, ती बादशहाच्या दरबारात दाखल झाली.बादशहाला कुर्निसात करुन ती म्हणाली, ‘खाविंद, मी बिरबलजींच्या घरी नुकताच शिकायला आलेला त्यांचा एक नातेवाईक आहे. काल दरबारात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला ते स्वत: -प्रकृती नादुरुस्त असल्यामुळे -येऊ शकत नसल्याने, ती उत्तरं द्यायला त्यांच्यातर्फ़े मी आलो आहे.’

बादशहानं पुरुषवेषधारी बिरबल कन्येला न ओळखून तिला एका आसनावर बसायला सांगताच ति म्हणाली, ‘खाविंद स्पष्ट बोलल्याचा राग मानू नये; पण ईश्वरविषयक आपल्या तीन प्रश्नांची मी उत्तरं देणार, तो तात्पुरता आपला गुरु म्हणून. त्यातून गुरुचा मान तर सर्वात अधिक. तेव्हा आपल्या भारतीय पध्दतीप्रमाणे राजगुरु म्हणून आपण मला उच्चस्थानी बसवावे व तात्पुरते का होईना पण माझे शिष्य म्हणून आपण खाली बसावे, म्हणजे आपल्या आध्यात्मिक प्रश्नांची उत्तरे मी देईन.’
बादशहाला त्या तडफ़दार ‘तरूणा’ च्या तर्कशुध्द बोलण्याचं कौतूक वाटून, त्यानं त्याला आपल्या सिंहासनावर बसविलं व आपण स्वत: खाली बसून, त्यानं पहिला प्रश्न विचारला, ‘गुरुदेवा ! ईश्वर कुठे राहतो ?’

यावर बरोबर आणलेल्या पिशवीतून एक दह्याचं मडकं काढून व ते बादशहापुढं ठेवून राजगुरुनं विचारलं, ‘शिष्यवरा, या दह्यात लोणी नेमकं कुठे आहे?

बादशहा – या दह्याच्या अणूरेणूत लोणी भरुन राहिलं आहे.

राजगुरु -मग परमेश्वरसुध्दा या विश्वाच्या अणूरेणूत भरुन राहिला आहे.

बादशहा – त्या परमेश्वराचे तोंड कुठल्या दिशेला आहे ?

राजगुरु – (पिशवीतून एक मेणबत्ती काढून व ती शिलगावून) शिष्यवरा, या मेणबत्तीच्या ज्योतीचं तोंड कुठल्या दिशेला आहे ?

बादशहा – या ज्योतीचं तोंड सर्व दिशांकडे आहे.

राजगुरु – मग ईश्वरालासुध्दा एकाच वेळी सगळीकडे लक्ष ठेवावं लागत असल्याने, त्याचं तोंड म्हणजे दृष्टी -सर्व दिशांकडे आहे.

बादशहा – माझा तिसरा व शेवटा प्रश्न असा आहे की, ईश्वर काय करु शकतो ?

राजगुरु – वत्सा ! तू इथेच घडलेला प्रकार पाहा ना ? त्या परमेश्वराने तुझ्यासारख्या सम्राटाला -थोड्या वेळापुरते का होईना खाली बसायला लावून, माझ्या सारख्या एका सामान्य तरुणाला सिंहासनावर बसविलं. अशा तऱ्हेनं ईश्वर अशक्य गोष्टीही शक्य करुन दाखवितो.

‘हा तरुण दुसरातिसरा कुणी नसुन बिरबलकन्या आहे, ‘हे कळताच बादशहानं तिचा मोठा गौरव करुन तिला इनाम देऊन, पालखीतून घरी पाठवून दिले.